रतनगड ते हरिश्चंद्रगड (बैलघाट मार्गे) - उत्तरार्ध





शनिवार दिनांक १७ नोव्हेंबर २०१८, आज आम्ही हरिशचंद्रगडाच्या दिशेने रवाना होणार होतो. या वेळेस हरिश्चंद्रगड थोड्या वेगळ्या वाटेने करूयात असे ठरले. नळीची वाट आणि पाचनई यांच्यामध्ये असलेल्या नाळेची वाट म्हणजे बैलघाट. पूर्वीच्या काळी येथुन मालाची वाहतूक, घोडेस्वार यांची ये जा असे. गडाची या बाजुस असणारी तटबंदी अजूनही टिकुन आहे. हि वाट मुळातच कमी वापरात आहे आणि या वाटेने खुप कमी जण जातात. आमच्या संपुर्ण ट्रेकचे वैशिट्य म्हणजे बैलघाट होते. काळ रात्री १० वाजता आडवे झालो तरी दिवसभरात केलेली पायपीट आणि बघितलेले विहंगमय दृश्य, जंगलात घालवलेला प्रत्येक क्षण, साम्रद ते कुमशेत दिवसभरात घडलेल्या घडामोडी, प्रत्येक क्षण डोळ्यासमोरून जात होता. हा प्रत्येक क्षण आठवताना कधी झोप लागली ते कळले सुद्धा नाही. प्रत्येक वेळेस सह्याद्री नवीन काहीतरी शिकवत असतो, गुरूसारखा सतत पाठीशी उभा असतो आणि मार्ग दाखवत असतो.

पहाटेचे ४ वाजले होते आणि घरातच असलेला कोंबडा आरवला, पहाटेचा गजर झाला. सगळेजण खाड्कन झोपेतून जागे झाले पण आम्ही तरीही तसाच परत झोपायचा प्रयत्न केला पण प्रत्येक ५ मिनिटागणिक तो कोंबडा आरवत होता. शेवटी आम्ही ५ वाजता उठलो आणि आवरायला सुरुवात केली. लवकर झोपलो असल्या कारणाने आमची पुरेशी विश्रांती झाली होती. घरातून बाहेर पडल्यावर वर मस्त चांदणं पसरलेलं होतं. आज नाश्ता वाटेतच करायचा असे ठरले. सर्वानी पहाटे ६ वाजेपर्येंत आवरले आणि घरातल्यांचा निरोप घेऊन आम्ही आमची पुढील वाटचाल सुरु केली. कुमशेत मधून एक डांबरी सडक पाचनई पर्येंत जाते. आम्ही या डांबरी सडकेने चालत पुढे निघालो. काळ संध्याकाळी निरोप घेऊन अस्ताला गेलेले रविराज आज समोर येऊन आमचे स्वागत करत होते. आम्ही सरळ सरळ चालत होतो आणि तो समोर लाल मग हळू हळू केशरी होऊ लागला होता. समोरच कलाडगड उंचावलेला दिसत होता. कुमशेतमध्ये आम्ही २ बाटल्या पाणी घेऊ निघालेलो कारण पुढे मुलं नदीला पाणी होते. या नदीच्या काठीच आम्ही नाश्ता करायचे ठरवले. डांबरी रस्ता उजवीकडे वळतो तर आपण उजवीकडे न वळता समोर दिसणाऱ्या कलाडगडाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवायची. बाजुस असलेल्या पठारावर थोडा वेळ आम्ही रविराजाचे दर्शन घेतले आणि सगळे आल्यावर दाट झाडीमधुन, दारी डाव्या हाताला ठेऊन घाट उतरायला सुरुवात केली.

घाट उतरून आम्ही नदीच्या किनारी पोहोचलो, नदीला फार पाणी नसल्याने आम्ही सहज नदी पार करून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचलो. जंगल एकदम शांत होते, सकाळच्या प्रसन्न वातावरणात पक्ष्यांचे मधुर आवाज कानावर पडत होते. नदीच्या थंड पाण्यातुन वाफ बाहेर पडत होत्या. सुर्याची सोनेरी किरणे पाण्यावर पसरली होती. मध्येच एखादा पक्षी येऊन पाण्यात सूर मारायचा. सर्व मंडळी येथे पोहोचेपर्येंत मी आणि yms नदीच्या किनाऱ्यावर साकाचे कोवळे ऊन अंगावर घेत आणि या क्षणांचा आनंद लुटत शांतपणे बसलो होतो. सर्वजण आवरून आले आणि मग आम्ही चूल पेटवली. सकाळचा नाश्ता आणि चहा करण्यासाठी याहुन उत्तम जागा असुच शकत नाही. नदीचे पाणी एवढे स्वच्छ होते की सुर्याची किरणे तळापर्येंत अगदी सहज पोहचत होती. आजचा नाश्त्याचा मेनू म्हणजे मॅगी, थोड्याच वेळात मॅगी तयार झाली. चुलीवर केलेली मॅगी, नदीचे गोड पाणी, गोड गुलाबी थंडी, आजुबाजूला असलेले जंगल आणि वन्यजीवन याने मन हरपून जात होते. असे वाट होते हा इथेच थांबावा, मॅगीच्या प्रत्येक घासाला आम्ही जंगलाचा आनंद लुटत होतो. येथील हालचाली, मधुर आवाज, नदीचा किनारा, उगवत्या सुर्याची किरणे सर्व काही मन मंत्रमुग्ध करणारे होते.

