साल्हेर - सालोटा - मुल्हेर - मोरा (दिवस तिसरा)



दिवस तिसरा (४ ऑक्टोबर २०१५) : रामशेज किल्ला


रामशेज किल्ला


गुहेतील पिंड आणि नंदी
पहाटेचे ५ वाजले होते. बाहेर अजुन अंधारलेल होत. गोड गुलाबी थंडी म्हणतात तशी ती आमच्या पांघरुणात शिरत होती. उठायची इच्छा होत नव्हती, पण आज आम्हाला रामशेज किल्ला पुर्ण करून घरी परत जायचे होते. वेळ कमी होताच आणि दुसरा पर्यायही नव्हता. या विचारानेच आम्ही सगळा आळस झटकुन ताडकन उभे राहिलो. स्लीपिंग bag आणि बाकीचे साहित्य आम्ही पटापट आवरायला घेतले. रामशेज हा किल्ला पार्वती एवढ्या उंचीचा असला तरी तो निट आणि शांतपणे बघायला आम्हाला २ तास लागणारच होते. आमच्याजवळ असलेले पाणी संपले होते. तेवढ्यात गावातील एक मावशी आम्हाला जाताना दिसल्या. त्यांच्याकडुन आम्हाला भरपूर पाणी मिळाले. रात्री ज्यांच्या कडुन आम्हाला गोधड्या मिळाल्या होत्या त्या त्यांना परत केल्या. सांगायचं राहील की या हनुमंताच्या मंदिरात वरच्या बाजुस एक वाचनालय आहे. त्या मावशींकडून पाणी भरून घेतले. सकाळचे सगळे विधी पुर्ण झाले. आता चहा प्यायची सगळ्यांना खूप इच्छा झाली होती. पण परत स्टोव्ह काढा आणि त्यात एवढा वेळ घालवा यासाठी आम्हाला वेळ अपुरा पडणार होता कारण संध्याकाळी ५ च्या आत घरी पोहोचायचे होते. आता सकाळचे ७ वाजले होते. सगळे जण आवरून तयार झाले होते. रिकाम्या पोटी ट्रेक करून नये म्हणुन आम्ही फक्त बिस्कीट आणि खजुराचा आहार करून गडाच्या दिशेने हालचाल केली. मंदिराच्या बाजूस असलेल्या डांबरी रत्याने सरळ गेल्यावर डाव्या बाजुस एक चिंचेच झाड आहे, येथुन मळलेली वाट थेट किल्ल्यावर जाते. चला आता या झाडापर्येंत पोहोचेस्तोर तुम्हाला रामशेज किल्ल्याची माहिती देतो.


रामशेज किल्ल्यावरील एक दरवाजा
रामशेज म्हणजे रामाची शय्या. राम वनवासात होते तेंव्हा त्यांनी या किल्ल्याला भेट दिली होती अशी आख्यायिका आहे. रामशेज किल्ला छोटा असला तरी छत्रपती संभाजीराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा मोठा आणि अद्भुत इतिहास आहे. १६८२ मध्ये मोगली सैन्याचा सेनापती शहाबुद्दीन फिरोजजंगने रामशेज जिंकण्याकरिता वेढा घातला. त्यावेळी गडावर केवळ ६०० मावळे गडराखणीस उभे होते. बघता बघता ५० हजार मोगली सैन्याने हा वेढा करकचून आवळला. गडावर तोफा नव्हत्या, मोगल जसजसे गडाकडे सरकु लागले तशी अचानक गडावरून दगडांची अतिश्बडी सुरु झाली. शहाबुद्दीनचा तोफखाना धडाडू लागला. पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या. किल्लेदाराने सुताराकडून लाकडी तोफा बनवून घेतल्या आणि त्याला आतील बाजूस अस्तर लावले. या तोफांमध्ये दारुगोळा भरून मोगलांवर हल्ला चढवण्यात आला. आता एक तोफसुद्धा मोगलांना भारी पडु लागली. शेवटी शहाबुद्दीनने रामशेज शेजारील टेकडीवर रामशेज पेक्षा उंच लाकडी बुरुज (दमदमा) उभा केला. त्यावरून हल्ला केला पण तोही व्यर्थ ठरला. शेवटी औरंगजेबाने शहाबुद्दीनला परत बोलावून बहादुरखानास पाठवले, पण औरंगजेबाचा हा प्रयत्न पण व्यर्थ ठरला. मग त्याने पुढे किरमाणी नावाच्या सरदाराला पाठवले पण रामशेजच्या किल्लेदाराने त्यालाही हुड्कावून लावले. एकटा किल्लेदार औरंगजेबाच्या सर्व सरदारांना पुरून उरला. दुर्दैवाने या किल्लेदाराचे नाव इतिहासात उपलब्ध नाही. पण शंभुराजाने किल्लेदाराचा पोशाख, रत्नजडीत सोन्याचे कडे घालून सत्कार केल्याची नोंद इतिहासात आहे. अशा प्रकारे या किल्ल्याने मोगलांशी ५ वर्षे झुंज दिली. पुढे हा किल्ला १६८७ मध्ये मोगलांनी जिंकला. नंतर पेशवाई मध्ये हा किल्ला परत मराठ्यांच्या ताब्यात आला. रामशेज किल्ल्यावर पोहोचण्यासाठी नाशिक शहराच्या ५ किमी अलीकडे पेठ फाटा लागतो या मार्गाने जावे लागते. 


