कावळ्या - मंगळगड - शिवथरघळ









बरेच दिवसांपासुन कुठेतरी जाऊयात, कुठला तरी किल्ला सर करूयात असे मनात होते. नजर भिरभिरत होती, शोध घेत होती आणि नजरेसमोर आला तो जावळीच्या खोऱ्यातील मंगळगड. बस्स ठरलं !!! मंगळगड येत्या रविवारी सर करायचाच. मग माहिती गोळा करणे, नकाशा तयार करणे, आजुबाजूच्या परिसराची माहिती जमा करणे असे सगळे शोध सुरु झाले. सवंगडी जमवले. मी , श्रीराम, अवधुत, केतकी, निलेश आणि त्याचा मित्र. नेहमीप्रमाणे सकाळी ५.३० वाजता जमायचे ठरवले. तवेरा करून जायचे ठरले. आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी सर्व तयारी झाली. आता उद्याच्या पहाटेची आस लागली होती.



 मंगळगडाचे दुसरे नाव म्हणजेच कांगोरीगड. चंद्रराव मोरे यांनी हा  कामथा घाटावर तसेच रायरेश्वर दुर्गाजवळील अस्वलखिंडीवर नजर  ठेवण्यास उभारला होता. चंद्ररावांच्या अहंभावी वागण्यामुळे शिवरायांनी जाणले की, चंद्ररावांचा वध केल्याखेरीज हा देखणा किल्ला स्वराज्यात सामील करता येणार नाही. शिवरायांनी ह्या किल्ल्यावर स्वारी करून चंद्ररावांचा निःपात केला आणि हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. या नंतर ह्या किल्ल्याचे नामकरण करण्यात आले ते मंगळगड. मंगळगड हा जावळीच्या खोऱ्यातून निघलेल्या सह्य रांगेवर वसलेला असुन जावळी खोऱ्यात ढवळे गावात वसलेल्या चंद्रगडाचा जोडकिल्ला आहे. ह्या किल्ल्याचा इतिहास बघता हा किल्ला स्वराज्यासाठी किती महत्वाचा होता हे लक्षात येते.



Kavlya Gadachi Machi


ठरल्याप्रमाणे आम्ही (श्रीराम, मी आणि अवधुत ) माझ्या इथे ५.३० वाजता जमलो. ६ वाजता गाडी आली आणि आम्ही पुढे बाकीच्यांना घेत निघालो. भोर मार्गे वरंधा घाटातुन जायचे ठरले. मंगळगडावर जायला आधी महाडला पोचावे लागते. महाडवरून बिरवाडी मार्गे पिंपळवाडी गावापर्येंत जावे. पिंपळवाडी मधुन मोठी वाट गेलेली दिसते. तसेच थोडे पुढे गेले की दुधानेवाडी गावातुन सुद्धा एक रस्ता आहे. दुधानेवाडीत कांगोरी नाथाचे एक मंदिर आहे. गावातल्या लोकांनी त्यांच्या सोयीसाठी हे मंदिर बांधले आहे. महाडला पोचायला वरंधा घाटमार्गे तसेच ताम्हिणी मार्गे सुद्धा रस्ता आहे. ताम्हिणीला आपण सारखेच जात असतो आणि वरंधा घाटातून बऱ्याच दिवसात गेलो नव्हतो. म्हणुन आम्ही वरंधा घाटाचा रस्ता निवडला आणि निघालो.



पुण्यातुन निघेपर्येंत आम्हाला ६.३० वाजले. साधारणतः ७.१५ ते ७.३० च्या दरम्यान आम्ही भोर गावाजवळ असलेल्या येडवंती नदीच्या नेकलेस point जवळ पोचलो. येथे आम्ही थोडा वेळ आराम केला, येडवंती नदीचे छायाचित्र टिपले आणि पुढे निघालो. भोर मध्येच नाश्ता करून आम्ही वरंधा घाटाच्या मार्गे निघालो. वरंधा घाटातुन जाताना आजुबाजूचा परिसर, हिरवळ, धबधबे मनाला प्रसन्नता देतात. वरंधा घाटात भाजी point जवळ आम्ही उतरलो. येथेच वाघजाई देवीचे प्रसिद्ध असे खूप जुने मंदिर आहे. या मंदिराचे आम्ही दर्शन घेतले आणि धबधब्यांची छायाचित्र टिपायला सुरुवात केली. वरंधा घाटातुन समोरच कावळ्या किल्ला दिसतो. वाजीसारखा दिसणारा ह्याचा देखणा बुरुज आणि त्याचा कातळकडा आपले लक्ष वेधुन घेतो.



बऱ्याच दिवसांपासुन हा किल्ला बघायचं मनात होतेच. कावळ्या किल्ला हा वरंधा घाट आणि परिसर यावर लक्ष ठेवण्यास बांधला गेला होता. ह्या किल्ल्यावर आमचे लक्ष जाताच आम्ही ठरवले हा किल्ला बघुनच पुढे जायचं. वरंधा घाटाच्या माथ्यावरून या किल्ल्यावर पोहोचायला १५-२० मिनिटे लागतात. आम्ही पट-पट चालत हा किल्ला सर केला. किल्ल्यावर बघायला हा वाजीरासारखा दिसणारा बुरुज आहे, त्याला आम्ही आमच्या सोयीसाठी वरंध बुरुज नाव दिले. किल्ल्याच्या दुसर्या टोकावर लांबवर पसरलेली एक माची दिसते. आमच्याजवळ त्या माची पर्येंत जाण्याइतका वेळ नव्हता. वरंध बुरुज बघुन आम्ही खाली उतरलो आणि मंगळगडाच्या दिशेने निघालो.







आता ९ वाजले होते. रस्त्यात बिरवाडी - खारवली - भिवघर - वाडघर - निगडे - रुपावली - पिंपळेवाडी ही गावे पालथी घालत ९.४५ वाजता दुधानेवाडी मध्ये पोहोचलो. येथे भाताच्या शेतीत एक शेतकरी इरले घेऊन काम करीत होता. बहुदा पेरणी करत असावा. आम्ही त्यांना आवाज दिला आणि ते आमच्या जवळ आले. आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. थोडी माहिती विचारली आणि तेंव्हा त्यांनी सांगितले कांगोरी नाथाचे हे मंदिर गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी बांधले आहे. त्यांनी आम्हाला वाट दाखवली. सर्वांनी आवरून कांगोरी नाथाचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाजुने जाणाऱ्या मळलेल्या वाटेने आम्ही साधारण १० वाजता गड चढायला सुरुवात केली. या वाटेने थोडे पुढे जाताच आपण मुळ वाटेला येऊन मिळतो. मुळ वाटेने थोडा पुढे गेल्यावर एक वाट उजवीकडे वळलेली दिसते. ह्या वाटेने गडावर लवकर पोहोचता येते. मुळ वाटेने सरळ गेल्यास पूर्ण वळसा घालून जावे लागते. आम्ही उजवीकडची वाट पकडली आणि निघालो. 



