हडसर - नाणेघाट




मंगळवार उजाडला आणि आमचे planing सुरु झाले. मंगळवार पासुनच हडसर निमगिरी करायचा असे ठरले. शनिवारी दुपारी सगळ ठरलं. आम्ही ६ जण होतो... संजय दादा, मेघा, केतकी, अनुश्री, विनीत आणि मी. रविवारी सकाळी ६.३० ला निघायचं असं ठरलं. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड, हा किल्ला बहुदा नाणेघाट व आजुबाजूच्या संरक्षणासाठी बांधला असावा. हडसरच्या पायथ्याचे गाव म्हणजे हडसर गाव.


रविवारी पहाटे ६.३० वाजता संजय दादाकडे पोहोचायचं ठरलं. आम्ही कोथरूड वरून ६.१५ वाजता संजय दादाकडे (आकुर्डीमध्ये) पोहोचलो. पण नेहमीप्रमाणे एकाने यायला उशीर केलाच आणि शेवटी आम्ही संजय दादाच्या सफारी मधुन ७.३० वाजता निघालो. पहाटे ४.३० लाच उठल्यामुळे सगळ्यांना कळवळून भुक लागल्या होत्या. आम्ही नारायणगावाच्या दिशेने निघालो. साधारण ८.३० वाजता आम्ही नारायणगावात पोहोचलो. 



सगळी दुकानं बंद होती, आम्ही नाश्त्यासाठी हॉटेल बघत होतो. आम्ही नारायणगाव सोडून थोडं पुढे गेलो (साधारण १ किमी) आणि आम्हाला परिवार नावाच एक हॉटेल मिळाल, तिथे आम्ही नाश्ता केला आणि परत नारायणगावात येऊन जुन्नर चा रस्ता पकडला. जुन्नर मध्ये पोहोचल्यावर एक शिवाजी पुतळा लागतो, येथे उजवीकडे वळुन सरळ गेल्यावर पहिले माणिकडोह धरण लागते. धरणाच्या बाजूनेच रस्ता सरळ पुढे हडसर कडे जातो. आम्ही माणिकडोह धरणापाशी थोडा वेळ आराम केला. आता साधारण ९.३० वाजले होते. थोडा वेळ आराम करून आम्ही हडसरची वाट पकडली. १५ - २० मिनिटात आम्ही हडसर गावात पोहोचलो.



हडसर गावातुन पुढे आम्ही गड चढायला सुरुवात केली. पहिले पठार पार केल्यावर समोरच एक महादेवाचे मंदिर लागते. गडावर पोहोचण्यासाठी ३ वाटा आहेत. मंदिराच्या उजवीकडून एक वाट जाते. ह्या वाटेने आपण एका बुरुजापाशी पोहोचतो. येथे गावातील लोकांनी सळया भिंतीत रोवुन पायऱ्यांचा मार्ग तयार केला आहे. हे कातळरोहण (rock patch) साधारण ४५ - ५० फुट आहे. मंदिरापासून ते बुरुजापर्येंत पोहोचायला आपल्याला साधारण १ ते १.३० तास लागतो. उजव्या बाजूस असलेल्या एका खिंडीत उतरून डाव्या पठारावर सरळ चढाई केल्यावर या वाटेस आपण पोहोचतो आणि कातळरोहण करून साधारण अर्ध्या तासात आपण गडावर पोहोचतो.






दुसरी वाट म्हणजे मंदिरापासून डाव्या बाजुस गेल्यावर एक घळ लागते. या घळीतून समोरच गडाची एक भिंत दिसते. या घळीतून सरळ चढाई केल्यावर आपण भिंतीपाशी येऊन पोहोचतो. भिंतीच्या उजव्या बाजुस साधारण २५ फुटाचे कातळारोहण केल्यावर आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी पोहोचतो. या वाटेने गडावर पोहोचण्यास साधारण २ तास लागतात. गडावर पोहोचण्यास तिसरी वाट म्हणजे या घळीतून न चढता, घळ उजव्या बाजुस ठेवुन घळीला वळसा घालावा. पुढे गेल्यावर उजव्या बाजुस अजून एक घळ लागते. या घळीतून साधारण ३०० पायऱ्या आहेत. ही वाट सगळ्यात सोप्पी असुन, या वाटेने गडावर पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात.





