गोरखगड





दोन आठवड्यांपुर्वी ठरलेलं गोरखगड करायचा, दिवस १३ डिसेंबर २०१५. या वेळेस beyond mountains सोबत ट्रेक करायचं ठरलं. सगळीकडे प्रचार झाला. या वेळेस आम्ही एकूण ३५ जण जाणार होतो. एक मोठी बस बुक केलेली. रविवारी (१३ डिसेंबर २०१५) ला सकाळी ५.३० ला निघायचे ठरले. एक दिवसाचा ट्रेक असल्याने नेहमीप्रमाणे २ पाण्याचा बाटल्या, २-३ बिस्कीटचे पुडे आणि खजूर बरोबर घेतले. बाकी नाश्ता, जेवण वगैरे बाहेरूनच सांगितले होते. नाशिक मधील सातमाळ डोंगररांगेचा बेत डोक्यात असतानाच गोरखगडचा बेत शिजला. सगळी तयारी झाली fc road ला भेटायचे ठरले. सकाळी ४ वाजता उठावे लागणार होते. आधी सलग ट्रेक झाल्याने डोळ्यावर झोप होतीच. आता फक्त उद्या पहाटेची वाट बघत झोप लागली.



पहाटेचे ४ वाजले आणि कर्णकर्कश्य आवाजात गजर कानाजवळ वाजला. साखरझोपेची मोड झाली. चला आता उठायची वेळ झाली. अजुन राविराजांना डोक बाहेर काढायला बराच वेळ होता. पटापट आवरून घराचा उंबरठा ओलांडला आणि आम्ही कोथरूड वरून निघालो. fc road पाशी बस उभी होतीच. समोरच पार्किंगमध्ये आम्ही गाड्या उभ्या केल्या आणि सर्व जण जमायची वाट बघत उभे राहिलो. ५.३० वाजता सर्व जण जमले पण मुळात सोबत न्यायचे नाश्ता आणि जेवण अजुन आले नव्हते. ६ वाजता डबाबंद जेवण आले ते आम्ही गाडीत चढवले आणि चिंचवडच्या दिशेने निघालो. 



चिंचवडमध्ये काही लोकांना घेऊन आम्ही थेट मुरबाडचा रस्ता धरला. निघेपर्येंत ७ वाजले. बाहेर बऱ्यापैकी थंडी होती. आम्ही जसे जसे पुढे सरकत होतो, तसतसा रविराज डोके उंचावु लागला. बोचणाऱ्या थंडीसोबतच आता कोवळ्या उन्हाची ऊब मिळत होती. साधारण ९ वाजता आम्ही कर्जत पार करून नेरळ मध्ये मुरबाड फाट्यावर येऊन पोहोचलो. पण तेवढ्यात लक्षात आले मुंबई वरून दोघे जण यायचे होते. त्यांना फोन केले आणि जकात नाक्यापाशी बोलवुन घेतले. ते ९.४५ वाजता पोहोचले आणि आम्ही मुरबाड ते देहरी (गोरखगडाच्या पायथ्याचे गाव) असा आमचा अंतिम टप्प्यातील प्रवास सुरु केला. उशीर झाल्या कारणाने आम्ही जवळ आणलेल्या नाश्त्याची गाडीतच वाटप केली आणि नाश्ता उरकला. थोड्याच वेळात समोर सिद्धगड आणि मागे उभा आहुपे घाट व भिमाशंकरचे जंगल असे विलक्षण आणि मोहक दृश्य दिसु लागले. आता गोरखगडापर्येंत पोहोचेस्तोर गडाबद्दल थोडे ऐकुयात.






देहरी हे गोरखगडाच्या पायथ्याचे गाव असुन याला गोराखचा सुळका असेही म्हणतात. मुरबाड मधील पसरलेल्या आहुपे या सह्यारांगेम्ध्ये गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे दोन सुळके लक्ष वेधुन घेतात. मच्छिंद्रगड हा गोरखगडाच्या बाजुचा सुळका असुन गावातील लोकं याला गोरखगडाचा भाऊ असेही म्हणतात. मच्छिंद्रगडाची चढाई बिकट आणि अवघड असल्याने तांत्रिक साधनांशिवाय या किल्ल्याची चढाई करणे कठीण आहे. तर गोरखगडाची चढाई तांत्रिक साधनांशिवाय माथ्यापार्येंत करता येते. गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ या गुरु-शिष्यांमुळे या दोनही सुळक्यांना गोरखगड आणि मच्छिंद्रगड अशी नावे आहेत. दरवर्षी मार्गशीष पौर्णिमेला येथे जत्रा भरते असे गावातील लोकांनी आम्हाला सांगितले. लांबुन पहिले असता गोरखगडाच्या माथ्यापार्येंत वाट असेल यावर विश्वास बसत नाही. ऐतिहासिक काळात आहुपे घात आणि परिसरावर नजर ठेवण्यास या किल्ल्याची उभारणी केली असावी. शिवकाळात हा गड मराठ्यांच्या अंमलाखाली होता. 


