कावळ्या - मंगळगड - शिवथरघळ









बरेच दिवसांपासुन कुठेतरी जाऊयात, कुठला तरी किल्ला सर करूयात असे मनात होते. नजर भिरभिरत होती, शोध घेत होती आणि नजरेसमोर आला तो जावळीच्या खोऱ्यातील मंगळगड. बस्स ठरलं !!! मंगळगड येत्या रविवारी सर करायचाच. मग माहिती गोळा करणे, नकाशा तयार करणे, आजुबाजूच्या परिसराची माहिती जमा करणे असे सगळे शोध सुरु झाले. सवंगडी जमवले. मी , श्रीराम, अवधुत, केतकी, निलेश आणि त्याचा मित्र. नेहमीप्रमाणे सकाळी ५.३० वाजता जमायचे ठरवले. तवेरा करून जायचे ठरले. आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी सर्व तयारी झाली. आता उद्याच्या पहाटेची आस लागली होती.



 मंगळगडाचे दुसरे नाव म्हणजेच कांगोरीगड. चंद्रराव मोरे यांनी हा  कामथा घाटावर तसेच रायरेश्वर दुर्गाजवळील अस्वलखिंडीवर नजर  ठेवण्यास उभारला होता. चंद्ररावांच्या अहंभावी वागण्यामुळे शिवरायांनी जाणले की, चंद्ररावांचा वध केल्याखेरीज हा देखणा किल्ला स्वराज्यात सामील करता येणार नाही. शिवरायांनी ह्या किल्ल्यावर स्वारी करून चंद्ररावांचा निःपात केला आणि हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. या नंतर ह्या किल्ल्याचे नामकरण करण्यात आले ते मंगळगड. मंगळगड हा जावळीच्या खोऱ्यातून निघलेल्या सह्य रांगेवर वसलेला असुन जावळी खोऱ्यात ढवळे गावात वसलेल्या चंद्रगडाचा जोडकिल्ला आहे. ह्या किल्ल्याचा इतिहास बघता हा किल्ला स्वराज्यासाठी किती महत्वाचा होता हे लक्षात येते.



Kavlya Gadachi Machi


ठरल्याप्रमाणे आम्ही (श्रीराम, मी आणि अवधुत ) माझ्या इथे ५.३० वाजता जमलो. ६ वाजता गाडी आली आणि आम्ही पुढे बाकीच्यांना घेत निघालो. भोर मार्गे वरंधा घाटातुन जायचे ठरले. मंगळगडावर जायला आधी महाडला पोचावे लागते. महाडवरून बिरवाडी मार्गे पिंपळवाडी गावापर्येंत जावे. पिंपळवाडी मधुन मोठी वाट गेलेली दिसते. तसेच थोडे पुढे गेले की दुधानेवाडी गावातुन सुद्धा एक रस्ता आहे. दुधानेवाडीत कांगोरी नाथाचे एक मंदिर आहे. गावातल्या लोकांनी त्यांच्या सोयीसाठी हे मंदिर बांधले आहे. महाडला पोचायला वरंधा घाटमार्गे तसेच ताम्हिणी मार्गे सुद्धा रस्ता आहे. ताम्हिणीला आपण सारखेच जात असतो आणि वरंधा घाटातून बऱ्याच दिवसात गेलो नव्हतो. म्हणुन आम्ही वरंधा घाटाचा रस्ता निवडला आणि निघालो.



पुण्यातुन निघेपर्येंत आम्हाला ६.३० वाजले. साधारणतः ७.१५ ते ७.३० च्या दरम्यान आम्ही भोर गावाजवळ असलेल्या येडवंती नदीच्या नेकलेस point जवळ पोचलो. येथे आम्ही थोडा वेळ आराम केला, येडवंती नदीचे छायाचित्र टिपले आणि पुढे निघालो. भोर मध्येच नाश्ता करून आम्ही वरंधा घाटाच्या मार्गे निघालो. वरंधा घाटातुन जाताना आजुबाजूचा परिसर, हिरवळ, धबधबे मनाला प्रसन्नता देतात. वरंधा घाटात भाजी point जवळ आम्ही उतरलो. येथेच वाघजाई देवीचे प्रसिद्ध असे खूप जुने मंदिर आहे. या मंदिराचे आम्ही दर्शन घेतले आणि धबधब्यांची छायाचित्र टिपायला सुरुवात केली. वरंधा घाटातुन समोरच कावळ्या किल्ला दिसतो. वाजीसारखा दिसणारा ह्याचा देखणा बुरुज आणि त्याचा कातळकडा आपले लक्ष वेधुन घेतो.