सकाळचे ९ वाजले होते, हळू हळू रविराज डोके वर काढु लागले आणि हलकीशी ऊब निर्माण होऊ लागली होती. आमचा नाश्ता उरकला होता, सर्व भांडी धुवून आणि पाण्याचा बाटल्या भरून आम्ही पुढे निघालो. नदीकिनाऱ्यावरून कलाडगडाच्या दिशेने आम्ही निघालो, नदीचे पात्र दुसरीवर पसरलेले होते. समोरच एक टेकाड लागले. हे एकदा चालून गेल्यावर वरच्या बाजूस ठाकूरवाडी नावाचे गाव लागते. जंगलातील वाट तुडवत आम्ही पुढच्या २० मिनिटात ठाकूरवाडी गावात दाखल झालो. येथे एका घरात किराणा सामान विकत मिळते. येथे आम्ही आवश्यक असलेल्या किरणाच्या गोष्टी आणि बिस्किटे घेतली आणि पुढे निघालो. १५ मिनिटात आम्ही कलाडगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. आत्तापार्येंत १० वाजले होते, ऊन बऱ्यापैकी तापले होते. आम्ही नियोजनानुसार आम्हाला आजच रात्री हरिश्चंद्रगडावरून खाली उतरायचे होते म्हणून आम्ही कलाडगड आमच्या नियोजनामधून वगळला होता. कलाडगड करायचा असल्यास सकाळी उन्हाच्या आत करावा म्हणजे कातळ तापलेले नसते अन्यथा सकाळी ९ वाजल्यानंतर रखरखीत उन्हात खडा चढ चढावा लागतो. येथे जवळ एक पाण्याचे कुंड आहे, कलाडगाच्या डोंगरांमधून पाणी झिरपून या कुंडामध्ये साचते. येथे आम्ही जरा वेळ अराम केला आणि पुढे निघालो.

वाटेत जाताना आपल्याला समोर २-३ घाली दिसतात, यातील मध्ये डोळ्यासमोर दिसणारी घळ म्हणजे बैलघाट. या वाटेने आपल्याला गडावर पोहोचण्यासाठी साधारण २ तास लागतात. आम्ही कलाडगडाला वळसा मारून पुढे निघालो. डांबरी वाटेने वळसा ना मारता समोर असलेल्या दरीत एक टेकाड खाली उतरावे आणि पलीकडे परत चढावे. या वाटेवरून जाताना सर्वात उजवीकडे आपल्याला सादडे घाटाची वाट दिसते, तसेच विख्यात नळीचा वाटेची मागील बाजू आपणास दिसते. पाचनई गाव आपल्या डाव्या बाजूस राहते. डांबरी रस्त्याने सरळ न जात एक टेकाड मी सरळ खाली उतरलो (येथे मळलेली वाट नाही... तर बैलघाट समोर ठेऊन अंदाज घेत जावे). परत वरती एक टेकाड चढल्यावर आपण पाचनईच्या डांबरी सडकेला येऊन मिळतो. येथून सरळ एक टेकाड अजून चढले की आपण बैल घाटाच्या पदरात असलेल्या पठारावर येऊन पोहोचतो. या वाटेने आम्ही बैलघाटाच्या पदरात येऊन पोहोचलो. आत्तापार्येंत ११ वाजले होते. बैलघाटाची वाट जास्त वापरात नसल्याने मळलेली नाही, अंदाज घेत आपण नाळेच्या दिशेने चालत रहावे. थोडासा पुढे गेल्यावर आम्ही बैलघाटाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. हरिश्चंद्रगड विस्तीर्ण पसरलेला आपल्याला दिसतो. या घळीच्या मार्गे खडी चढण आम्ही सुरु केली. मोठमोठाले दगड धोंडे पार करत आम्ही सरळ चढू लागलो. डोक्यावर ऊन होते पण या घाटात प्रचंड झाडी आहे त्यामुळे ते जाणवत नव्हते. साधारण ४५ मिनिटात आम्ही ७५% घाल चढून वरती आलो आणि येथे एक मोठा दगड आहे जिथे आम्ही विश्रांती घेतली. बाकीची मंडळी अजून बरीच खाली होती. येथे आम्ही जरा वेळ घालवला, आमच्या जवळ असलेले खजुराचे लाडू आणि चिक्क्या खाल्ल्या. एकदम थंड अशी ही नाळ, मस्त मंद वर सुटलेला आमच्या दोन्ही बाजूस नैसर्गिक रित्या बनलेल्या गुहा होत्या.

