दिवस
तिसरा (४ ऑक्टोबर २०१५) : रामशेज किल्ला
 |
| रामशेज किल्ला |
 |
| गुहेतील पिंड आणि नंदी |
पहाटेचे
५ वाजले होते. बाहेर अजुन अंधारलेल होत. गोड गुलाबी थंडी म्हणतात तशी ती आमच्या पांघरुणात
शिरत होती. उठायची इच्छा होत नव्हती, पण आज आम्हाला रामशेज किल्ला पुर्ण करून घरी परत
जायचे होते. वेळ कमी होताच आणि दुसरा पर्यायही नव्हता. या विचारानेच आम्ही सगळा आळस
झटकुन ताडकन उभे राहिलो. स्लीपिंग bag आणि बाकीचे साहित्य आम्ही पटापट आवरायला घेतले.
रामशेज हा किल्ला पार्वती एवढ्या उंचीचा असला तरी तो निट आणि शांतपणे बघायला आम्हाला
२ तास लागणारच होते. आमच्याजवळ असलेले पाणी संपले होते. तेवढ्यात गावातील एक मावशी
आम्हाला जाताना दिसल्या. त्यांच्याकडुन आम्हाला भरपूर पाणी मिळाले. रात्री ज्यांच्या
कडुन आम्हाला गोधड्या मिळाल्या होत्या त्या त्यांना परत केल्या. सांगायचं राहील की
या हनुमंताच्या मंदिरात वरच्या बाजुस एक वाचनालय आहे. त्या मावशींकडून पाणी भरून घेतले.
सकाळचे सगळे विधी पुर्ण झाले. आता चहा प्यायची सगळ्यांना खूप इच्छा झाली होती. पण परत
स्टोव्ह काढा आणि त्यात एवढा वेळ घालवा यासाठी आम्हाला वेळ अपुरा पडणार होता कारण संध्याकाळी
५ च्या आत घरी पोहोचायचे होते. आता सकाळचे ७ वाजले होते. सगळे जण आवरून तयार झाले होते.
रिकाम्या पोटी ट्रेक करून नये म्हणुन आम्ही फक्त बिस्कीट आणि खजुराचा आहार करून गडाच्या
दिशेने हालचाल केली. मंदिराच्या बाजूस असलेल्या डांबरी रत्याने सरळ गेल्यावर डाव्या
बाजुस एक चिंचेच झाड आहे, येथुन मळलेली वाट थेट किल्ल्यावर जाते. चला आता या झाडापर्येंत
पोहोचेस्तोर तुम्हाला रामशेज किल्ल्याची माहिती देतो.
 |
| रामशेज किल्ल्यावरील एक दरवाजा |
रामशेज
म्हणजे रामाची शय्या. राम वनवासात होते तेंव्हा त्यांनी या किल्ल्याला भेट दिली होती
अशी आख्यायिका आहे. रामशेज किल्ला छोटा असला तरी छत्रपती संभाजीराजांच्या कारकिर्दीत
या किल्ल्याचा मोठा आणि अद्भुत इतिहास आहे. १६८२ मध्ये मोगली सैन्याचा सेनापती शहाबुद्दीन
फिरोजजंगने रामशेज जिंकण्याकरिता वेढा घातला. त्यावेळी गडावर केवळ ६०० मावळे गडराखणीस
उभे होते. बघता बघता ५० हजार मोगली सैन्याने हा वेढा करकचून आवळला. गडावर तोफा नव्हत्या,
मोगल जसजसे गडाकडे सरकु लागले तशी अचानक गडावरून दगडांची अतिश्बडी सुरु झाली. शहाबुद्दीनचा