या मार्गे साधारण अर्धा ते पाऊण तास चढाई केल्यावर गडाखालचा एक कातळटप्पा आपल्या छातीवर आलेला आपणास दिसतो. येथून मळलेल्या वाटेने डोंगराला वळसा घालून, गवत वाढलेल्या पायवाटेने आपण एक पठारावर येऊन पोहोचतो. येथुन दिसणारे दृश्य मनाला शांतता देते. या पठारावर आडवं होऊन वाऱ्याच्या झोक्याने झुलणारे गवत, समोर कोसळणारे धबधबे, लांबवर दिसणारी कुंटी तसेच गडाला वळसा घालून येणारी मुळ वाट बघायची मजाच निराळी आहे. तसेच वाटेत लागणारी जंगली फुले आणि कारवी आपले लक्ष वेधून घेते. आम्ही येथे थोडा वेळ आराम केला. निसर्गाचे छायाचित्र टिपले. येथुन  १५ - २० मिनिटे पुढे गेल्यावर आपण नवरा - नवरीच्या सुळक्यांच्या कातळटप्प्यात येऊन पोहोचतो. येथून पुढे डाव्या बाजुस जाणारी वाट पकडावी, गडाचा डोंगर उजव्या बाजुस ठेऊन चढाई सुरु करावी. या मार्गे आपण झाडी आणि कारवीच्या जंगलातुन आणि शेवटी तुटक्या, ओबड - धोबड पायऱ्यांनी गडाच्या महादरवाज्यापाशी येऊन पोहोचतो. जंगलातून येताना दमछाक झाल्यावर  महादरवाज्यापाशी वाऱ्याचा आनंद अनुभवायची मजाच निराळी.


Kangorinath Mandirache Darshan




महादरवाज्यापासुन सरळ जाणारी वाट कांगोरी नाथाच्या मंदिराकडे जाते तर उजवीकडे वळसा घालून गेलेली वाट बालेकिल्ल्यावर जाते. आम्ही येथुन प्रथम कांगोरी नाथाच्या मंदिराकडे जायचे ठरवले. या नुकताच भरपुर पाऊस झाला असल्यामुळे गावात खूप वाढले होते. आम्ही या गवतामधुन वाट काढत पुढे निघालो. वाटेत दोन पाण्याची टाके लागतात. एक कोरडे आहे तर एका मध्ये पाण्याचा साठ आहे. हे पाणी डोळ्यास गढूळ दिसत असले तरी पिण्याजोगे आहे. आम्ही पुढे मंदिरापाशी गेलो. मंदिराच्या बाहेरच ध्वज फडकताना दिसतो. मंदिराच्या गाभाऱ्यात प्राचीनकालीन मुर्त्या आहेत. यातील एक मूर्ती कांगोरीनाथाची असुन त्याचा हातात नाग असल्याचे दृष्टीस पडते. मंदिरामध्ये दरवर्षी मोठी यात्रा भरते. यामुळे गावातल्या लोकांनी यासाठी लागणारी पातेली, घागर आदि साहित्य येथे ठेवली आहेत. गडावर मुक्काम करण्याजोगे अडोश्याच स्थान नाही. मुक्काम करावयचा असल्यास मंदिरासमोर उघड्यावर झोपता येते. मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. ध्वजासामोरच घोषणा दिली आणि मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या माचीवर निघालो. या माची वरूनच समोर चंद्रगडाचे दर्शन होते.



आम्ही कांगोरी नाथाचे दर्शन घेऊन परत महादरवाज्यापाशी परतलो. येथे थोडी विश्रांती घेऊन आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. पण केतकीला शिवथरघळ बघायची असल्याने आम्ही माघारी फिरलो. पण गोळा केलेल्या माहिती नुसार बालेकिल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष दिसतात तसेच वरच्या बाजूस एक पाण्याचे तळे आहे. बालेकिल्ल्यावरून महादेव - मुऱ्हा डोंगर, प्रतापगड आणि मकरंदगडाचे तसेच रायरेश्वर - कोळेश्वर डोंगरांचे दर्शन होते. साधारण १.३० वाजता आम्ही दुधाने वाडीच्या मार्गे निघालो. सर - सर खाली उतरत २.३० वाजता आम्ही दुधाने वाडी मध्ये परतलो आणि महाड मार्गे निघालो.


३.३० वाजता आम्ही शिवथरघळीत पोहोचलो. शिवथर घळीला केळद वरून यायला ट्रेक रूट आहे. येथे स्वामी समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे. येथे असलेला धबधबा मनाला प्रसन्नता देतो. हल्ली येथे एवढ्या मोठ्या अएतिहासिक ठिकाणी लोक दारू पिऊन आणि दंगे घालून थिल्लरपणा करतात. तसेच दारू पिऊन आत घळीपर्येंत येतात. आम्ही येथे पटापट या स्थळाचे दर्शन घेतले आणि परतीच्या मार्गी लागलो. साधारण ७ वाजता घरी पोहोचुन आम्ही आमच्या ट्रेकची सांगता केली.





- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)





उपांडे घाट ते शिवथरघळ


आज शनिवार (५ सप्टेंबर २०१५) गोपाळ अष्टमी. या वेळेस आमचा ट्रेक शनिवारीच ठरला. खरतर ट्रेक नाहीच म्हणता येणार कारण रस्ता कोणालाच माहित नव्हता. या वेळेस आम्ही रेकी किंवा exploration साठी जाणार होतो. खुप planning नंतर ठरलं गोप्या घाट ते शिवथरघळ करूयात. गोप्या घाट ट्रेक म्हणजे केळद (मढेघाट) च्यापुढे कुंबळे नावाचे गाव आहे, येथून हा ट्रेक सुरु होतो. एक आठवडा आधी सगळीकडून माहिती गोळा केली. ट्रेक रूट (नकाशा) तयार केला. तसेच स्वारगेटला जाऊन st गाड्यांची चौकशी करून आलो. स्वारगेट वरून सकाळी ६.३० वाजता वेल्हा गावाची बस (पुणे ते धिसर) आहे. पण वेल्ह्यामधुन पुढे कुंबळे गावापार्येंत जायला सोयीस्कर वाहन नाही, जीप्स असतात पण ते कुंबळेपर्येंत ८०० ते १००० रुपये मागतात. तसेच अजून एक st स्वारगेट वरून कुंबळेला आहे, पण ती दुपारी २.३० वाजता. ही st मुक्कामी आहे. त्यामुळे आदल्या दिवशी कुंबळे गावात राहुन दुसऱ्या दिवशी सकाळी हा ट्रेक सुरु करणे उत्तम. रेकी ट्रेक करायला आम्ही तिघ जण होतो मी, विवेक आणि श्वेता ताई. आम्ही शनिवारी सकाळी ६.३० च्या बसने निघायचं ठरवलं. वेल्ह्यामध्ये पोहोचल्यावर पुढचं बघु असं ठरवल. आता उपांडे घाट ते शिवथरघळ असं का ते पुढे लिहिलं आहे.