थोड्याच वेळात सर्वजण येथे पोहोचले, आम्ही पुढे निघालो. यापुढे सावली नव्हती आणि आमच्या जवळील पाणी सुद्धा संपत आले होते. थोडासा वर गेल्यावर आम्ही गडाच्या पडक्या दरवाज्यापाशी पोहोचलो, येथे गडाची सुव्यवस्थित स्थितीत असलेली तटबंदी आहे. इथून थोडासा वरच्या बाजूस गेल्यावर डाव्या हाताला आडवाटेवर असलेल्या नैसर्गिक गुहेमध्ये पाण्याचे छोटे कुंड आहे, त्यात असलेले पाणी आम्ही भरून घेतले आणि परत घालीत उतरून पुढची चढाई सुरु केली. ५ मिनिटात आम्ही गडाचा माथा गाठला आणि थोड्याश्या झुडुपांच्या सावलीत विश्रांती घेत पहुडलो. शेजारी असलेल्या पाचनई मार्गे बरीच माकडं चित्र विचित्र आवाज करत गडावर येत होती. थोड्याच वेळात सर्व जण गडावर पोहोचले आणि आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो, येथे शेजारी असलेल्या छोट्या धबधब्यात लोक अंघोळ करत होते. आम्ही पटापट चालून ७० पायऱ्यामार्गे मंदिरापाशी पोहोचलो. मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेतले आणि पाणी भरून घेतले. वरती असलेल्या आमच्या मित्राचा हॉटेल मध्ये विश्रांती घेत पडलो. आत्तापार्येंत दुपारचे २ वाजले होते. आमच्या जवळ असलेले तांदूळ काढले आणि भट बनवायला आम्ही सुरुवात केली. भात शिजत होता तोपर्येंत आम्ही भेळ बनवून खाल्ली, भात शिजला आणि त्यावर सर्वांनी ताव मारला. ३ वाजता सर्वांची जेवण उरकली आणि परत एकदा वामकुक्षीची वेळ झाली :) . ३-४ सर्वांनी विश्रांती घेतली आणि चहा बनवायला सुरुवात केली. मस्त पैकी ब्लॅक टी प्यायला आणि ४.३० वाजता आम्ही निसर्गाची अद्भुत किमया असलेल्या कोकणकड्याच्या दिशेने निघालो.



साधारण ४.४५ वाजता आम्ही कोकणकड्यावर पोहोचलो, येथे लोकांनी कॅम्पिंग ची पूर्ण तयारी केलेली होती. काही जणांचा make up चालु होता तर काही जण चरत होते. आम्ही कोकणकड्यापाशी एका जागेवर जाऊन बसलो आणि सूर्यास्त होईपर्येंत पाळायचे नाही असे ठरवले. उतरते ऊन डोक्यावर होते भासकराज दिवसभर तापुन आता थंड होत होते. आम्ही निसर्गाचा आनंद लुटत होतो रविराज हळू हळू अस्ताला जाऊ लागले आणि कोकणकड्यावर गर्दी वाढू लागली. आजकाल इथे सुद्धा सूर्यास्त बघताना जागा पकडून ठेवावी लागते. अगदी हाजीर तो वजीर असे फीलिंग येत होते. कोकणकड्यावरून सुर्यास्त बघणे म्हणजे आपला ट्रेक सफल संपन्न झाला असे वाटत होते. लांबवर शिवनेरी, ढाकोबा दिसत होते. आज वातावरण पूर्णपणे स्वच्छ होते. रविराज पूर्णपणे दिसेनासे होईपर्येंत आम्ही तिथेच बसुन होतो. सुर्यास्त पुर्ण होताच खणखणीत आवाजात जयघोष झाला आणि आमची पाऊले पटापट मंदिराच्या दिशेने पडु लागली. मंदिरात ठेवलेले आमचे सामान आम्ही घेतले आणि पाणी भरून घेतले. पटापट आवरून आम्ही खिरेश्वरच्या मार्गाने चालु लागलो. कधी चंद्रप्रकाशात तर कधी टॉर्चच्या प्रकाशात आम्ही एक एक टेकडी पालथी घालू लागलो साधारण ८.३० वाजता आम्ही खिरेश्वरच्या बाजुस असलेल्या एका टपरीपाशी चहा प्यायलो आणि बिस्किटे घेतली. पुढे कातळकडा उतरून आम्ही खिंडीत दाखल झालो. येथे अजूनही गडावर चढणाऱ्यांची गर्दी थांबत नव्हती. पटापट उतरून आम्ही साधारण १० वाजता खिरेश्वर गावात दाखल झालो. येथे एका हॉटेलात डाळ भातावर ताव मारला आणि झोपी गेलो. पहाटे ६ ची मुक्कामी ST दारात उभी होती. या ST ने आम्ही परतीचा प्रवास सुरु केला आणि ११ वाजता पुण्यात पोहोचून आमच्या ट्रेकची सांगता केली. 






- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)