तोफखाना धडाडू लागला. पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या. किल्लेदाराने सुताराकडून लाकडी
तोफा बनवून घेतल्या आणि त्याला आतील बाजूस अस्तर लावले. या तोफांमध्ये दारुगोळा भरून
मोगलांवर हल्ला चढवण्यात आला. आता एक तोफसुद्धा मोगलांना भारी पडु लागली. शेवटी शहाबुद्दीनने
रामशेज शेजारील टेकडीवर रामशेज पेक्षा उंच लाकडी बुरुज (दमदमा) उभा केला. त्यावरून
हल्ला केला पण तोही व्यर्थ ठरला. शेवटी औरंगजेबाने शहाबुद्दीनला परत बोलावून बहादुरखानास
पाठवले, पण औरंगजेबाचा हा प्रयत्न पण व्यर्थ ठरला. मग त्याने पुढे किरमाणी नावाच्या
सरदाराला पाठवले पण रामशेजच्या किल्लेदाराने त्यालाही हुड्कावून लावले. एकटा किल्लेदार
औरंगजेबाच्या सर्व सरदारांना पुरून उरला. दुर्दैवाने या किल्लेदाराचे नाव इतिहासात
उपलब्ध नाही. पण शंभुराजाने किल्लेदाराचा पोशाख, रत्नजडीत सोन्याचे कडे घालून सत्कार
केल्याची नोंद इतिहासात आहे. अशा प्रकारे या किल्ल्याने मोगलांशी ५ वर्षे झुंज दिली.
पुढे हा किल्ला १६८७ मध्ये मोगलांनी जिंकला. नंतर पेशवाई मध्ये हा किल्ला परत मराठ्यांच्या
ताब्यात आला. रामशेज किल्ल्यावर पोहोचण्यासाठी नाशिक शहराच्या ५ किमी अलीकडे पेठ फाटा
लागतो या मार्गाने जावे लागते.
 |
| रामशेज माची |
साधारण पाऊण तासाच्या प्रवासनंतर आशेवाडीचा फाटा लागतो.
येथून उजवीकडे एक फाटा जातो तो सरळ मारुती मंदिरापाशी येतो. या मंदिराच्या बाजूने पायवाट
सुरु होते. येथून आपण पायवाट आणि पायऱ्या यांच्या मार्गे अर्ध्या तासात गडाच्या मुख्य
दरवाज्यापाशी पोहोचतो. येथे उजवीकडे एक गुहा आहे ज्यात कुंडात वसलेले महादेवाचे पिंड
व नंदी आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर शेजारील कड्यात रामाचे सुरेख मंदिर आहे. येथे
आपण मुक्काम करू शकतो. या मंदिराच्या डाव्या बाजूस खाली उतरून भुयारी टाके आहे. येथून
वरच्या बाजूस आल्यावर आपल्याला समोरच गडाची माची दिसते. येथे माचीवर एक पाण्याचे टाक
आणि ध्वजस्तंभ आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर दोन धान्याची कोठारे, पाण्याची टाके
आणि भगवती मातेचे मंदिर आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून सातमाळ रांग, त्र्यंबकरांग
आणि भोरगड दिसतात. गडावर उत्खननाचे काम सुरु असून त्यातुन कातळकोरीव पायऱ्या, प्रवेशदार,
चोर दरवाजा, दोन भव्य गुहा असे बरेच दुर्गअवशेष उजेडात आले आहेत.