रामशेज माची
साधारण पाऊण तासाच्या प्रवासनंतर आशेवाडीचा फाटा लागतो. येथून उजवीकडे एक फाटा जातो तो सरळ मारुती मंदिरापाशी येतो. या मंदिराच्या बाजूने पायवाट सुरु होते. येथून आपण पायवाट आणि पायऱ्या यांच्या मार्गे अर्ध्या तासात गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचतो. येथे उजवीकडे एक गुहा आहे ज्यात कुंडात वसलेले महादेवाचे पिंड व नंदी आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर शेजारील कड्यात रामाचे सुरेख मंदिर आहे. येथे आपण मुक्काम करू शकतो. या मंदिराच्या डाव्या बाजूस खाली उतरून भुयारी टाके आहे. येथून वरच्या बाजूस आल्यावर आपल्याला समोरच गडाची माची दिसते. येथे माचीवर एक पाण्याचे टाक आणि ध्वजस्तंभ आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर दोन धान्याची कोठारे, पाण्याची टाके आणि भगवती मातेचे मंदिर आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून सातमाळ रांग, त्र्यंबकरांग आणि भोरगड दिसतात. गडावर उत्खननाचे काम सुरु असून त्यातुन कातळकोरीव पायऱ्या, प्रवेशदार, चोर दरवाजा, दोन भव्य गुहा असे बरेच दुर्गअवशेष उजेडात आले आहेत.




रामाचे मंदिर




चोर दरवाज्याची वाट
सकाळी साडेसात वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली. आमच्या सोबत बरीच चिमुरडी आणि त्यांचे बाबा लोकं किल्ला बघायला आले होते. आम्ही सगळे एकत्रच वर निघालो. दोन दिवस एवढी दमछाक होऊन सुद्धा हा किल्ला चढताना काहीच वाटत नव्हतं. सर्व शीण, आळस, कंटाळा सर्व लांबवर पळाल होत. आम्ही सर्व चिमुरड्यांना घेऊन सर सर वर चढत अर्ध्या तासात किल्ल्याचा दरवाज्यापाशी पोहोचलो. येथे उजव्या बाजूस एक गुहा असुन या गुहेत पाण्याचे कुंड आहे. या कुंडच्या मध्यस्ती महादेवाची पिंड आणि नंदी आहे. तसेच गुहेच्या बाहेर उजव्या बाजुस उघड्यावरच एक महादेवाची पिंड आहे. या गुहेच्या वरच्या बाजूस नजर टाकली असता वरून काही पायऱ्यांचा मार्ग आलेला आपणास दिसतो आणि तो गुहेच्या वरच्या बाजुस संपतो. या मार्गावर यायला गडाच्या वरच्या  बाजूस असलेल्या चोर दरवाज्याने येत येते. या पिंडींचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. दरवाज्यातून आत शिरल्यावर रामाचे मंदिर आहे. आम्ही ते येताना बघणार होतो. आम्ही पुढे गडाच्या माथ्यावर गेलो. येथे समोरच एक दरवाजा आहे तो उतरून खाली जाता येते. खाली उतरून गेल्यावर आपल्याया चोर दरवाज्याचे दर्शन होते. तसेच येथे मोठ्या गुहा आहेत आणि या गुहांच्या आतुनच चोर मार्ग आहे. हे सर्व बघुन आम्ही उलटे फिरलो. वरती परत आल्यावर उजव्या बाजुस एक वाट सरळ गडाच्या माचीवर जाते. या माचीवर असलेल्या ध्वजस्तंभाला आम्ही वंदन केले. येथे जवळच एक पाण्याचे टाके आहे, ते बघुन येथे थोडा वेळ फोटोग्राफी केली. परत उलटे फिरून मुख्य माथ्यावर आलो. येथे आम्ही सगळ्यांसोबत खणखणीत आवाजात घोषणा दिली. घोषणा दिली कि आवाज घुमलाच पाहिजे. अंगात संचारालच पाहिजे. घोषणा देऊन आम्ही गडाच्या माथ्यावर न जाता उजव्या हाताने सरळ गेलो. येथे दोन भव्य दरवाजे आपल्या नजरेस येतात. 



रामशेजवरील पाण्याचे टाके
दरवाज्याचे बांधकाम खूपच सुरेख असून यावर अतिशय सुंदर अशी शिल्प कोरलेली आहेत. या दोन दरवाजांच्या मधूनच एक वाट खाली भूयाऱ्याकडे जाते. या मार्गे आत शिरले असता सुरुवातीला लागलेल्या गुहेच्या वरच्या बाजुस आपण येतो. येथून पण कुंड व महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते. एवढे सर्व बघून आम्ही परत मुख्य माथ्यावर आलो. येथुन आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर असलेल भगवती देवीच मंदिर बघितलं आणि परतीच्या वाटेस लागलो. आता ८.४५ वाजले होते. आम्ही पटापट रामाच्या मंदिरापाशी आलो. येथे साधारण ३० लोकांची राहायची सोय अगदी सहज होऊ शकते. येथे रामाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही खालील बाजुस असलेल्या भुयारी टाक्याकडे वळलो. या टाक्यातील सुमधुर पाण्याचा आस्वाद घेऊन आम्ही परतीच्या मार्गी लागलो. साधारण ९.३० वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. १० पर्येंत सर्व सामान आवरून आम्ही परतीच्या (पुण्याच्या) मार्गी लागलो. मग मध्ये एका ठिकाणी थांबुन बेचव मिसळ खाल्ली. खुप भूक लागल्याने ती सुद्धा पटापट संपली. दुपारी २ वाजता पुरोहित हॉटेल पाशी थांबुन आम्ही आमचे जेवण करून घेतले आणि ३.३० वाजता घरी परत पोहोचुन आम्ही आमच्या ट्रेकची सांगता केली.






- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)




साल्हेर - सालोटा - मुल्हेर - मोरा (दिवस दुसरा)


दिवस दुसरा (३ ऑक्टोबर २०१५) : साल्हेर आणि सालोटा





साल्हेर - सालोट्याचे पहिल्या पठारावरून दर्शन


साल्हेरचा पहिला दरवाजा आणि पायऱ्या
परवा दिवसभर झोप न झाल्याने काल रात्री छान झोप लागेल असे वाटले होते, पण ट्रेकला आल्यावर कसली झोप लागतीये. जेमतेम ५ तास झोप झाल्यावर आज सकाळी ५ वाजता खडबडुन जाग आली. जाऊन driver सकट सगळ्यांना उठवलं आणि पटापट आवरायला सांगितलं. सकाळी ६.१५ पर्येंत सगळ्यांनी आवरून आम्ही परत शुक्लाजींकडे नाश्ता करायला गेलो. पटापट नाश्ता करून आम्ही वाघंबे गावाच्या दिशेने निघालो. वाघंबेच्या दिशेने जाताना डाव्या बाजुस दिसणारे मुल्हेर, हरगड मागे मागे सरत चालले होते. ७.४५ वाजता आम्ही वाघंबे गावात पोहोचलो. या गावातील चंद्रकांत महाले काका आमच्या सोबत गडावर यायला आणि आम्हाला वाट दाखवायला तयार झाले. कालच्या मुल्हेरच्या अनुभवावरून आम्हाला या वेळेस वाट चुकून वेळ घालवायचा नव्हता. सकाळी ८ वाजता सुद्धा सुर्य डोकावला नव्हता. 


साल्हेरवरील गंगासागर तलाव
सगळीकडे धुकं पसरले होते. शांत, थंड आणि प्रसन्न असे वातावरण पसरले होते. काल पाऊस होऊन गेल्यामुळे माती चांगलीच बसली होती. आजपण पावसाचे सावट होतेच. काळे ढग डोक्यावर गिरक्या घालत होते. आजही मनात कुठेतरी वाटत होत, जर पाऊस आला तर आपला सालोता किल्ला काही बघुन होणार नाही. काल आलेल्या लोकांकडुन कळाले होते कि सालोटयावर जाणारी वाट बंद झाली आहे. ८ वाजले आणि आता आम्ही निघायला सज्ज झालो. समोर एका डोंगराच्या पल्याड डावीकडे सालोटा तर उजवीकडे साल्हेर गडांची शिखरे दिसत होती. पार धुक्यात बुडाली होती. आभाळात उंचच्या उंच पसरली होती जणु. ह्या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये एक खिंड आहे. या खिंडीपर्येंत पोहोचण्यसाठी आधी तीन डोंगर आणि एक पठार पालथे घालावे लागतात. ह्या खिंडी पर्येंत पोहोचेपार्येंत निसर्ग आम्हाला त्याच्या निरनिराळ्या छटा, त्याचे निरनिराळे रंग दाखवत होता. आजुबाजूला असलेली शेती, हिरवळ आणि सुंदरता कालचा शीण उतरवत होती. सगळ वातावरण अगदी आनंददायी आणि प्रसन्न होत. चला आता खिंडी पर्येंत पोहोचेपर्येंत तुम्हाला साल्हेर आणि सालोटा किल्ल्याची माहिती देतो.


साल्हेरच्या दुसऱ्या दरवाज्यातुन " सालोटा दर्शन "


दरवाज्यापाशी असलेला शिलालेख
१६७१ मध्ये शिवाजी राजांनी बागलाण प्रदेशाची अवघड मोहीम हाती घेतली होती. या गडाला वेढा टाकून हा किल्ला बळकावणे शक्य नसल्याने मावळ्यांनी कडा चढुनच ह्या किल्ल्यात समावेश केला आणि हा किल्ला स्वराज्यात समाविष्ट जाहला. या युद्धात किल्लेदार फत्तुलखान ठार झाला व साल्हेरवर भगवे निशाण फडकले. हा दिवस होता ५ जानेवारी १६७१. पुढे हा किल्ला परत बळकावण्यासाठी मोघलांनी या किल्ल्याला वेढा घातला. पण रणराज शिवराय, मोरोपंत आणि प्रतापराव गुजर यांनी तब्बल ४० हजार मराठ्यांनिशी हा किल्ला लढवला आणि मोघलांचा पाडाव केला. पण यावेळी या युद्धात शिवरायांचा मोठा धारकरी सूर्यराव काकडे जंबुरीयाचा गोळा लागून धारातीर्थी पडला. या संपूर्ण लढाईचे वर्णन सभासदाच्या बखरीत वाचायला मिळते. महाराष्ट्रात मोघलांवर तीन दशके झालेल्या रणसंग्रामात साल्हेरचे युद्ध प्रेरणात्मक होते. 