ठरल्याप्रमाणे आम्ही स्वारगेटला सकाळी ६ वाजता जमलो. सकाळी चौकशी केंद्रावर आम्हाला पाहिजे असलेल्या अजुन थोड्या गाड्यांची माहिती जमा केली आणि बसची वाट बघत उभे राहिलो. ६.३० वाजताची बस ७ वाजता आली. आम्ही त्या स्वारगेट - धिसर बसने वेल्ह्याला निघालो. ही बस सर्वजागी थांबत (सर्व थांबा) जाते. साधारणतः ९.१५ वाजता आम्ही वेल्हे गावात पोहोचलो. रस्त्यात आणि प्रवासात खुप मज येत होती. निरनिराळे दृश्य, शेती, फुले आणि डाव्या बाजुस उभा असा तोरणा गड. त्यात भूतोंड्याची खिंड स्पष्ट दिसत होती. ही खिंड आपल्याला राजगड - तोरणा या ट्रेक मध्ये लागते. आता वेल्ह्यात पोहोचल्यावर आम्ही बस conductor शी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि नाष्टा केला.


दररोज केळदला वरती बाजार भरतो तेंव्हा वेल्ह्यामधून गाड्या वर जातात पण आज शनिवार असल्याने तिथला बाजार बंद असतो, त्यामुळे एकही गाडी वर जात नाही. आम्ही नाष्टा करून पुढे निघालो. जीप्स वाल्यांना विचारलं. त्यांनी आम्हाला ८००-१००० रुपये घेऊ असे सांगितले. आम्ही क्षणाचाही विलंब न करता त्यांना नाही म्हणून चालत केळदच्या मार्गे निघालो. आता ठरवलं अगदी ट्रेक नाहीच करता आला तर मढेघाट पर्येंत जाऊन येऊ. थोडंस पुढे गेल्यावर मागून एक डंपर खडी भरून येत होता. आम्हाला त्यांनी भट्टी गावाच्या अगदी थोडा अलीकडे सोडलं. आम्ही भट्टी गावापार्येंत चालत गेलो. तिथे लोकांना विचारलं आम्हाला कोणी वर सोडू शकेल का. त्यांनी पूर्ण प्रयत्न केले पण आम्हाला तिथेच वात बघत उभ रहाव लागला. तेवढ्यात मागून एक private xylo गाडी आली. त्यांनी आम्हाला लिफ्ट दिली ती केळदपर्येंत. अशा तर्हेने आमच्या ट्रेक ची (रेकीची) सुरुवात झाली.


या xylo मधले चार लोक एका ठिकाणी फोटो काढायला थांबले, आम्हीही त्यांच्या सोबत गाडीतुन उतरलो. ते लोकं selfies काढत होते आणि अघोरी प्रकार घडलाच. selfie च्या नादात त्यांच्या सोबत असलेली मुलगी कठड्यावरून तोल जाऊन १५ फुट रस्त्यावरून खाली पडली. नशीब चांगलं खाली खुप झाड झुडप होती आणि दगडाच्या बाजूस ती पडली. निव्वळ झाडांमुळे ती वाचली. म्हणुनच सतत सांगितले जाते की आपण सुरक्षित ठिकाणी आहोत याची दक्षता घ्यावी आणि मगच बाकीची मजा करावी. हा सगळा प्रकार घडला तिला व्यवस्थित वर आणलं गेला. थोडस खरचटलं होतं म्हणून नशीब. आम्ही पुढे निघालो. केळदमध्ये त्यांनी आम्हाला सोडलं आणि त्यांचा आम्ही तुमचा प्रवास सुखाचा होवो असं म्हणत त्यांचा निरोप घेतला. त्यांना पुढे मध्ये घात ला जायचं होत. 


अश्याप्रकारे मजल दरमजल करत आम्ही १०.५० वाजता केळदला पोहोचलो. आता केळदपासुन कुंबळे गाव ७ किमी अंतरावर आहे. आम्हाला कुंबळे गावापार्येंत काहीच वाहन न मिळाल्याने आम्ही कर्णवडीच्या मार्गे निघालो. हा रस्ता म्हणजे उपांडे घाटाचा रस्ता. केळदपासुन उपांडे घाटमार्गे कर्णवडीला पोहोचायला साधारण १ तास लागतो. या घाटाचा उपयोग कर्णवडीमधील लोकं अजुनही करतात. त्यांना लागणारे राशन आणण्यासाठी त्यांना केळदला वर चढुन यावे लागते. अगदी ६० -६५ वर्षांची लोकसुद्धा या गावातुन उपांडे मार्गे वर येताना दिसतात. ही लोकं मनाने खूपच चांगली व प्रामाणिक आहेत. या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केळदपासुन कर्णवडीच्या मार्गे लागलो.






आता ११ वाजले होते. आम्ही आमचा ट्रेक सुरु केला. डोक्यावर प्रचंड ऊन होत आणि हवा सुद्धा खुपच दमट होती. पाऊस अजिबातच नव्हता. या मार्गे थोडंस पुढे गेल्यावर एक ओढा लागतो. यावर असलेल्या पुलावरून आम्ही चालत पुढे निघालो. साधारण १५ -२० मिनिटे चालत पुढे गेल्यावर उपांडे घाट सुरु होतो. हा घाट उतरत सरळ कर्णवडीला जातो. या घाटातुन सरळ खाली बघितल्यावर कोकणाचे उत्तम दर्शन होते. आता हा घाट उतरायला आम्ही सुरुवात केली. या घाटातुन खाली उतरताना एक पाण्याचा पाईप आपल्या बरोबर खाली उतरलेला दिसतो. तसेच वाटेत भरपूर पाण्याचे झरे दिसतात. जे उन्हाळ्यात कदाचित सुकत असावेत. साधारण एका तासात आम्ही कर्णवाडीस पोहोचलो. येथुन एक वाट सरळ खाली रानवाडीस तर डावीकडे जाणारी वाट आंबेनळीस जाते. आंबेनळी पासून पुढे वाट आंबे शिवथर आणि कुंभे शिवथर या गावास जाते. 