नंतर १९६३ च्या सुमारास मोघाळणी यावर विजय मिळवला. पुढे १७४८ च्या सुमारास मराठ्यांनी या गडावर भगवा झेंडा रोविला. दुर्दैवाने १८१८ मध्ये या गडाचा ताबा ब्रिटीशांकडे गेला. छोट्या दिसणाऱ्या या सुळक्यावर बरेच अवशेष शिल्लक आहेत. गडावर बघायला पाण्याची टाके, प्राचीनकालीन गुहा, खोबणीच्या पायऱ्या आणि सर्वोच्च माथ्यावर गोरखनाथांचे मंदिर आहे. हा सुळका, यावरील कातळ कडे, गडावर शिरण्याचा भुयारी मार्ग आणि कसदार (छातीवर) चढाईमुळे या किल्ल्याला वेगळाच असा मान आहे. या गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून सिद्धगड, आजोबा, कळसुबाई, जीवधन, नाणेघाट, ढाकोबा, हरिश्चंद्रगड असा बराच लांबचा प्रदेश न्याहाळता येतो.







११.१५ वाजले होते आम्ही देहरी गावात पायउतार झालो. तसा बराच उशीर झाला होता. रविराज डोक्यावर बसून थैमान घालत होते. ठाण्याच्या उकाड्याने नकोस होत होतं. आम्ही पटापट सामान आवरले आणि गडाच्या दिशेने निघालो. येथे पायथ्याशी गोरखनाथांचे मोठे आणि प्रशस्त मंदिर आहे. या मंदिरामध्ये सर्वांना योग्य ते सल्ले दिले गेले. सोबत आणलेल्या जेवणाचे डबे वाटले गेले. मंदिराच्या  मागील बाजुस असलेल्या पायवाटेने आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. सुरुवाती पासुनच सर्व चढ छातीवर आहे आणि त्यात उकाडा जीव घेत होता. दुपारचे बारा वाजले होते. 


संपूर्ण शरीरातुन घाम निथळत होता. निव्वळ तासभराच्या चढाईनंतर आम्ही गडाच्या समोर असलेल्या मोकळ्या  पठारावर येऊन पोहोचलो. येथे थोडासा गारवा आला आणि मनाला ठंडक पोहोचली. येथुन पुढील वाट जंगलातुन असल्याने उन्हाचा एवढा त्रास होणार नव्हता. थोडंस पुढे गेल्यावर आपण सुळक्याच्या पदरात येऊन पोहोचतो. येथून डावीकडे जाणारी वाट मच्छिंद्रगडाकडे जाते तर उजवीकडील वाट गोरखगडाकडे जाते. सुळका डाव्या बाजूस आणि दरी उजव्या बाजूस ठेवून आपण सरळ चालत राहायचे. थोड्याच वेळात आम्ही गडाच्या दुसऱ्या टप्प्यात (पदरात) उघड्यावर असलेल्या शिवलिंग आणि नक्षीदार खांबांपाशी येऊन पोहोचलो. येथेसुद्धा गोरखनाथांचे एक सुरेख मंदिर आहे. येथे घनदाट सावली असल्यामुळे येथे थोडा वेळ आराम करावा कारण येथुन पुढे खडी चढण आहे आणि अजिबात सावली नाही. आम्ही जर वेळ येथे आराम केला आमच्या जवळ असलेल्या खाद्य पदार्थ आणि फळांवर ताव मारला आणि पुढे निघालो.






