
आज शनिवार (५ सप्टेंबर २०१५) गोपाळ अष्टमी. या वेळेस आमचा ट्रेक शनिवारीच ठरला. खरतर ट्रेक नाहीच म्हणता येणार कारण रस्ता कोणालाच माहित नव्हता. या वेळेस आम्ही रेकी किंवा exploration साठी जाणार होतो. खुप planning नंतर ठरलं गोप्या घाट ते शिवथरघळ करूयात. गोप्या घाट ट्रेक म्हणजे केळद (मढेघाट) च्यापुढे कुंबळे नावाचे गाव आहे, येथून हा ट्रेक सुरु होतो. एक आठवडा आधी सगळीकडून माहिती गोळा केली. ट्रेक रूट (नकाशा) तयार केला. तसेच स्वारगेटला जाऊन st गाड्यांची चौकशी करून आलो. स्वारगेट वरून सकाळी ६.३० वाजता वेल्हा गावाची बस (पुणे ते धिसर) आहे. पण वेल्ह्यामधुन पुढे कुंबळे गावापार्येंत जायला सोयीस्कर वाहन नाही, जीप्स असतात पण ते कुंबळेपर्येंत ८०० ते १००० रुपये मागतात. तसेच अजून एक st स्वारगेट वरून कुंबळेला आहे, पण ती दुपारी २.३० वाजता. ही st मुक्कामी आहे. त्यामुळे आदल्या दिवशी कुंबळे गावात राहुन दुसऱ्या दिवशी सकाळी हा ट्रेक सुरु करणे उत्तम. रेकी ट्रेक करायला आम्ही तिघ जण होतो मी, विवेक आणि श्वेता ताई. आम्ही शनिवारी सकाळी ६.३० च्या बसने निघायचं ठरवलं. वेल्ह्यामध्ये पोहोचल्यावर पुढचं बघु असं ठरवल. आता उपांडे घाट ते शिवथरघळ असं का ते पुढे लिहिलं आहे.
ठरल्याप्रमाणे आम्ही स्वारगेटला सकाळी ६ वाजता जमलो. सकाळी चौकशी केंद्रावर आम्हाला पाहिजे असलेल्या अजुन थोड्या गाड्यांची माहिती जमा केली आणि बसची वाट बघत उभे राहिलो. ६.३० वाजताची बस ७ वाजता आली. आम्ही त्या स्वारगेट - धिसर बसने वेल्ह्याला निघालो. ही बस सर्वजागी थांबत (सर्व थांबा) जाते. साधारणतः ९.१५ वाजता आम्ही वेल्हे गावात पोहोचलो. रस्त्यात आणि प्रवासात खुप मज येत होती. निरनिराळे दृश्य, शेती, फुले आणि डाव्या बाजुस उभा असा तोरणा गड. त्यात भूतोंड्याची खिंड स्पष्ट दिसत होती. ही खिंड आपल्याला राजगड - तोरणा या ट्रेक मध्ये लागते. आता वेल्ह्यात पोहोचल्यावर आम्ही बस conductor शी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि नाष्टा केला.
अश्याप्रकारे मजल दरमजल करत आम्ही १०.५० वाजता केळदला पोहोचलो. आता केळदपासुन कुंबळे गाव ७ किमी अंतरावर आहे. आम्हाला कुंबळे गावापार्येंत काहीच वाहन न मिळाल्याने आम्ही कर्णवडीच्या मार्गे निघालो. हा रस्ता म्हणजे उपांडे घाटाचा रस्ता. केळदपासुन उपांडे घाटमार्गे कर्णवडीला पोहोचायला साधारण १ तास लागतो. या घाटाचा उपयोग कर्णवडीमधील लोकं अजुनही करतात. त्यांना लागणारे राशन आणण्यासाठी त्यांना केळदला वर चढुन यावे लागते. अगदी ६० -६५ वर्षांची लोकसुद्धा या गावातुन उपांडे मार्गे वर येताना दिसतात. ही लोकं मनाने खूपच चांगली व प्रामाणिक आहेत. या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केळदपासुन कर्णवडीच्या मार्गे लागलो.
आता ११ वाजले होते. आम्ही आमचा ट्रेक सुरु केला. डोक्यावर प्रचंड ऊन होत आणि हवा सुद्धा खुपच दमट होती. पाऊस अजिबातच नव्हता. या मार्गे थोडंस पुढे गेल्यावर एक ओढा लागतो. यावर असलेल्या पुलावरून आम्ही चालत पुढे निघालो. साधारण १५ -२० मिनिटे चालत पुढे गेल्यावर उपांडे घाट सुरु होतो. हा घाट उतरत सरळ कर्णवडीला जातो. या घाटातुन सरळ खाली बघितल्यावर कोकणाचे उत्तम दर्शन होते. आता हा घाट उतरायला आम्ही सुरुवात केली. या घाटातुन खाली उतरताना एक पाण्याचा पाईप आपल्या बरोबर खाली उतरलेला दिसतो. तसेच वाटेत भरपूर पाण्याचे झरे दिसतात. जे उन्हाळ्यात कदाचित सुकत असावेत. साधारण एका तासात आम्ही कर्णवाडीस पोहोचलो. येथुन एक वाट सरळ खाली रानवाडीस तर डावीकडे जाणारी वाट आंबेनळीस जाते. आंबेनळी पासून पुढे वाट आंबे शिवथर आणि कुंभे शिवथर या गावास जाते.
प्रत्येक ट्रेक आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट शिकवून जात असतो. जर तुम्ही वेळेचे योग्य नियोजन केले असेल, जर ट्रेक करते समयी तुमचे तुमच्या चालण्यावर आणि वेळेवर नियंत्रण असेल, ट्रेकला येताना योग्य तेवढी माहिती बरोबर घेऊन तुम्ही निघाला असाल, तुमच्याजवळ योग्य तेवढा ट्रेकिंगचा अनुभव असेल, तर कितीही संकट आली तरी तुम्ही त्याच्यावर मात करून तुमचा ट्रेक यशस्वीरित्या पार पाडु शकता. वेळेवर नियंत्रण असण गरजेचे आहे, वेळेवर नियंत्रण असेल तर अपोआप पुढच्या गोष्टी जुळत जातात.
- साकेत घाणेकर
संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)