आम्ही डावीकडे जाणारी वाट पकडली आणि आंबेनळीच्या दिशेने निघालो. आता दुपारचे १२.१५ वाजले होते. वाटेत जाताना डावीकडे उपांडे घाटासारखाच एक घाट खाली येताना दिसतो. या घाटाला जुना उपांडे घाट असे म्हणतात. कर्णवडी मधील मंदिराचे आम्ही दर्शन घेतले आणि पुढे निघालो. खुप चालत गेल्यावर आम्ही थोडे चुकलो. दोन मार्ग लागतात एक मार्ग डाव्या बाजूस असलेल्या कड्याकडे जातो, पण तो मध्येच संपतो. दुसरा मार्ग शेताच्या बांधावरून सरळ आंबेनळीस जातो. आम्ही परत मागे फिरून बांधावरच्या मार्गे पुढे निघालो. आत्तापार्येंत १ वाजला होता. मध्येच एका शेतात झाडाखाली बसुन आम्ही जेवण केले.


आता जेवण करून आम्ही पुढे निघालो आंबेनळीच्या दिशेने. पुढे गेल्यावर डावीकडुन जुन्या उपांडे घाटातुन एक मार्ग आपल्या वाटेस भिडतो. तसेच उजवीकडे एक मार्ग जातो. आम्ही उजवीकडच्या मार्गाने निघालो पण हा मार्ग नंतर संपुन गुरांच्या वाटेस लागतो आणि सरळ दरीत उतरतो. आम्ही परत चुकलो होतो. परत मागे फिरून आम्ही वरून आलेल्या वाटेस लागलो आणि थोड्याच वेळात उजवीकडे एक वाट लागते. आम्ही ह्या वाटेने सरळ जायला लागलो आणि समोरच खालच्या बाजुस एका दगडावर बाणाच्या खुणा आम्ह्च्या दृष्टीस पडल्या. आमच्या जिवात जिव आला आणि आता पटपट पाऊले पडु लागली. अखेरीस आंबेनळी नजरेस आले. साधारण २.१५ वाजता आम्ही आंबेनळीस पोहोचलो. येथे थोडा वेळ आराम करून आम्ही २.३० वाजता आंबे शिवथर गावाच्या दिशेने निघालो. आंबेनळी मधील एक कुत्रं आमच्या सोबत वाटाड्या आणि आमच्या रक्षणाकरिता म्हणुन येत होतं. 


३ वाजता आम्ही आंबे शिवथर मध्ये पोहोचलो आणि थोडा वेळ येथे आराम केला. आंबे शिवथर मध्ये पोहोचतास ते कुत्रं परत आंबेनळीस निघून गेलं. गावातल्या लोकांशी गप्पा मारल्या. येथुन त्यांनी आम्हाला गोप्या घाटामधुन येणारा रस्ता दाखवला. त्यांचा निरोप घेऊन आम्ही कुंभे शिवथर गावाच्या दिशेने निघालो. येथे वाटेतच आम्हाला एक टेम्पो मिळाला. त्याने आम्हाला बिरवाडी गावापार्येंत सोडले. बिरवाडी पासुन ते ढालकाठीस आम्ही टमटम करून आलो. ढालकाठी वरून नशिबाने आम्हाला शेवटची (४.१५ वाजता ) पुण्याची बस (खेड - महाड - पुणे) मिळाली. ही गाडी वरंधा घाटामधुन भोरमार्गे पुण्यास येते. रात्री ८.३० वाजता स्वारगेटला परत पोहोचुन आम्ही आमच्या ट्रेकची सांगता केली.


प्रत्येक ट्रेक आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट शिकवून जात असतो. जर तुम्ही वेळेचे योग्य नियोजन केले असेल, जर ट्रेक करते समयी तुमचे तुमच्या चालण्यावर आणि वेळेवर नियंत्रण असेल, ट्रेकला येताना योग्य तेवढी माहिती बरोबर घेऊन तुम्ही निघाला असाल, तुमच्याजवळ योग्य तेवढा ट्रेकिंगचा अनुभव असेल, तर कितीही संकट आली तरी तुम्ही त्याच्यावर मात करून तुमचा ट्रेक यशस्वीरित्या पार पाडु शकता. वेळेवर नियंत्रण असण गरजेचे आहे, वेळेवर नियंत्रण असेल तर अपोआप पुढच्या गोष्टी जुळत जातात.






- साकेत घाणेकर


संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)






इरसालगड

खुप चर्चेनंतर या रविवारी (१६ ऑगस्ट) इरसालगडावर जायचे ठरले. तवेरा ने जायचं की सफारी ने. ८ लोकं तयार झाले पण आदल्या दिवशी (शनिवारी) त्यातल्या दोघांनी कल्टी दिली. मग लगेच पुढचे दोन लोकं तयार होतेच. शनिवारी संध्याकाळी ठरलं की संजय दादाच्या सफारी ने जाऊयात. नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता निघायचे ठरले. या वेळेस संजय दादा, निलम, केतकी, प्रणव, अंगद, संकेत, विवेक आणि मी होतो. इरसालगड हा खोपोली पासून साधारणतः २० -२५ किमी अंतरावर आहे. चौक गावाच्या अलीकडे उजवीकडे फाटा जातो. इरसालवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. रेल्वेने आल्यास चौक रेल्वे स्टेशन पासुन ट्रेक सुरु करावा लागतो. इरसालगडाचे दुसरे नाव म्हणजे विशाळगड. इरसालगड हा प्रबळगडाचा जोड किल्ला आहे.


रविवार सकाळ उजाडली. मला सकाळी उठल्या उठल्या ताप भरला होता पण एकदा ठरलं ट्रेक ला जायचं की जायचंच. आदल्या दिवशी सगळ समान बांधल्यामुळे सकाळी धावपळ होणार नव्हती. सकाळी ६ वाजता संजय दादाकडे जमायचे ठरले होते. आम्ही (केतकी, विवेक आणि मी) कोथरूड वरून सकाळी ५.३० वाजता निघालो. आम्ही सर्वजण संजय दादाकडे जमलो आणि तिथे गाड्या लावल्या. संजय दादा ची सफारी घेऊन निघालो. पुण्यात काहीच पाऊस नव्हता, निदान खोपोली जवळ पाऊस असेल अशी अपेक्षा होती पण तिथेही पाऊस नाहीच. 