 |
| रामाचे मंदिर |
 |
| चोर दरवाज्याची वाट |
सकाळी
साडेसात वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली. आमच्या सोबत बरीच चिमुरडी आणि त्यांचे
बाबा लोकं किल्ला बघायला आले होते. आम्ही सगळे एकत्रच वर निघालो. दोन दिवस एवढी दमछाक
होऊन सुद्धा हा किल्ला चढताना काहीच वाटत नव्हतं. सर्व शीण, आळस, कंटाळा सर्व लांबवर
पळाल होत. आम्ही सर्व चिमुरड्यांना घेऊन सर सर वर चढत अर्ध्या तासात किल्ल्याचा दरवाज्यापाशी
पोहोचलो. येथे उजव्या बाजूस एक गुहा असुन या गुहेत पाण्याचे कुंड आहे. या कुंडच्या
मध्यस्ती महादेवाची पिंड आणि नंदी आहे. तसेच गुहेच्या बाहेर उजव्या बाजुस उघड्यावरच
एक महादेवाची पिंड आहे. या गुहेच्या वरच्या बाजूस नजर टाकली असता वरून काही पायऱ्यांचा
मार्ग आलेला आपणास दिसतो आणि तो गुहेच्या वरच्या बाजुस संपतो. या मार्गावर यायला गडाच्या
वरच्या बाजूस असलेल्या चोर दरवाज्याने येत
येते. या पिंडींचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. दरवाज्यातून आत शिरल्यावर रामाचे
मंदिर आहे. आम्ही ते येताना बघणार होतो. आम्ही पुढे गडाच्या माथ्यावर गेलो. येथे समोरच
एक दरवाजा आहे तो उतरून खाली जाता येते. खाली उतरून गेल्यावर आपल्याया चोर दरवाज्याचे
दर्शन होते. तसेच येथे मोठ्या गुहा आहेत आणि या गुहांच्या आतुनच चोर मार्ग आहे. हे
सर्व बघुन आम्ही उलटे फिरलो. वरती परत आल्यावर उजव्या बाजुस एक वाट सरळ गडाच्या माचीवर
जाते. या माचीवर असलेल्या ध्वजस्तंभाला आम्ही वंदन केले. येथे जवळच एक पाण्याचे टाके
आहे, ते बघुन येथे थोडा वेळ फोटोग्राफी केली. परत उलटे फिरून मुख्य माथ्यावर आलो. येथे
आम्ही सगळ्यांसोबत खणखणीत आवाजात घोषणा दिली. घोषणा दिली कि आवाज घुमलाच पाहिजे. अंगात
संचारालच पाहिजे. घोषणा देऊन आम्ही गडाच्या माथ्यावर न जाता उजव्या हाताने सरळ गेलो.
येथे दोन भव्य दरवाजे आपल्या नजरेस येतात.
 |
| रामशेजवरील पाण्याचे टाके |
दरवाज्याचे बांधकाम खूपच सुरेख असून यावर
अतिशय सुंदर अशी शिल्प कोरलेली आहेत. या दोन दरवाजांच्या मधूनच एक वाट खाली भूयाऱ्याकडे
जाते. या मार्गे आत शिरले असता सुरुवातीला लागलेल्या गुहेच्या वरच्या बाजुस आपण येतो.
येथून पण कुंड व महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते. एवढे सर्व बघून आम्ही परत मुख्य माथ्यावर
आलो. येथुन आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर असलेल भगवती देवीच मंदिर बघितलं आणि परतीच्या
वाटेस लागलो. आता ८.४५ वाजले होते. आम्ही पटापट रामाच्या मंदिरापाशी आलो. येथे साधारण
३० लोकांची राहायची सोय अगदी सहज होऊ शकते. येथे रामाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही
खालील बाजुस असलेल्या भुयारी टाक्याकडे वळलो. या टाक्यातील सुमधुर पाण्याचा आस्वाद
घेऊन आम्ही परतीच्या मार्गी लागलो. साधारण ९.३० वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.
१० पर्येंत सर्व सामान आवरून आम्ही परतीच्या (पुण्याच्या) मार्गी लागलो. मग मध्ये एका
ठिकाणी थांबुन बेचव मिसळ खाल्ली. खुप भूक लागल्याने ती सुद्धा पटापट संपली. दुपारी
२ वाजता पुरोहित हॉटेल पाशी थांबुन आम्ही आमचे जेवण करून घेतले आणि ३.३० वाजता घरी
परत पोहोचुन आम्ही आमच्या ट्रेकची सांगता केली.

- साकेत घाणेकर
संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)