बऱ्याच दिवसांपासुन हा किल्ला बघायचं मनात होतेच. कावळ्या किल्ला हा वरंधा घाट आणि परिसर यावर लक्ष ठेवण्यास बांधला गेला होता. ह्या किल्ल्यावर आमचे लक्ष जाताच आम्ही ठरवले हा किल्ला बघुनच पुढे जायचं. वरंधा घाटाच्या माथ्यावरून या किल्ल्यावर पोहोचायला १५-२० मिनिटे लागतात. आम्ही पट-पट चालत हा किल्ला सर केला. किल्ल्यावर बघायला हा वाजीरासारखा दिसणारा बुरुज आहे, त्याला आम्ही आमच्या सोयीसाठी वरंध बुरुज नाव दिले. किल्ल्याच्या दुसर्या टोकावर लांबवर पसरलेली एक माची दिसते. आमच्याजवळ त्या माची पर्येंत जाण्याइतका वेळ नव्हता. वरंध बुरुज बघुन आम्ही खाली उतरलो आणि मंगळगडाच्या दिशेने निघालो.







आता ९ वाजले होते. रस्त्यात बिरवाडी - खारवली - भिवघर - वाडघर - निगडे - रुपावली - पिंपळेवाडी ही गावे पालथी घालत ९.४५ वाजता दुधानेवाडी मध्ये पोहोचलो. येथे भाताच्या शेतीत एक शेतकरी इरले घेऊन काम करीत होता. बहुदा पेरणी करत असावा. आम्ही त्यांना आवाज दिला आणि ते आमच्या जवळ आले. आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. थोडी माहिती विचारली आणि तेंव्हा त्यांनी सांगितले कांगोरी नाथाचे हे मंदिर गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी बांधले आहे. त्यांनी आम्हाला वाट दाखवली. सर्वांनी आवरून कांगोरी नाथाचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाजुने जाणाऱ्या मळलेल्या वाटेने आम्ही साधारण १० वाजता गड चढायला सुरुवात केली. या वाटेने थोडे पुढे जाताच आपण मुळ वाटेला येऊन मिळतो. मुळ वाटेने थोडा पुढे गेल्यावर एक वाट उजवीकडे वळलेली दिसते. ह्या वाटेने गडावर लवकर पोहोचता येते. मुळ वाटेने सरळ गेल्यास पूर्ण वळसा घालून जावे लागते. आम्ही उजवीकडची वाट पकडली आणि निघालो. 



या मार्गे साधारण अर्धा ते पाऊण तास चढाई केल्यावर गडाखालचा एक कातळटप्पा आपल्या छातीवर आलेला आपणास दिसतो. येथून मळलेल्या वाटेने डोंगराला वळसा घालून, गवत वाढलेल्या पायवाटेने आपण एक पठारावर येऊन पोहोचतो. येथुन दिसणारे दृश्य मनाला शांतता देते. या पठारावर आडवं होऊन वाऱ्याच्या झोक्याने झुलणारे गवत, समोर कोसळणारे धबधबे, लांबवर दिसणारी कुंटी तसेच गडाला वळसा घालून येणारी मुळ वाट बघायची मजाच निराळी आहे. तसेच वाटेत लागणारी जंगली फुले आणि कारवी आपले लक्ष वेधून घेते. आम्ही येथे थोडा वेळ आराम केला. निसर्गाचे छायाचित्र टिपले. येथुन  १५ - २० मिनिटे पुढे गेल्यावर आपण नवरा - नवरीच्या सुळक्यांच्या कातळटप्प्यात येऊन पोहोचतो. येथून पुढे डाव्या बाजुस जाणारी वाट पकडावी, गडाचा डोंगर उजव्या बाजुस ठेऊन चढाई सुरु करावी. या मार्गे आपण झाडी आणि कारवीच्या जंगलातुन आणि शेवटी तुटक्या, ओबड - धोबड पायऱ्यांनी गडाच्या महादरवाज्यापाशी येऊन पोहोचतो. जंगलातून येताना दमछाक झाल्यावर  महादरवाज्यापाशी वाऱ्याचा आनंद अनुभवायची मजाच निराळी.