आम्ही ६.३० वाजता निघालो आणि साधारण ७.३० वाजता लोणावळ्यात पोहोचलो. या वेळेस उडपी मध्ये नाश्ता न करता आम्ही अन्नपुर्णा मध्ये नाश्ता केला. नाश्ता करून साधारण ८ वाजता आम्ही निघालो. सर्व गोष्टी planning प्रमाणे चालल्या होत्या, पण तोच आम्हाला एक्सप्रेस हायवेला खुप traffic लागलं. निव्वळ अर्ध्या तासात traffic सुटल म्हणुन आम्हाला जास्त उशीर झाला नाही. मग खोपिलो exit घेऊन आम्ही साधारण ९.१५ वाजता इरसालवाडीत पोचलो. येथुन मोरबे धरणाचे दृश्य अप्रतिम होते.

इरसालवाडीमध्ये एका टाक्यापाशी आम्ही गाडी लावली. सगळे जण आवरून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. थोडंस सरळ गेल्यावर डावीकडे इरसालगड उंचावलेला दिसतो. गडाच्या पदराशी एक माची नावाचे गाव आहे. इरसालवाडीतुन माची गावापार्येंत पोहोचण्यास १ ते १.१५ तास लागतो. माची आणि इरसालवाडीच्या मध्ये ३ टेकड्या आहेत. माची गावातुन गडावर पोहोचण्यास अर्धा तास लागतो. आम्ही पहिली टेकडी पार करून वर पोहोचलो. सगळा चढ छातीवर असल्याने आणि आमच्या सोबत नवीन लोकं असल्याने आम्ही प्रत्येक टेकडीवर आराम करत वर जात होतो.





आत्तापर्येंत एक थेंबही पाऊस आला नव्हता. नुसत ऊन आणि बाष्प आम्हाला घामाने हैराण करत होतं. प्रत्येक टेकडीवरून मोरबे धरणाचे दृश्य बघण्यासारखे आहे. एका बाजुस दरी आणि एक बाजुस धरण, तर मधल्या डोंगराच्या धारेवरून आम्ही चाललो होतो. मजल दरमजल करत आम्ही ११.३० वाजता माचीपर्येंत पोहोचलो. गावात लावलेली भाताची शेती आणि पठार अतिशय सुंदर आहे. आता नुकताच रिमझिम पाऊस सुरु झाला. आमच्या आधी दोन समुह येथे आधीच आले होते. माची गावात एक शाळा आहे, तिथे राहण्याची सोय होते. इथे एक घरगुती हॉटेल आहे जिथे ऐन वेळेस फक्त चहा मिळतो. जेवणाची order आधीच द्यावी लागते.

हॉटेल मधल्या मंडळींशी संवाद साधुन आणि त्यांचा मोबाइल नंबर घेऊन आम्ही पुढे निघालो. डाव्या बाजुने सरळ मळलेली वाट जाते, त्या वाटेने आम्ही सरळ निघालो. थोडस पुढे गेल्यावर एक वाट उजवीकडे वरच्या बाजुस जाते जी एका माचीवरून गडावर जाते. आम्ही ही वाट न पकडता सरळ गेलो. सरळ गेल्यावर लक्षात आले आपण वाट चुकलो आहोत पण या मुळेच आम्हाला प्रबळगडाकडे जाणारी वाट सापडली. या वाटेवरून समोरच प्रचंड उभा असा प्रबळगड दिसतो. आम्ही परत उलटे फिरून वरच्या वाटेला लागलो. 




थोडंस वरच्या बाजुस गेल्यावर समोरच एका सुळक्याचे दर्शन होते. उजव्या बाजुस मोरबे धरण तर डाव्या बाजुस प्रबळगड असे दृश्य नजरेस येते. थोडस सरळ गेल्यावर डावीकडून सुळक्याला वळसा घालुन एक वाट गडाकडे जाते. आम्ही आधी सरळ सुळक्याच्या वाटेने गेलो. साधारण १५ फुटाचे कातळारोहण करून आम्ही सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचलो. आमच्यासोबत आलेला एक समुह तिथे आधी पोचून मराठी गाणी म्हणत होता. त्यांची गाणी संपल्यावर आम्ही घोषणा दिली आणि परत खाली उतरलो आणि डावीकडच्या वाटेला लागलो.


डावीकडच्या वाटेने सुळक्याला वळसा घालुन सरळ गेल्यावर समोर एक नेढ दिसत पण त्या नेढ्यापर्येंत जाणारी वाट मध्ये बंद आहे. आम्हाला गडावर जायची वाट सापडली नव्हती. आम्ही उलटे फिरलो होतो पण समोरून येणाऱ्या काही गावातल्या लोकांनी वर जाणारी वाट दाखवली. त्या वाटेने थोडंस वर गेल्यावर एक पाण्याचे टाक आहे. वरच्या बाजूस एक शिडी लागते. शिडी चढून गेल्यावर डाव्या बाजूस देवीचे छोटेसे मंदिर आहे. अजुन थोडंस वर गेल्यावर १० फुटाचे कातळारोहण करावे लागते. 


कातळारोहण केल्यावर वरच्या बाजुस एक नेढ लागते. या नेढ्यामधुन संपुर्ण किल्ल्याचे, माची गावाचे तसेच मोरबे धरणाच्या back water चे सुंदर दर्शन होते. नेढ्याच्या उजव्या बाजुने एक वाट वरच्या बाजुस जाते. येथे ८ फुटाचे कातळारोहण करून वरच्या बाजुस जावे लागते. सरळ गेल्यावर अजुन एक कातळारोहण (साधारण २०-२५ फुट) करून वर ध्वजाकडे पोहोचता येते, पण हे कातळारोहण करण्यास दोर आवश्यक आहे. तांत्रिक साहित्य बरोबर असल्याशिवाय येथे मस्ती करू नये आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.



आता आमचा गड पुर्ण बघुन झाला होता आणि २ वाजले होते. आम्ही पटापट खाली उतरत साधारण २.३० वाजता माचीमध्ये परतलो. येथे चांगली जागा बघुन आम्ही जेवण केले. जेवण करून साधारण ३ वाजता आम्ही इरसालवाडीचा रस्ता पकडला आणि चालु लागलो. नुकतेच जेवण झाल्याने आणि अर्धा तास आराम केल्याने सगळे सुस्तावले होते आणि सगळ्यांचे पाय जड झाले होते. तरीही मजल दरमजल करत आम्ही ४.१५ वाजता इरसालवाडीत पोहोचलो. सगळ्यांनी पटापट आवरलं आणि ४.४५ वाजता परतीच्या वाटेला लागलो.८.३० वाजेपर्येंत घरी पोहचुन आम्ही आमच्या ट्रेकची सांगता केली.