आम्ही दुसऱ्या वाटेने म्हणजेच घळीच्या मार्गे गडावर पोहोचलो. तिथे सर्वांनी न घाबरता आणि न डगमगता कातळारोहण केले. येथून वर गेल्यावर आपण पायऱ्यांचा मार्गे येणाऱ्या वाटेला भिडतो. आता कातळारोहण केल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव आला होता. रस्ता आधी माहित नसताना तिथून चढायची मजाच वेगळी असते. येथे दरवाज्यापाशी आम्ही घोषणा दिली आणि वरचा बाजूस निघालो. थोडंस वर गेल्यावर डाव्या बाजुस एक जुने धान्याचे कोठार (गुहा) आहे.


थोड्या पायऱ्या चढुन वर गेल्यावर आपण गडाच्या माथ्यावर एका पठारावर येऊन पोहोचतो. येथुन आपल्याला गडाची एक बाजु माणिकडोह धरणाला मिळालेली दिसते. थोडंस पुढे गेल्यावर एक स्वच्छ पाण्याचे टाक आहे. गडावरून समोरच चावंड किल्ल्याचे दर्शन होते. तसेच हरिश्चंद्रगड, शिवनेरी, नाणेघाट, जीवधनगड आणि निमगिरी, भैरवगड आदि किल्ल्यांचे दर्शन होते. तसेच कुकडी नदीचे सुंदर दर्शन होते. टाक्याच्या शेजारून सरळ पुढे गेल्यास एक मोठे महादेवाचे मंदिर आहे. आम्ही घळीच्या मार्गे गडावर आल्याने आम्हाला गडावरून सळ्यांचा मार्ग शोधायचा होता. आम्ही मंदिरापासून बुरुजाच्या मार्गावर निघालो. मध्ये एका मंदिराचे, शंकराच्या पिंडीचे अवशेष आहेत. झाडे खुप वाढल्याने आम्हाला वरच्या बाजूने सळ्या काही दिसल्या नाहीत पण वरून एका दगडावर पांढऱ्या रंगाने केलेली बाणाची खुण (वाट सापडण्यासाठी) दिसली.




आता किल्ला पूर्ण फिरून झाला होता आणि दुपारचे १.३० वाजले होते. आम्ही पायऱ्यांच्या मार्गे घळीतून गड उतरण्यास सुरुवात केली. या मार्गे पण आपण गडाची भिंत मागील बाजुस ठेवुन घळीत उतरू लागतो. या किल्ल्याचे बांधकाम बघूनच लक्षात येते की हा किल्ला जिंकणे किती कठीण जात असाव. पूर्ण एक टेकडी पार केल्यावर आपण एका पठारावर येवून पोहोचतो. मग शेतांच्या बांधावरून आम्ही पूर्ण घळीला वळसा घालुन साधारण ३.१५ वाजता हडसर गावातील एका विहिरीपाशी पोहोचलो.



येथे आम्ही जेवण करून थोडा वेळ आराम केला आणि नाणेघाटाच्या दिशेने निघालो. नाणेघाटात आम्ही साधारण ४.३० वाजता पोहोचलो. येथून जीवधन गडाचे अप्रतिम दृश्य नजरेस येते. नाणेघाटातील गुहा, पाण्याची टाके, रांजण आणि भिंतीवर कोरलेल्या मारुतीरायाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परत येताना आम्ही सकाळी थांबलेलो तेथे (परिवार हॉटेल) नाश्ता करून (कढी वडे) पुण्याच्या दिशेने निघालो आणि ११ वाजता घरी पोहोचुन आमच्या यशस्वी प्रवासाची सांगता केली....







- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)