देवीचे मंदिर
साल्हेर हा किल्ला गुजरातमधील डांग आणि नाशिकमधील बागलाण या प्रदेशांच्या सीमेवर उभा आहे. ह्या किल्ल्याला महारष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या किल्ल्याचा मान जातो. तसेच याच्या सर्वोच्च माथ्यावर असलेल्या परशुराम मंदिराला कळसुबाई नंतरचे दुसरे सर्वोच्च शिखर असल्याचा मान आहे. डांग आणि बागलाण यांमधील दळणवळणाचे घाट राखण्याचे काम हा किल्ला करतो. वाघंबे कडुन चढताना या किल्ल्यावर आपल्याला ३ मोठे दरवाजे लागतात. यातील एका दरवाज्याच्या समोरील बाजुस काळ्या पाषाणात एक शिलालेख कोरलेला आहे. वरच्या बाजुस आल्यावर डाव्या बाजुस खूप साऱ्या गुहा आणि कोरडी पाण्याची टाकी आहेत. येथे आपली झोपायची सोय होऊ शकते. येथुन पुढे अजून एक दरवाजा लागतो आणि आपण गडावर प्रवेश करतो. वरच्या बाजुस दोन पाण्याची सुमधुर टाकी आहेत. समोरच गंगासागर तलाव आहे. ह्याच्या बाजुस एक गुहा आणि मंदिर आहे. तसेच तलावाच्या बाजुला यज्ञकुंड आहे. वरच्या बाजुस परशुरामाचे मंदिर आहे. तर साल्हेर च्या बाजूने वरती आल्यास तीन दरवाजे लागतात. त्यातील दुसऱ्या दरवाज्यात कमलपुष्पके कोरली आहेत. तसेच दरवाज्यापाशी शिलालेख कोरला आहे.


परशुराम मंदिरापासून सालोटा दर्शन


परशुराम मंदिर
सालोटा हा किल्ला साल्हेरला जोडदुर्ग असल्याने ज्या ज्या वेळी साल्हेर किल्ल्याचा ताबा शत्रु कडे गेला त्या त्या वेळी सालोता किल्ल्याचाही ताबा शत्रुकडे गेला. शिवरायांनी बागलाणच्या धडक मोहिमेत हा किल्ला स्वराज्यात समाविष्ट करून घेतला. पुढे हा किल्ला १६८२ साली मोघालांकडे गेला तर पेशवाईमध्ये हा किल्ला परत मराठ्यांच्या ताब्यात आला. सालोटा किल्ल्याला सर्वोच्च दुर्गशिखरांमध्ये दुसर्या क्रमांकाचे स्थान आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी एक पडका वाडा, भग्न मंदिर, उघड्यावर असलेले शिवलिंग, पादुका व मोठ्या दगडावर कोरलेले मौतीचे शिल्प आहे. तर माथ्यावर जाणार्या गुडघाभर पायऱ्या आहेत. समोरच कातळात खोदलेला दरवाजा आहे. हा दरवाजा पार केल्यावर पुढे गडाचा दुसरा दरवाजा लागतो. उजव्या बाजुस पाण्याची टाके, छोट - छोट्या गुहा आणि दुर्गावशेष आहेत. पुढे तिसरा दरवाजा पार करून गेल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. सर्वोच्च माथ्यावर बघण्यासारखे फारसे काही नाही.



साल्हेर माची


सालोटा दरवाजा आणि त्यावरील देवडी
आता तब्बल १.३० तासांच्या परिश्रमानंतर आम्ही साल्हेर आणि सालोटा यांमधील खिंडीत येउन पोहोचलो. या खिंडीमधून उजवीकडे जाणारी वाट साल्हेर किल्ल्यावर जाते तर डावीकडे जाणारी वाट सालोटा किल्ल्यावर जाते. आम्ही आधी साल्हेर किल्ला बघायचे ठरवले आणि उजव्या वाटेने सरळ निघालो. पहिला वळसा घातल्यावर समोर लांबवर गडाचा पहिला दरवाजा नजरेस येतो. हा नजारा खूप सुंदर आहे. उजव्या बाजूस खिंड आणि समोर दरवाजा. या दरवाज्यापाशी आम्ही थोडा वेळ आराम केला आणि पुढे निघालो. येथून पुढे पायऱ्यांच्या मार्गे सरळ चढाई सुरु होते. येथून थोडंस पुढे गेला की आपण गडाच्या दुसऱ्या दरवाज्यापाशी येउन पोहोचतो. येथून वाट थोडी सरळ जाते आणि परत वरच्या बाजूस सरळ चढते. या वाटेने सरळ गेल्यावर आपण गडाच्या तिसऱ्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचतो. येथे समोरच एक शिलालेख कोरला असल्याचे लक्षात येते. तर मागील बाजुस वळून पहिले असता नजरेस भिडलेला सालोटा किल्ला खद दिसतो. आम्ही येथे परत थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुढे निघालो. या दरवाज्यातुन पुढे सरळ गेल्यावर डाव्या बाजुस भरपूर गुहा, कोरडी पाण्याची टाकी आणि दुर्गावशेष नजरेस येतात. येथे साधारण ३०-४० लोकांची राहण्याची सोय सहज होऊ शकते. येथे थोडा वेळ आम्ही फोटोग्राफी करून साल निघालो. पुढे डाव्या बाजूस गडाचा शेवटचा दरवाजा लागतो. या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर आपण गडाच्या माथ्यावर मोकळ्या पठारावर पोहोचतो. येथे परत आम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊन उजव्या बाजूस असलेल्या वाटेने सरळ निघालो. या वाटेने पुढे आपल्याला गंगासागर तलाव, दोन पाण्याची टाके, गुहा आणि मंदिर लागते. दर बारा वर्षांनी येथे गंगा प्रकटते अशी आख्यायिका आहे. येथे अर्धा ते पाऊण तास आराम केला. मनसोक्त पाणी प्यायलो. सगळ्यांनी बाटल्या भरून घेतल्या. 



