सातमाळ सफर आणि प्रेमगिरी.... दिवस तिसरा (२५ डिसेंबर २०१५)




आज आमच्या सफारीचा तिसरा दिवस. नाशिकमधले जवळपास सर्वच किल्ले समुद्रसपाटीपासुन  उंचावर आहेत. नेहमीच्या सवयीप्रमाणे पहाटे ६ वाजता जाग आली, स्टोव्ह आणि इतर शिधा साहित्य आम्ही बाहेरच ठेवले होते. बाकीचं सर्व सामान आवरून आम्ही गरमागरम शिरा ब्रेकफास्ट साठी बनवला आणि त्यावर एक कप भर चहा घेतला. ३ दिवस सतत फिरत असल्याने आज व्यवस्थित नाश्ता करूनच किल्ल्यावर जायचं आम्ही ठरवलं. गावातील लोक सकाळीच उठुन कामाला लागले होते. डोंगरदेव सणानिमित्त गडबड चालु होती, कण्हेरगडाच्या बाजुस असलेल्या डोंगरात डोंगरदेव वसले होते. सर्वगाव आज तिकडेच जमा होत होते, त्यामुळे आमचा रस्ता चुकायला वावच नव्हता. आमचा नाश्तापाणी आणि इतर विधी उरकले आणि आम्ही छोटी बॅग घेऊन कण्हेरगडाच्या दिशेने निघालो.





कण्हेरगड


कण्हेरगड हा सातमाळ रांगेपासुन थोडा हटके आहे म्हणजेच थोडासा बाजुला/आडवाटेवर आहे. गडावर पोचायला दोन वाटा आहेत. एक वाट कण्हेरवाडी मधुन आहे तर दुसरी वाट सादडविहीर गावातुन आहे. आमच्या planning  प्रमाणे आम्ही सादडविहीर गावातुन चढणार होतो कारण प्रेमगिरी मधुन आम्हाला हे गाव जास्त जवळ होते आणि येथुन वाट जास्त मळलेली आहे, तसेच सादडविहीर मधुन वेळही कमी लागतो. गावातुन एक डांबरी सडक पुढे सरळ जाते, आपण या मार्गावरून चालत जायचे. पुढे सडक उजव्या बाजुस वळते आणि आपल्या डाव्या हाताला कण्हेरगड राहतो. या रस्त्यावरून जाताना आम्हाला बऱ्याच लोकांची गर्दी लागत होती. निरनिराळ्या, आसपासच्या गावातुन लोक डोंगरीदेव उत्सव साजरा करायला येत होते. आम्ही नजर उचलुन वर बघितले तर कण्हेरगडाच्या डाव्या बाजुच्या डोंगरात डोंगरदेव वसलेले. इथे बरेच लोक जमले होते आणि त्याची पूजा करत होते. आम्ही डांबरी रोड सोडुन डाव्या हाताची मळलेली वाट पकडली आणि चढाईला सुरुवात केली. २-३ जणांना विकविचारले असता माहित पडले काही लोक कण्हेरवाडी मधून आले होते. आम्ही डावीकडील डोंगराच्या मध्यावर पोचलो. येथुन डावीकडील वाट डोंगरदेवाकडे घेऊन जाते तर उजवीकडील वाट कण्हेरगडाच्या खिंडीत घेऊन जाते. आम्ही उजवीकडील वाट पकडली आणि खिंडीच्या दिशेने चढायला सुरुवात केली.