- साकेत घाणेकर


संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)








a




हडसर - नाणेघाट




मंगळवार उजाडला आणि आमचे planing सुरु झाले. मंगळवार पासुनच हडसर निमगिरी करायचा असे ठरले. शनिवारी दुपारी सगळ ठरलं. आम्ही ६ जण होतो... संजय दादा, मेघा, केतकी, अनुश्री, विनीत आणि मी. रविवारी सकाळी ६.३० ला निघायचं असं ठरलं. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड, हा किल्ला बहुदा नाणेघाट व आजुबाजूच्या संरक्षणासाठी बांधला असावा. हडसरच्या पायथ्याचे गाव म्हणजे हडसर गाव.


रविवारी पहाटे ६.३० वाजता संजय दादाकडे पोहोचायचं ठरलं. आम्ही कोथरूड वरून ६.१५ वाजता संजय दादाकडे (आकुर्डीमध्ये) पोहोचलो. पण नेहमीप्रमाणे एकाने यायला उशीर केलाच आणि शेवटी आम्ही संजय दादाच्या सफारी मधुन ७.३० वाजता निघालो. पहाटे ४.३० लाच उठल्यामुळे सगळ्यांना कळवळून भुक लागल्या होत्या. आम्ही नारायणगावाच्या दिशेने निघालो. साधारण ८.३० वाजता आम्ही नारायणगावात पोहोचलो. 



सगळी दुकानं बंद होती, आम्ही नाश्त्यासाठी हॉटेल बघत होतो. आम्ही नारायणगाव सोडून थोडं पुढे गेलो (साधारण १ किमी) आणि आम्हाला परिवार नावाच एक हॉटेल मिळाल, तिथे आम्ही नाश्ता केला आणि परत नारायणगावात येऊन जुन्नर चा रस्ता पकडला. जुन्नर मध्ये पोहोचल्यावर एक शिवाजी पुतळा लागतो, येथे उजवीकडे वळुन सरळ गेल्यावर पहिले माणिकडोह धरण लागते. धरणाच्या बाजूनेच रस्ता सरळ पुढे हडसर कडे जातो. आम्ही माणिकडोह धरणापाशी थोडा वेळ आराम केला. आता साधारण ९.३० वाजले होते. थोडा वेळ आराम करून आम्ही हडसरची वाट पकडली. १५ - २० मिनिटात आम्ही हडसर गावात पोहोचलो.



हडसर गावातुन पुढे आम्ही गड चढायला सुरुवात केली. पहिले पठार पार केल्यावर समोरच एक महादेवाचे मंदिर लागते. गडावर पोहोचण्यासाठी ३ वाटा आहेत. मंदिराच्या उजवीकडून एक वाट जाते. ह्या वाटेने आपण एका बुरुजापाशी पोहोचतो. येथे गावातील लोकांनी सळया भिंतीत रोवुन पायऱ्यांचा मार्ग तयार केला आहे. हे कातळरोहण (rock patch) साधारण ४५ - ५० फुट आहे. मंदिरापासून ते बुरुजापर्येंत पोहोचायला आपल्याला साधारण १ ते १.३० तास लागतो. उजव्या बाजूस असलेल्या एका खिंडीत उतरून डाव्या पठारावर सरळ चढाई केल्यावर या वाटेस आपण पोहोचतो आणि कातळरोहण करून साधारण अर्ध्या तासात आपण गडावर पोहोचतो.






दुसरी वाट म्हणजे मंदिरापासून डाव्या बाजुस गेल्यावर एक घळ लागते. या घळीतून समोरच गडाची एक भिंत दिसते. या घळीतून सरळ चढाई केल्यावर आपण भिंतीपाशी येऊन पोहोचतो. भिंतीच्या उजव्या बाजुस साधारण २५ फुटाचे कातळारोहण केल्यावर आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी पोहोचतो. या वाटेने गडावर पोहोचण्यास साधारण २ तास लागतात. गडावर पोहोचण्यास तिसरी वाट म्हणजे या घळीतून न चढता, घळ उजव्या बाजुस ठेवुन घळीला वळसा घालावा. पुढे गेल्यावर उजव्या बाजुस अजून एक घळ लागते. या घळीतून साधारण ३०० पायऱ्या आहेत. ही वाट सगळ्यात सोप्पी असुन, या वाटेने गडावर पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात.





आम्ही दुसऱ्या वाटेने म्हणजेच घळीच्या मार्गे गडावर पोहोचलो. तिथे सर्वांनी न घाबरता आणि न डगमगता कातळारोहण केले. येथून वर गेल्यावर आपण पायऱ्यांचा मार्गे येणाऱ्या वाटेला भिडतो. आता कातळारोहण केल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव आला होता. रस्ता आधी माहित नसताना तिथून चढायची मजाच वेगळी असते. येथे दरवाज्यापाशी आम्ही घोषणा दिली आणि वरचा बाजूस निघालो. थोडंस वर गेल्यावर डाव्या बाजुस एक जुने धान्याचे कोठार (गुहा) आहे.


थोड्या पायऱ्या चढुन वर गेल्यावर आपण गडाच्या माथ्यावर एका पठारावर येऊन पोहोचतो. येथुन आपल्याला गडाची एक बाजु माणिकडोह धरणाला मिळालेली दिसते. थोडंस पुढे गेल्यावर एक स्वच्छ पाण्याचे टाक आहे. गडावरून समोरच चावंड किल्ल्याचे दर्शन होते. तसेच हरिश्चंद्रगड, शिवनेरी, नाणेघाट, जीवधनगड आणि निमगिरी, भैरवगड आदि किल्ल्यांचे दर्शन होते. तसेच कुकडी नदीचे सुंदर दर्शन होते. टाक्याच्या शेजारून सरळ पुढे गेल्यास एक मोठे महादेवाचे मंदिर आहे. आम्ही घळीच्या मार्गे गडावर आल्याने आम्हाला गडावरून सळ्यांचा मार्ग शोधायचा होता. आम्ही मंदिरापासून बुरुजाच्या मार्गावर निघालो. मध्ये एका मंदिराचे, शंकराच्या पिंडीचे अवशेष आहेत. झाडे खुप वाढल्याने आम्हाला वरच्या बाजूने सळ्या काही दिसल्या नाहीत पण वरून एका दगडावर पांढऱ्या रंगाने केलेली बाणाची खुण (वाट सापडण्यासाठी) दिसली.




आता किल्ला पूर्ण फिरून झाला होता आणि दुपारचे १.३० वाजले होते. आम्ही पायऱ्यांच्या मार्गे घळीतून गड उतरण्यास सुरुवात केली. या मार्गे पण आपण गडाची भिंत मागील बाजुस ठेवुन घळीत उतरू लागतो. या किल्ल्याचे बांधकाम बघूनच लक्षात येते की हा किल्ला जिंकणे किती कठीण जात असाव. पूर्ण एक टेकडी पार केल्यावर आपण एका पठारावर येवून पोहोचतो. मग शेतांच्या बांधावरून आम्ही पूर्ण घळीला वळसा घालुन साधारण ३.१५ वाजता हडसर गावातील एका विहिरीपाशी पोहोचलो.