सालोट्यावरील गुहा आणि पाण्याची टाके
समोरच असेलेले यज्ञकुंड बघितले आणि गुहेच्या बाजूस असलेल्या वाटेने निघालो ते परशुराम मंदिराकडे. या वाटेने जाताना एक मंदिर लागते. या मंदिरात देवीची आणि गणेशाची मुर्ती आहे. या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. लांब पठार पार करून आम्ही परशुराम मंदिरात दाखल झालो. येथे आम्ही अर्धा तास आराम केला. येथुन साल्हेर माचीचे सुंदर दर्शन होते. आतापर्येंत १ वाजला होता. सगळ्यांना भुक लागल्या होत्या. आम्ही परशुराम मंदिराचे दर्शन घेतले आणि पटापट खाली निघालो. खाली असलेल्या तिसऱ्या दरवाज्यापाशी आम्ही थांबलो. येथे आमच्या जवळ असलेल्या पराठे, पुऱ्या, खाकरे आदि गोष्टींवर ताव मारला आणि जेवण उरकुन पुढे निघालो. पुढच्या अर्ध्या तासात आम्ही खिंडीत येऊन दाखल झालो.



एका पठारावर निवांत चरत असताना



आता १.५० वाजले होते. खुप मोठ्या परिश्रमानंतर आम्ही खिंडीत येऊन पोहोचलो आणि लक्षात आले आपण परशुराम मंदिरापाशी घोषणा दिली नाही. पण हरकत नाही असं म्हणत खणखणीत आवाजात आम्ही घोषणा दिली. जयजयकर झाला. अंगावर चढलेली मरगळ उतरून गेली आणि पुन्हा एकदा अंगात संचारल. स्फूर्ती चढली आणि आम्ही सालोटयाच्या दिशेने हालचाल सुरु केली. महाले काका आमच्या सोबत होतेच, पण तेही वर्षभराने या किल्ल्यावर येत होते. त्यामुळे वाट सापडणे अवघडच होते. काळ आलेले तिनही समुह, तसेच साल्हेरवर भेटलेला अजून एक समुह यांना ह्या किल्ल्याची वाट सापडली नव्हती. सालोटा किल्ला पूर्ण करणाराha आमचा पहिलाच समुह होता. आम्ही मळलेल्या वाटेने पुढे निघालो. पुढे कारवीच्या झाडीतून वाट काढत आम्ही सरळ निघालो. मग एका मोकळ्या पठारावर पोहोचल्यावर गड माथ्यावर असलेल्या कातळकड्याचे ध्येय समोर ठेऊन सरळ चढाई सुरु केली. थोड्याच वेळात गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या. गुडघाभर अश्या या पायऱ्या जवळपास १०० एक असतील. त्या पार करत आम्ही गडाच्या कातळात कोरलेल्या दरवाज्यापाशी पोहोचलो. इंग्रजांच्या अवकृपेमुळे यामागील कातळाची पडझड झाली आहे. या दगडांमधून आम्ही वाट काढत पुढे निघालो. समोरच कातळात कोरलेला अजून एक दरवाजा नजरेस येतो. या दरवाज्यातून प्रवेश करून आम्ही आत गेलो. मागे वळून बघितले तर दरवाज्याच्या वरच्या बाजूस देवडी बांधली आहे. देवडी म्हणजे पहारेकारांच्या झोपण्याची जागा. एरवी ती दरवाज्याच्या दोन्ही बाजूस असते. पण या दरवाज्यात जागा नसल्याने याची रचना या दरवाज्याच्या वरच्या बाजूस आहे. येथून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस कातळात गुहा, दुर्गवशेष, कोरडी टाके आहेत. 