वाटेत जाताना मागे वळून बघितले असता समोर डोंगर, सादडविहीर आणि गावात धुकं, पक्ष्यांचे थवे एकदम मस्त नजर दिसत होता, अगदी आपण थंडीतील चित्र काढतो तसच. थंडी तर विचारूच नका, दोन दिवस अंगात घातलेले स्वेटर अजुन उतरवले नव्हते. पायथ्यापासून अर्ध्यातासात आम्ही खिंडीत येऊन पोहोचलो. येथे जरावेळ आम्ही अराम केला. पलीकडे कण्हेरवाडीमधून येणारी वाट या खिंडीत मिळते. कण्हेरवाडी लांबवर उन्हात न्हाऊन निघत होते. कण्हेरवाडी मधुन खिंडीपर्येंत यायला १ तास लागत असावा. खिंडीतुन सरळ वर बघितले असता अजून तासाभराची चढाई बाकी होती. इथुन पुढची सर्व चढाई छातीवर आहे आणि प्रचंड घसाऱ्याची वाट आहे. पण वाट रुंद असल्याने अपघाताची भिती नाही. खिंडीपर्येंत तर नुसता warm up होता खरी कस आता लागणार होती. जरा वेळ विश्रांती घेऊन आम्ही चढायला सुरुवात केली. गडावरच्या महादेवाच्या पाया पडुन बरेच लोक गड उतरून खाली येत होते. आम्ही आपले पावले हळू हळू टाकत, आधार घेत पुढे पुढे जात होतो. समोरच गडाचा एक बुरुज दिसतो. आम्ही या बुरुजाच्या दिशेने चढाई करत होतो. बुरुजाच्या जवळ पोहोचल्यावर आपण कातळात कोरलेल्या पायऱ्यांपाशी येतो.




बुरुजापाशी पोचल्यावर आम्ही जरा वेळ आराम केला. आत्तापार्येंत ८. वाजले होते. पायऱ्यांच्या मार्गाने आम्ही गडाच्या पहिल्या टप्प्यात आलो, येथे एक पाण्याचे सुकलेले टाके आहे. हे बघुन आम्ही सरळ वर न चढता पायवाटेच्या मार्गाने डावीकडून सरळ चालू लागलो. पुढे परत पायऱ्यांच्या मार्गाने आपण गडाच्या प्रमुख आकर्षणापाशी म्हणजेच नेढ्यापाशी येऊन पोहोचतो. नेढ्यातून पलीकडचा प्रदेश तसेच गडाची माची न्याहाळता येते. गडाचा माथा माचीसारखा पसरला आहे. पत्ता गावाचे doom version अगदी. नेढ्यापाशी आम्ही जरावेळ अराम करून पुढे निघालो, नेढ्याच्या बाजूने जाणारी वाट आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जाते. येथे दोन फूट उंचीचे दोन खांब बसवले आहेत. इथे पोचलो की आपण गडाच्या माथ्यावर पोचतो. माथ्यावर पोहोचताच मन मोहून जाते. धोडप, रवळ्या-जवळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी किल्ले  डोळ्यासमोर दिसतात.


माथ्यावर येथे दोन सुकलेली टाके आहे. थोडस पुढे गेल्यावर झाडांमध्ये जुन्या इमारतींचे बरेच अवशेष पाहायला मिळतात. अजून थोडं पुढे गेल्यावर अजुन एक खराब पाण्याचे टाके आहे. टाक्यांपासून उजवीकडे गेल्यावर एक महादेवाचे उघड्यावर मंदिर आहे, त्याच्या बाजुलाच तुळशी वृंदावन आहे. मागील बाजूस मोठ्या इमारतीचे अवशेष शिल्लक आहेत, तसेच बाजूला पाण्याचे टाके आहे, पाणी पिण्यालायक आहे. हे  बघुन आपण सरळ चालत जायचं माचीच्या दिशेने. गडाची माची अगदी धोडप सारखीच आहे, मध्ये तुटलेली आहे. उलटे येताना आपण धोडपच्या दिशेने चालायचे येथे कड्यात एक गुहा कोरली आहे. गुहेत सहज ४-५ जणांना मुक्काम करता येतो. आत्तापार्येंत ९. वाजले होते, आम्ही सोबत आणलेले खजूर खाऊन घेतले, पाणी प्यायलो आणि परतीच्या वाटेवर निघालो. गडावर गुहा सोडून कोठेही निवारा अथवा सावली नाही. सांभाळत उतरत, तोल सावरत आम्ही खिंडीत येऊन पोचलो. इथून पुढे मळलेल्या वाटेने पटापट उतरत, ११ वाजता सादडविहीर गावात दाखल झालो. सगळं सामान आवरून, शांताराम भोईरांचा निरोप घेतला आणि मार्कंड्या किल्ल्याच्या दिशेने कूच केली.