येथे आम्ही जेवण करून थोडा वेळ आराम केला आणि नाणेघाटाच्या दिशेने निघालो. नाणेघाटात आम्ही साधारण ४.३० वाजता पोहोचलो. येथून जीवधन गडाचे अप्रतिम दृश्य नजरेस येते. नाणेघाटातील गुहा, पाण्याची टाके, रांजण आणि भिंतीवर कोरलेल्या मारुतीरायाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परत येताना आम्ही सकाळी थांबलेलो तेथे (परिवार हॉटेल) नाश्ता करून (कढी वडे) पुण्याच्या दिशेने निघालो आणि ११ वाजता घरी पोहोचुन आमच्या यशस्वी प्रवासाची सांगता केली....







- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)


कल्याणगड - वर्धनगड - महिमानगड - वारुगड - संतोषगड



वीक एंड जवळ आला की डोक्यात ट्रेक चे चक्र फिरायला लागते..... मग काय ट्रेकची बोलणी सुरु झाली इकडे जाऊ तिकडे जाऊ पण शुक्रवार पर्यंत ठरेना कुठे जायचं ते....... मग मी आणि श्रीराम ने ठरवलं की आपण कल्याणगड, वर्धनगड, महिमानगड, वारुगड आणि संतोषगड बघून येऊ.... मग काय ठरलच आणि सर्व तयारी झाली. सकाळी ५ वाजता माझाकडे जमायचं ठरलं...... शनिवारी सकाळी आम्ही ठरल्याप्रमाणे भेटलो आणि ५.३० ला आमचा प्रवासाला सुरुवात केली. एक तासाभरातच शिरवळ जवळील श्रीराम हॉटेल मध्ये आम्ही थांबलो. नाश्ता झाला आणि आम्ही कल्याणगडचा दिशेने निघालो. अर्थात navigation चालू केल होतच आणि साधारण १.५ ते २ तासात आम्ही कल्याणगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. संपुर्ण रस्ताभर एक थेंबही पाऊस नव्हता, होत ते गार वार आणि ढगाळ हवा.

साधारण ९.३० वाजता आम्ही धुमाळवाडीस पोहोचलो आणि गड चढायला सुरुवात केली. आजूबाजुची हिरवळ मनाला प्रसन्नता देणारी होती. किल्ल्यावरून समोरच पवनचक्क्या दिसत होत्या. थोड्या पायऱ्या चढताच किल्ल्याचा दरवाजा लागला. मग काय photography सुरु झाली. दरवाजातून आत जाताच डाव्या बाजुस डोंगराच्या पोटात (गुहेत) लेणे मंदिर आहे. साधारण घोट्या एवढे पाणी गुहेत होते त्यातून वाट काढुन आणि torch on करून आम्ही आत मध्ये गेलो. खूप पाऊस असेल तर पाणी कमरे एवढे सुद्धा असते. आतमध्ये पार्श्वनाथ आणि दत्तात्रेयांचा मुर्ती आहेत. दरवाज्याचा वरच्या बाजूस गेल्यावर संतोषगडाचे दर्शन होते. तर दरवाजाचा उजव्या बाजुस वर गेल्यावर मारुतीचे मंदिर आहे. थोडंस पुढे गेल्यावर कल्याणस्वामींची समाधी आहे, समाधीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यावर एक तळ आहे आणि ध्वज आहे. येथे आम्ही घोषणा दिली. ध्वजाच्या येथुनच साताऱ्याचा अजिंक्यताऱ्याचे दर्शन होते. तसेच थोडे मागे आले की चंदन, वंदन आणि वैराटगडाचे दर्शन होते. आता परत जायची वेळ झाली होती. आम्हाला अजून दोन किल्ले बघायचे होते. आम्ही पटापट खाली उतरायला लागलो, साधारण १५ - २० 

मिनिटात आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि पुन्हा navigation चालु करून 
वर्धनगडाचा दिशेने हालचाल सुरु केली. 
आता ११.३० वाजले होते आणि आम्ही वर्धनगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. 
वर्धनगडावर जायला दोन वाटा आहेत एक म्हणजे वर्धनगड गावाकडून आणि दुसरी लालगुण गावावरून. लालगुण गावातुन गडावर पोचायला साधारण दीड तास लागतो. वेळेअभावी आम्ही वर्धनगडाच्या बाजूने गेलो. साधारण १५ मिनिटात आम्ही गडाच्या दरवाजापाशी पोहोचलो. दरवाज्याचे बांधकाम अजूनही सुस्थितीत आहे. दरवाजातूनच समोर ध्वजाचे दर्शन होते. दरवाजातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस थोडं पुढे चोर वाट आहे. गडावर एकूण १० बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. दरवाजाच्या उजव्या बाजूने वर गेल्यावर समोरच एक महादेवाचे सुरेख मंदिर आहे आणि बाजूसच एक सुंदर पाण्याचे टाके आहे. ते बघुन आम्ही पुढे निघालो, थोडंस पुढे गेल्यावर हनुमंताचे एक छोटस मंदिर निदर्शनास येते आणि डाव्या बाजूस वर चढून माथ्यावर वर्धनीमातेचे मंदिर आहे. हे मंदिर बंद होते, दर्शन घेण्यासाठी उजव्या बाजूने कडी उघडून आत जाता येते आणि दर्शन घेता येते. किल्ल्याच्या मागच्या बाजुस दोन सुरेख पाण्याचे टाके आहेत. ते बघून आम्ही गडाची प्रदक्षिणा पूर्ण केली. आम्ही परत महादेवाच्या मंदिरापाशी येऊन जेवण केले आणि परतीच्या वाटेला लागलो. साधारण १० मिनिटात आम्ही गड उतरून परत वर्धनगड गावात पोहोचलो.