हे बघून अमी पुढे निघालो. पुढे असलेल्या गडाच्या तिसऱ्या दरवाज्यातून आत प्रवेश करून आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर दाखल झालो. येथे दारुगोळ्याचा एक प्रकार, मारुतीचे सुंदर शिल्प आणि पदके अवशेष नजरेस येतात. आता पर्येंत ३.३० झाले होते. आता आम्ही पटापट उतरायला लागलो. साधारण ५.३० वाजता आम्ही वाघंबे गावात पोहोचलो. येथून आम्ही थोडा वेळ दवडून मांगी तुंगी च्या दिशेने निघालो. उशीर झाला असल्या कारणाने आम्ही पायथ्याशी असलेल्या मंदिराचे दर्शन घेतले आणि रामशेज किल्ल्याच्या दिशेने रवाना झालो. रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी एक हनुमंताचे खूप मोठे व सुंदर मंदिर आहे. येहते आम्ही मुक्कामास थांबलो. मग आमच्या जवळ असलेला स्टोव्ह आणि शिधेचे साहित्य बाहेर काढले. मस्त पैकी खिचडी आणि noodles बनवुन जेवणाचा आस्वाद घेतला. दिवसभर झालेल्या परिश्रमानंतर रात्री मंदिराच्या गाभाऱ्यात शांत झोप लागली. आता आस लागली होती उद्याची म्हणजेच रामशेज किल्ल्याची.





- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)






साल्हेर - सालोटा - मुल्हेर - मोरा (दिवस पहिला)


दिवस पहिला (२ ऑक्टोबर २०१५) : मुल्हेर आणि मोरा



डावीकडून (मोरा - मुल्हेर - हरगड)

एका महिन्यावर २ ऑक्टोबर आला होता. नेमका शुक्रवार असल्याने जोडून सुट्टी आली होती. चांगलीच संधी चालुन आली होती. नजर किल्ल्यांचा शोध घेत फिरत होती. ३ दिवस हातात होते, कुठले गड फिरुयात असा विचार करत असतानाच अचानक नजर पडली बागलाण मुलखावर. होय! महाराष्ट्रातील सर्वात मोठे किल्ले साल्हेर - सालोटा आणि त्यांच्याच जोडीला मुल्हेर आणि मोरा. या बागलाण मुलुखातील किल्ल्यांना भेट द्यायचीच असे ठरवले. बस्सं ! मग काय, ठरलंच. माळ्यावर धुळ खात पडलेला टेंट, स्लीपिंग bag, sack काढायची आता वेळ झाली होती. सगळ्या गोष्टींची जमवा - जमाव सुरु झाली. सवंगडींना विचारपूस सुरु झाली. या किल्ल्यांना भेट द्यायचीच असे मनाशी ठरवले. सगळ्यांना विचारत - विचारत शेवटी आम्ही ६ जण तयार झालो. गाडी ठरवली. दिवस जाता जात नव्हते. १ ऑक्टोबरची आस लागली होती. 


मुल्हेरचा दरवाजा
ठरलं! १ ऑक्टोबरला रात्री निघायचं. आदल्या दिवशी समीरदादाकडून स्टोव्ह आणि पातेल आणलं. सर्व जणांना शिधा-खाद्य पदार्थाचं साहित्य वाटुन दिलं होतं. अखेरीस ज्या दिवसाची आस लागलेली तो दिवस उजाडला. होय ! १ ऑक्टोबर. ठरल्याप्रमाणे केतकी, अश्विनी, रवींद्र, विवेक आणि ओंकार माझ्याकडे रात्री ८.३० वाजता जमले. बाहेर जोरदार पाऊस चालु होता. ९ वाजता गाडी आली आणि सगळ आवरून आम्हाला निघायला ९.३० झाले. पाऊस अजुनही कोसळतच होता. एकदा मनात विचार आला तिकडेही असाच पाऊस असेल तर? पण नाही, आता माघार नाही. आम्ही मनाशी पूर्ण निर्णय करूनच निघालो. बागलाण प्रदेशात जायला सटाणा गावावरून जाता येते. सटाणा पर्येंत जायला नाशिक मार्गे आणि मनमाड मार्गे जाता येते. आम्ही मनमाड मार्गे निघालो. आमचा driver खुप हळू चालला होता. 


मुल्हेर पदारातील गणेश मंदिर
मजल दरमजल करत आम्ही रात्री २.३० वाजता शिर्डीमध्ये पोचलो. रस्त्याच्या कडेलाच चहाची एक हातगाडी उभी होती. आम्ही पटापट चहा आणि दुध पिउन पुढे निघालो. मनमाडला पोहोचताच उजव्या बाजूस अंधारातच आम्हाला अंकाई किल्ल्याचे दर्शन झाले. ते बघुन आम्ही पुढे निघालो. अखेरीस सकाळी ६ वाजता आम्ही मुल्हेर गावात पोहोचलो. होय! आम्ही ठरवले होते आधी मुल्हेर - मोरा करूयात. मी आणि ओंकार एकही मिनिट झोपलो नव्हतो. आता आराम करायला वेळ नव्हता. आम्ही मुल्हेर गावात उद्धव महाराजांच्या आश्रमात उतरलो. तिथे पटापट आवरून आम्ही शुक्लाजींकडे नाश्ता करायला आलो. पटापट नाश्ता उरकला, दुपारच्या जेवणाचा डबा घेतला, थोडीशी माहिती घेऊन आम्ही मुल्हेर गडाच्या दिशेने निघालो. एवढ्यात आमची गाडी खराब झालेली म्हणुन आम्हाला मुल्हेरच्या पायथ्यापर्येंत चालत जावे लागले. चला आता गडापर्येंत पोहोचेपर्येंत मुल्हेर-मोरा विषयी थोडीशी माहिती देतो.