मार्कंड्या


मार्कंडेय ऋषीमुनींचा "मार्कंड्या"!!! या गडावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते म्हणुन हा किल्ला मार्कंड्या नावाने ओळखला जातो. गडाच्या बालेकिल्ल्यावर मार्कंडेय ऋषींचा प्रसिद्ध आश्रम आहे. सापुतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किलोमीटरवर वणी नावाचे गाव आहे. या गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणीपासून ९ किमीवर बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्ता वर चढत जाऊन २ किमीवरील मुळणबारी खिंडीत येतो. खासगी वाहन असल्यास आपण मुळणबारी खिंडीत गाडी लावू शकतो. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्या–जावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते.शहाजहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर पाहता येतो. वणी – दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हे किल्ले परत जिंकले. अखेरीस पुन्हा एकदा मार्कंड्या मराठ्यांच्या ताब्यात आला.


सादडविहीर वरून आम्ही निघालो आता जेवायची वेळ झाली होती. सादडविहीर ते मुळणबारी खिंड अंतर साधारण १० किमी आहे. वाटेत कुठेही हॉटेल नसल्याने आम्ही कळवण ला उलटे गेलो आणि जेवण केले. परत येऊन मुळणबारी मध्ये गाडी लावली. मुळणबारी हे गावाचे नाव नसुन रवळ्या-जवळ्या आणि मार्कंड्या यांच्यामधील खिंड, बारी म्हणजेच खिंड. खिंडीत परत पोचायला आम्हाला १ वाजला. खिंडीतूनच खडी चढण चालू होते. दगडांचा राजमार्ग केला आहे, दोन्हीबाजुंना रेलिंग केले आहे तसेच मधे मधे बसायला बाकडे केले आहेत. गडाच्या पहिल्या टप्प्यात एक शंकराचे छोटे मंदिर पत्र्याच्या शेडमध्ये बनवले आहे आणि पादुका आहेत. येथून धोडप चे उत्तम दर्शन होते. तसेच राहिल्या किल्ल्याचे दर्शन होते. येथून पुढे गेल्यावर आपण गडाच्या पदरात असलेल्या पठारावर पोचतो. सरळ पुढे चालत आल्यावर कातळात बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आपल्या नजरेस पडतात. येथून पहिल्या टप्प्यात दोन गुहा कोरल्या आहेत यांना "ध्यान गुंफा" म्हणतात.





या गुहांपाशी आम्ही जरावेळ विश्रांती घेतली आणि पुढे पायऱ्यांच्या मार्गे निघालो. येथे तुलेल्या तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात तसेच उजच्या बाजुला बुरुजांचे अवशेष दिसतात. खिंडीमध्ये पोचल्यावर समोर सप्तशृंगी गडाचे दर्शन होते. हे पाहुन आपण कातळकोरीव पायऱ्यांनी बालेकिल्ल्याकडे जावे. येथे पहिल्या टप्प्यात एक नव्याने उभारलेला आश्रम आहे. तसेच घुमटाखाली एक टाके आहे. या टाक्याला "शिवकुंड" अथवा "कमंडलु तीर्थ" म्हणतात. या टाक्याला बारमाही पिण्याजोगे पाणी असते. तसेच सामोर एका झाडाखाली गणेशाची, श्रीकृष्णाची आणि शंकराची मूर्ती आहे. थोडंस वर चढुन गेल्यावर ३ पाण्याची टाके आहेत पण यातील पाणी खराब आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर मार्कंडेय ऋषींचे मंदिर आहे. मंदिरासमोर धातूचा नंदी आहे तसेच मंदिरामध्ये ऋषींची मुर्ती, पादुका आणि शिवलिंग आहे. या मंदिरामध्ये एक साधूबाबा असतात. येथे आम्ही जरा वेळ अराम केला आणि बाहेर पडलो. गडाच्या या सर्वोच्च माथ्यावरून धोडप, सप्तशृंगी, रवळ्या-जवळ्या हा प्रदेश न्याहाळता येतो तसेच वातावरण साफ असल्यास सालेर-मुल्हेर डोंगररांग (डोलबारी रांग) दिसते.