Kangorinath Mandirache Darshan




महादरवाज्यापासुन सरळ जाणारी वाट कांगोरी नाथाच्या मंदिराकडे जाते तर उजवीकडे वळसा घालून गेलेली वाट बालेकिल्ल्यावर जाते. आम्ही येथुन प्रथम कांगोरी नाथाच्या मंदिराकडे जायचे ठरवले. या नुकताच भरपुर पाऊस झाला असल्यामुळे गावात खूप वाढले होते. आम्ही या गवतामधुन वाट काढत पुढे निघालो. वाटेत दोन पाण्याची टाके लागतात. एक कोरडे आहे तर एका मध्ये पाण्याचा साठ आहे. हे पाणी डोळ्यास गढूळ दिसत असले तरी पिण्याजोगे आहे. आम्ही पुढे मंदिरापाशी गेलो. मंदिराच्या बाहेरच ध्वज फडकताना दिसतो. मंदिराच्या गाभाऱ्यात प्राचीनकालीन मुर्त्या आहेत. यातील एक मूर्ती कांगोरीनाथाची असुन त्याचा हातात नाग असल्याचे दृष्टीस पडते. मंदिरामध्ये दरवर्षी मोठी यात्रा भरते. यामुळे गावातल्या लोकांनी यासाठी लागणारी पातेली, घागर आदि साहित्य येथे ठेवली आहेत. गडावर मुक्काम करण्याजोगे अडोश्याच स्थान नाही. मुक्काम करावयचा असल्यास मंदिरासमोर उघड्यावर झोपता येते. मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. ध्वजासामोरच घोषणा दिली आणि मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या माचीवर निघालो. या माची वरूनच समोर चंद्रगडाचे दर्शन होते.



आम्ही कांगोरी नाथाचे दर्शन घेऊन परत महादरवाज्यापाशी परतलो. येथे थोडी विश्रांती घेऊन आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. पण केतकीला शिवथरघळ बघायची असल्याने आम्ही माघारी फिरलो. पण गोळा केलेल्या माहिती नुसार बालेकिल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष दिसतात तसेच वरच्या बाजूस एक पाण्याचे तळे आहे. बालेकिल्ल्यावरून महादेव - मुऱ्हा डोंगर, प्रतापगड आणि मकरंदगडाचे तसेच रायरेश्वर - कोळेश्वर डोंगरांचे दर्शन होते. साधारण १.३० वाजता आम्ही दुधाने वाडीच्या मार्गे निघालो. सर - सर खाली उतरत २.३० वाजता आम्ही दुधाने वाडी मध्ये परतलो आणि महाड मार्गे निघालो.


३.३० वाजता आम्ही शिवथरघळीत पोहोचलो. शिवथर घळीला केळद वरून यायला ट्रेक रूट आहे. येथे स्वामी समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे. येथे असलेला धबधबा मनाला प्रसन्नता देतो. हल्ली येथे एवढ्या मोठ्या अएतिहासिक ठिकाणी लोक दारू पिऊन आणि दंगे घालून थिल्लरपणा करतात. तसेच दारू पिऊन आत घळीपर्येंत येतात. आम्ही येथे पटापट या स्थळाचे दर्शन घेतले आणि परतीच्या मार्गी लागलो. साधारण ७ वाजता घरी पोहोचुन आम्ही आमच्या ट्रेकची सांगता केली.





- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)