गणेश मंदिरातील महादेव व गणेशाची मुर्ती
मुल्हेर हा किल्ला बागुलवंशीय घराण्याने बांधला असा इतिहास आहे. या घराण्यावरूनच या मुलुखाला बागलाण असे नाव पडले. बागुल म्हणजे मुळचे कनोज येथील. मागुली राजा हा या घराण्याचा पुर्वज. त्याच्या काळात तलवारीच्या मुठीचा घाट सुरु झाला. ती मुल्हेरी मुठ म्हणुन हिंदुस्तानात प्रसिद्ध आहे. या घराण्यात अकरा राजा होऊन गेले. या अकरा राजांनंतर हा किल्ला मोघालांकडे गेला. १६६४ आणि १६७० मधील सुरत लुटेसाठी शिवाजी राजांनी ह्या प्रदेशाचा उपयोग केला. पण ह्या काळात महाराजांना हा किल्ला जिंकता आला नाही. पण १६७२ मध्ये पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारून हा किल्ला राजांनी काबीज केला आणि संपुर्ण बागलाण प्रदेश स्वराज्यात समाविष्ट करून घेतला. 


मुल्हेर पदारातील "मोती टाके"
मुल्हेर आणि मोरा हे जोड किल्ले असुन मोरा किल्ल्यावर बघायला भव्य दरवाजा, पायऱ्या आणि एक टाके आहे. या किल्ल्यांच्या पदरात खुप काही बघण्य सारखे आहे. सुरुवातीला आपण ३ दरवाज्यातून प्रवेश करतो. वरच्या बाजुस एक गणेश मंदिर आहे. गणेश मंदिराच्या मागील बाजुने गेल्यावर रामेश्वर मंदिर लागते. थोडे वरच्या बाजुस गेल्यावर हत्ती आणि मोती टाके लागतात. मोती टाक्यापासून सरळ गेल्यावर सोमेश्वरचे मंदिर लागते. सोमेश्वर मंदिराच्या येथे वरच्या बाजुस गुलाब टाके लागते, तसेच थोडे पुढे महिषासुर्मार्दिनी देवीची मुर्ती लागते. मुल्हेर किल्ल्याच्या माथ्यावर ५-६ टाके आहेत, भव्य दरवाजे आहेत, गुहा आहेत, पहारेकऱ्यांसाठी देवडी आहे, हनुमंताची कातळात कोरलेली मुर्ती आहे आणि भडंगनाथाचे मंदिर आहे.


सोमेश्वर मंदिर

आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. येथे मोठे वृक्ष आहे आणि कृत्रिम झोपडी आहे. येथुन सरळ कच्चा रस्ता वर गडाकडे जातो. आम्ही या वाटेने निघालो. अर्धा तास चालल्यावर आम्ही किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचलो. हा दरवाजा पडक्या अवस्थेत आहे. येथून थोडंस पुढे गेल्यावर आपण दुसऱ्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचतो. हा दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे. थोडंसच पुढे तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा ओलांडला की आपण किल्ल्याच्या पदरात असलेल्या गणेश मंदिरापर्येंत पोहोचतो. ह्या मंदिराचे रूप काहीसे वेगळेच आहे. आतमध्ये गणेशाची मुर्ती आणि समोरच महादेवाच पिंड आहे. ह्या मंदिरात थोडा वेळ आराम करून आम्ही पुढे निघालो. 


रामेश्वर मंदिर
सरळ गेल्यावर आम्ही हत्ती टाके आणि मोती ताक्यापाशी येउन पोहोचलो. यातील हत्ती टाके कोरडे असुन मोती टाक्यातील पाणी पिण्याजोगे आहे. शुक्लाजींच्या मताप्रमाणे या टाक्यात दगड सोडला असता तो मोत्यासारखा पाण्यात जाताना दिसतो एवढे स्वच्छा टाके आहे. गडावर बाकी कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने याच टाक्यातुन भरपूर पाणी भरून घ्यावे. ही दोन टाके बघुन आम्ही सोमेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो. पण वाट न मिळाल्याने आम्ही ४५ मिनिटे तिथेच भटकत बसलो. तेवढ्यात मी आणि ओंकारने एक आवाज ऐकला आणि एक मिनिट शांतता पसरली. दोघांनी एकमेकांकडे बघितले. होय! परत एकदा डरकाळीसारखा आवाज आला. आम्ही पटापट उलटे फिरून मोती टाक्याकडे आलो. 


मुल्हेर किल्ल्यावरील गुहा


मुल्हेर वरील पाण्याचे टाके
वर जायला वाट सापडत नव्हती. समोर दिसत असलेल्या कातळाचे उद्दिष्ट समोर ठेऊन आम्ही सरळ चढाई सुरु केली. तेवढ्यात एक गुराखी धावत आमच्या जवळ आला आणि त्याने आम्हाला वाटेला लावुन दिले. अश्या प्रकारे मजल - दरमजल करत आम्ही पहिल्या दरवाज्यापाशी पोहोचलो. येथे उजव्या बाजुस कातळात कोरलेली हनुमंताची मुर्ती आपल्या दृष्टीस येते. येथील तटबंदी, किल्ल्याचे बांधकाम बघुन थक्क व्हायला होत. थोड वरच्या बाजुस गेल्यावर डाव्या बाजुस गुहा आहे. येथे मुक्काम करता येऊ शकतो. साधारण ५० ते ६० लोकं झोपु शकतील एवढी मोठी ही गुहा आहे. येथुन वरच्या दरवाज्यापाशी गेल्यावर डाव्या बाजुस एक देवडी लागते. येथे सुद्धा २ लोकं सहज राहु शकतात. एवढं बघुन आम्ही गडाच्या शेवटच्या दरवाज्यातुन आतमध्ये प्रवेश केला आणि गडाच्या माथ्यावर दाखल झालो.