मार्कंड्याच्या बालेकिल्ल्यावरून दिसणारे हे सर्व दृश्य आम्ही मनात साठवलं आणि गाद उतरायला सुरुवात केली. बालेकिल्यापर्येंत पोहोचायला आम्हाला ३ वाजले होते. आता बऱ्यापैकी ऊन होते. गडाच्या पदरात असलेल्या पठारावर सद्गुरू महाराजांचा एक मोठा आश्रम बांधण्यात आला आहे, येथे १०० लोकांची राहायची तसेच जेवणाची सोय होते.या म्हाला थोडा उशीर झाल्याने प्रसादाचा स्वादास्वाद घेता आला नाही. या आश्रमाशेजारीचे सप्तशृंगीचे नव्याने मंदिर उभारले आहे. आश्रमाच्या पटांगणात सद्गुरू रंगनाथ महाराज यांची समाधी आहे.आश्रमामध्ये शिरल्यावर सभामंडपात तीन मंदिरे बनवली आहेत आणि त्या समोर एक तुळशी वृंदावन आहे. एका मंदिरात श्रीकृष्ण, दुसऱ्या मंदिरात गणपती आणि तिसऱ्या मंदिरात श्रीदत्त आहेत. आश्रमाच्या मुख्य दालनात सद्गुरू महाराजांची मुर्ती व इतर देवांचे फोटो आहेत. बाहेर एक शनीची मूर्ती आहे तसेच त्यासमोर  शंकर, नंदी,गणपती आणि हनुमंताचे मंदिर आहे.




आता आम्ही परतीच्या वाटेल लागलो. आत्तापार्येंत दुपारचे ४ वाजले होते, आमच्या हातात बराच वेळ शिल्लक होता. ४.३० वाजता आम्ही मुळणबारी खिंडीत पोचलो. सर्व सामान आवरून आम्ही मुळाणे गावाकडे निघालो. मुळणबारी खिंड ते मुळाणे हे फक्त ४ किमीचे अंतर आहे. आज आमचा मुक्काम मुळाणे गावात होता. ५ वाजता आम्ही मुळाणेमध्ये पोचलो,डांबरी रस्त्याला लागुन गावाच्या सुरुवातीला एक शाळा आहे. या गावात सुभाष ठाकरे यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडुन शाळेची चावी घेतली. शाळेच्या समोरच धोडप दिसत होता, समोर पाण्याचा हापसा होता, अजून काय सुख पाहिजे आयुष्यात. आम्ही सगळ्यात पहिले झोपायची तयारी करून ठेवली , थंडी एवढी होती की आम्हाला शाळेतही टेन्ट उघडावा लागला, शिधा साहित्य बाहेर काढुन ठेवले. चहाचे साहित्य बाहेर काढले आणि चहा बनवला. एकीकडे सुर्य मावळतीला जात होता तर एकीकडे आमच्या हातात चहाचा कप. सूर्यास्ताचा आनंद लुटत असतानाच खबर मिळाली आमचे अजून ३ मित्र आज रात्री येत आहेत. ते आम्हाला उद्याच्या सफर साठी म्हणजेच रवळ्या-जवळ्या साठी साथ देणार आहेत. आम्ही रात्रीचे जेवण बनवले आणि झोपून गेलो. पहाटे ३ वाजता तिघेही मित्र (निलेश, श्री आणि पराग) पोचले. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत मी आणि हर्षल त्यांना घेऊन आलो आणि मग परत एकदा आम्ही सुप प्यायलो आणि थोडी ऊर्जा अंगात निर्माण करून कुडकुडत झोपुन गेलो.




- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)