आम्ही जेवण करून साधारण १.५ चा सुमारास वर्धनगड गावातुन निघालो ते महिमान गडाच्या दिशेने. वाटेत अजूनही कुठेही पाऊस नव्हता, पाऊस तर दूरच वरून ऊन आले होते. सुमारे २.३० वाजता आम्ही महिमानगड गावात पोहोचलो. दहिवडीकडून पुसेगावला जाणाऱ्या मार्गावर महिमानगडाचा रस्ता आहे. गावातून साधारण १० मिनिट मध्ये आम्ही गडाचा माथा गाठला. गडावर बघायला एक हनुमंताचे मंदिर आणि मोठे पाण्याचे टाके आहे. गडावरून उजव्या बाजूस भूषणगडाचे तसेच डाव्या बाजूस वारुगडाचे दर्शन होते. उन खूपच जास्त होते, पावसाळा चालू आहे असे वाटतच नव्हते. 
गडावरच आम्हाला एक मेंढपाळ भेटला, ते वयस्कर होते. त्यांचाशी आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. ते या गावातच लहानाचे मोठे झालेले होते पण त्यांचे अनुभव ऐकण्या सारखे होते. त्यांनी आम्हाला बरीच माहिती दिली. तिथली परिस्थिती बघुन इतके वाईट वाटत होते. पिण्याचा पाण्याची बोंब, मेंढ्या - गुरांना चरायला गावात पुरेसा चारा नव्हता, आजुबाजूची शेत सुकत चालली होती. थोड्याच वेळात आमच्या गप्पा आटपल्या आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघालो आणि पुढच्या१० मिनिटात पायथा गाठला. आता काही घाई नव्हती. ४ वाजले होते. तेथे गावातच आम्ही एका घरात भांडभर पाणी प्यायलो, त्यांचाशी गप्पा मारल्या आणि ४.३० वाजता गोंदवलेच्या दिशेने निघालो.

गोंदवलेमधे आम्ही साधारण ५.३० वाजता पोहोचलो. आज आमचा येथे मुक्काम होता. आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या मठात भक्ती निवासात उतरलो होतो. संध्याकाळी ७.३० वाजता आरतीची वेळ होती. आमचाजवळ बराच वेळ होता, मग आम्ही सगळ आवरून गोंदवलेमधे दोन मंदिर आहेत ते बघायला निघालो. पहिले थोरले राम मंदिर आणि मग धाकटे राम मंदिर बघितले. धाकटे राम मंदिराच्या आवारातच शनीचे आणि दत्ताचे सुद्धा देऊळ आहे. एवढे सर्व बघून आम्ही आरती साठी पुन्हा आश्रमात आलो. ७.३० ला आरती सुरु झाली आणि ८.३० वाजता आम्ही प्रसाद भोजनाचा आस्वाद घेतला आणि भक्ती निवासाकडे गेलो. सकाळी साधारण ७ वाजता आवरून आम्ही वारुगड कडे निघालो.

सुमारे सकाळी ९.३० वाजता आम्ही वारुगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. वारुगडावर पोहोचण्यासाठी दोन वाटा आहेत. पहिली ताथवडे मधून, हे गाव किल्ल्यावरच वसलेले आहे येथून बालेकिल्ला १० मिनिटांच्या अंतरावर आहे. दुसरी वाट गिरवी गावातून आहे, या वाटेने साधारण २.३० ते ३ तास गडावर पोचायला लागतात. वारुगडाच्या रस्ता सुरुवातीला असा वाटत की जणु आपण वाळवंटामधून जात आहोत, पण नंतर रुक्ष डोंगराचा कुशीतून रस्ता गेला आहे. वरुगडावर आम्हाला अजिबात ऊन लागले नाही. येथे संपूर्ण प्रवासात आम्हाला पहिल्यांदा चार थेंब (अगदीच चार) पावसाचे लागले, हवा ढगाळ होती. वारुगड प्रचंड विस्तारत पसरला आहे. राजांनी गडाची निवड अगदी योग्य केली होती. सर्व बाजूंच्या दर्याखोऱ्यात उभा असा वारुगड. बालेकिल्ल्यावरून बघितल्यावर असे भासते कि हा गड जिंकायला खरच किती कठीण आहे. 
वरुगडावर दोन पाण्याची टाके आहेत. एका टाक्याला ५ दरवाजे आहेत आणि यातली एक वाट गडावर (बालेकिल्ल्यावर) आणि दुसऱ्या टाक्यावर जाते असं म्हणतात. ही टाके पांडवानी एका रात्रीत बांधल्याची नोंद बाजूलाच लिहिलेल्या एक फलकावर केली आहे. फलकाचे फोटो मी खाली टाकले आहेत. ही दोन पाण्याची टाके बघून आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो आणि साधारण १० मिनिटात बालेकिल्ला गाठला. बालेकिल्ल्यावरून दिसणारे दृश्य अतिशय सुंदर होते. बालेकिल्ल्यावर एक सुकलेले टाके, एक विहीर, एक सदर आहे. एक नुकतेच बांधकाम चालू असलेले मंदिर आहे. तसेच ध्वजाच्या बाजूस काही अवशेष आणि एक जाते आहे. हा किल्ला पुर्णपणे न्याहाळून आम्ही संतोषगडच्या दिशेने हालचाल सुरु केली.

आता साधारण ११.३० वाजले होते. आम्ही संतोषगडाची वाट चुकलो. मग परत माघारी फिरून आम्ही फलटणमार्गे संतोष गडाकडे कूच केली. सुरवातीलाच आम्हाला सुंदर घाट लागला. वारुगडावरून लक्ष वेधणाऱ्या दऱ्याखोऱ्यातुन आम्ही आता जात होतो. १२.३० वाजता आम्ही फलटणला पोहोचलो. फलटणमधे जेवण करून आम्ही सुमारे १ वाजता संतोषगडच्या दिशेने निघालो. सुमारे २.३० वाजता आम्ही संतोषगडच्या पायथ्याशी पोहोचलो. गडावरती पाण्याची एक गुहा आहे जी आता बंद केली आहे. या वेळेस पावसाची कमतरता असल्याने त्याला जास्त पाणीही नाही. तसेच जवळच एक आश्रम आहे. 

येथे पुण्याहून हडपसर भागातून एका संस्थेचे संवर्धनाचे काम चालू होते. त्यांनी बऱ्यापैकी झाडे लाऊन वृक्षारोपण केले आहे. गडाची तटबंदी उत्तम आहे. जिथे थोडीशी पडझड झाली आहे तेथे बांधकाम चालू होते. आश्रमात एक माताश्री आहेत ज्या सध्या गडाची देखभाल करतात त्यांचाशी आम्ही थोडा वेळ संवाद साधला. गावकऱ्यांनी सांगितले होते या माताश्रींना १४ भाषा बोलता येतात. त्यांच्याशी थोडा वेळ संवाद साधुन आम्ही गड उतरायला सुरुवात केली.

सुमारे ३.३० वाजता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. परत येताना आम्ही लोणंद वरून निघालो. येथे वीर धरणाजवळ आम्ही थोडा वेळ आराम केला. नंतर पुढे नसरापूर ओलांडून टोल क्रॉस करून थोडस खायला आम्ही थांबलो. सुमारे संध्याकाळी ६ वाजता पुण्यात आगमन करून आम्ही आमच्या प्रवासाचा शेवट केला.




- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)