मुल्हेरवरून " मोरा किल्ला "
गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर मागे खिंडीत वळुन पाहिले तर मुल्हेर माचीचे दर्शन होते तसेच आपल्या छातीला भिडलेला हरगड किल्ला समोरच दिसतो. गडाच्या माथ्यावर पोहोचताच उजव्या बाजूस पाण्याचे टाके आहेत. येथील पाणी एकदा - दोनदा गळून घेतले तर पिण्याजोगे आहे. येथुन थोडंस पुढे गेल तर अजून ४-५ पाण्याची कोरडी पडलेली टाके आहेत. ही टाके बघून आम्ही वरच्या बाजुस गेलो. येथे राजवाड्याचे थोडेसे अवशेष शिल्लक आहेत. एवढं बघुन आम्ही उजव्या बाजूने सरळ गेलो. येथे गडाची तटबंदी आहे आणि पायऱ्या आहेत. येथुन समोरच लांबवर सप्तमाळ रांगेचे दर्शन होते. वातावरण धुरकट असल्याने आम्हाला काही ती बघता आली नाही. हे बघून आम्ही मोरा गडाच्या दिशेने निघालो. ह्या वाटेवर जाताना डाव्या बाजुस नजर टाकली असता मांगी - तुंगीचे डोंगर आपल्या दृष्टीक्षेपास येतात. 


अगदी कुलंग ची आठवान करून देणाऱ्या मोरा किल्ल्याच्या पायऱ्या


मोरा किल्ल्यावरील पाण्याचे टाके
थोडंस पुढे गेल्यावर आपण भडंगनाथाच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. ह्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही मोरागडावर निघालो. येथून दिसणाऱ्या मोर किल्ल्याच्या पायऱ्या अगदी कुलंग किल्ल्याची आठवण करून देतात. मोरा हा किल्ला अतिशय छोटा असुनसुद्धा अतिशय देखणा आहे आणि तो एका डोंगरयात्रीच्या मनात ठसा उमटवतो. आम्ही पटापट मोरा किल्ल्यावर दाखल व्हायला निघालो. किल्ल्याच्या भिंतीवरून जाताना बाजूस असलेली खिंड हडसर किल्ल्याची आठवण करून देते. आम्ही पटापट मोरा किल्ल्याच्या पायऱ्या चढुन किल्ल्याच्या दरवाज्यापाशी पोहोचलो. या दरवाज्याचे बांधकाम आणि त्यावरील कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. येथे जवळच पाण्याचे एक टाके आहे पण यातील पाणी पिण्याजोगे नाही. गडमाथ्यावर बघण्यासारखे काही नाही. एवढा सगळ बघुन आम्ही खिंडीच्या मार्गे गड उतरायला लागलो. यथील वाट थोडी घसाऱ्याची आहे. या वाटेने वाट शोधत आम्ही साधारण १ तासात सोमेश्वर मंदिरापाशी येऊन पोहोचलो. आत्तापर्येंत १ वाजला होता. सगळ्यांना भुक लागल्या होत्या पण पाणी पाहिजे म्हणुन आम्ही मोती टाक्यापाशी जेवण करायचा निर्णय घेतला. सोमेश्वर मंदिरातील महादेवाचे दर्शन घेऊन, या मंदिराची रचना बघुन आम्ही पुढे निघालो. 


मोरा किल्ल्याचा दरवाजा आणि पायऱ्या
येथून पुढे मोती टाक्यापाशी जाताना आम्ही वाट चुकलो आणि १.३० तास जंगलात भटकत बसलो. दुपारचे २.३० वाजले होते, अंधारून आले होते. तेवढ्यात वरच्या बाजुने आम्हाला एक कळस दिसला, तो होता रामेश्वर मंदिराचा. आम्ही पटापट काट्याकुट्यातुन वाट काढून मंदिरापाशी पोहोचलो. आमच्याजवळ गडाचा नकाशा होताच. त्या नकाशाच्या सहाय्याने आम्ही गणेश मंदिरापाशी पोहोचलो. आता २.४५ झाले होते. आम्ही पटापट जेवायला बसलो. बाजुलाच एक झरा होता. या झऱ्याचे पाणी भरून घेतले आणि आम्ही आमचे जेवण उरकले. साधारण ४ वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. परत २ किमी चालुन आम्ही आश्रमात परतलो. मग काय संध्याकाळी परत शुक्लाजींकडे जेवण करून, तिथे अजून काही समूह जेवण करायला आले होते, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याकडून समजले साल्हेर आणि सालोटाच्या इथे खुप पाऊस झाला आहे. त्यांच्या कडून माहिती घेऊन आश्रमात आम्ही वरांड्यामध्ये पहुडलो. आता उद्याची आस लागलेली ती साल्हेर - सालोट्याची.




- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)