आता १२.४५ वाजले होते. आम्ही गडाच्या तिसऱ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. थोडस पुढे जाताच आपण तिसऱ्या टप्प्याच्या खाली येऊन पोहोचतो. वर नजर टाकली असता केशरी शेंदूर फसलेला, कातळात कोरलेला भव्य असा गोरखगडाचा दरवाजा दिसतो. त्या दरवाज्यापर्येंत खडी चढण आहे. येथे पोहोचण्याठीच्या थोड्या कठीण असुन दोन्ही बाजूस दरी असल्याने काळजीपूर्वक चढावे लागत होते. या टप्प्याच्या मध्यावर पोहोचताच एक पायरीवर शिलालेख कोरलेला नजरेस येतो. आम्ही साधारण २० मिनिटात दरवाज्यापाशी येऊन पोहोचलो. येथुन पुढे एक वाट डावीकडे आणि एक वाट उजवीकडे जाते. डावीकडील वाटेवरून गेल्यावर एक गुहा, पाण्याचे टाके आणि शिल्प लागते. हे बघुन माघारी फिरायचे. आम्ही परत येऊन उजवीकडील वाटेने सरळ गेलो. येथे वाटेतच २-३ पाण्याची टाके लागतात. ५-१० मिनिटात आपण गडावरील प्रशस्त गुहेजवळ येउन पोहोचतो. आता पर्येंत १.१५ वाजले होते. आम्ही जरा वेळ गुहेत आराम केला. आता पोटात कावले ओरडु लागले होते. आमच्याजवळ असलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. आता गडाची अंतिम चढाई बाकी होती.



आमची जेवण आटपली, जवळच असलेल्या पाण्याच्या टाक्यातून पाणी पिऊन घेतले. मन तृप्त झालं.  आता अंतिम चढाई थोडी अवघड असल्याने आम्ही आमच्या जवळील समान गुहेतच ठेवले आणि सर्वोच्च माथ्याकडे कुच केली. येथे आधीच भरपूर मंडळी उपस्थित होती. माथ्यावर पोहोचायला प्रथम ९-१० फुटांचा कातळटप्पा पार करावा लागतो. येथे बऱ्यापैकी गर्दी होती. आम्ही थोडा वेळ वाट बघितली आणि सर्व मंडळी परतल्यावर आम्ही चढाई सुरु केली. कातळटप्पा पार केल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो. ह्या पायऱ्या कमरे एवढ्या उंच असुन याला पकडायला खोबण्या तयार केल्या आहेत. जेमतेम आपण उभ राहु एवढ्या आकाराच्या ह्या पायऱ्या आहेत तर दुसऱ्या बाजूस खोल दरी आहे. या पायऱ्या चढत असताना मच्छिंद्रगडाचे सुंदर दर्शन होते. तसेच मागील बाजुस आजोबा, नाणेघाट आणि जीवधन माना उंचावून उभे आहेत. १५ मिनिटात आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचतो. येथे गोरखनाथांचे सुंदर मंदिर आहे. गडाचा माथा सुळका असून बऱ्यापैकी मोठा आहे. येथूनच समोर आहुपे घाट, उत्तरेस सिद्धगड तर दक्षिणेस मच्छिंद्रगड, आजोबा, हरिश्चंद्रगड, कळसुबाई, जीवधनगडाचे दर्शन होते.



येथे थोडा वेळ आराम केला. गड किल्ले म्हटलं कि वेळेचे सुद्धा भान हवेच. त्यात हे थंडीचे दिवस म्हणजे सुर्यास्त लवकर होतो. आत्तापर्येंत दुपारचे ३ वाजले होते. त्यात वाटेत जंगल आहे. जंगलात अंधार लवकर होतो. आता निघायला हवे. येथे मंदिरासमोर घोषणा दिली आणि आल्या वाटेने परतीचा मार्ग धरला. पटापट खाली उतरत कातळटप्पा पार केला आणि गुहेपाशी येऊन पोहोचलो. येथे असलेल्या टाक्यापाशी सगळ्यांनी पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. सट-सट खाली उतरत गडाच्या पदरात असलेल्या दरवाज्यापाशी पोहोचलो. येथेपर्येंत यायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागला. येथून जंगलाच्या वाटेने भर भर खाली उतरत साधारण ५ वाजे पर्येंत पायथ्याशी असलेल्या मंदिरात आम्ही पोहोचलो. देहरी गावात एक गरम गरम चहा प्यायलो ( ज्याचा लाभ काही लोकांनाच मिळाला).  नेरळमध्ये मुंबईच्या दोन विरांना सोडले आणि आम्ही पुढे निघालो. ८ वाजले, आता सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या मग कर्जत मध्ये प्रसिद्ध हॉटेल रमाकांत येथे आम्ही वडापाव, चहा आणि मिसळीचा आस्वाद घेतला आणि पुण्याच्या दिशेने रवाना झालो. रात्री १०.३० वाजता पुण्यात परत पोहोचून आम्ही आमच्या ट्रेकची सांगता केली.





- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)