सातमाळ सफर आणि प्रेमगिरी.... दिवस पहिला (२३ डिसेंबर २०१५)



सातमाळ!!! सुरगाणा तालुक्याच्या एका डोंगररांगेची सुरुवात जेथून होते ती म्हणजे सातमाळ रांग. ही डोगररांग गोदावरी व तापी नदिच्या खोऱ्यांना वेगळी करते. सह्याद्रीच्या पुर्व रांगेतील किल्ले आणि त्यात नाशिक म्हणजे "सोने पे सुहागा", महाराष्ट्राचे हिरेच आहेत जणु. सातमाळ रांगेचे नुसते नाव काढले तरी हुरूप येतो, डोळ्यांसमोर नाशिकचे किल्ले थैमान घालायला लागतात. नुकत्याच केलेल्या भिलाई, चौल्हेर, प्रेमगिरी, पिंपळा आणि मोहनदरी range-trek नंतर मनात पक्के बसलेले, मार्गशीर्ष महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत नाशिकच्या सातमाळ रांगेची वारी करायची. सातमाळ रांगेत एकूण १८ किल्ले आहेत पण चारच दिवस सुट्टी मिळाली असल्याने आम्ही यातील मोठे आणि प्रसिद्ध किल्ले करणार होतो. हातभर पसरलेला "हातगड", द्राक्ष्यांच्या बागांचा पायथा लाभलेला "अचला", भला मोठा विस्तार आणि पसारा असलेला "अहिवंतगड", वणीची देवी "सप्तशृंगी", मार्कंडेय ऋषीमुनींचा "मार्कंड्या", छोटेसे नेढं कुशीत घेऊन असलेला "कण्हेरा", जुळ्या भावांसारखे उभे "रवळ्या आणि जवळ्या" आणि सातमाळचा राजा, धोंडपाय नमः "धोडप".



नाताळच्या सुट्टीला जोडुन तीन दिवस ऑफिसला दांडी मारली आणि २२ डिसेंबर २०१५ च्या रात्री ट्रेकसफर सुरु करायचे ठरले. एवढा मोठा ट्रेक असल्याने व्यवस्थित planning करणे गरजेचे होते. ठिकठिकाणी पुस्तके वाचुन, ब्लॉग वाचुन माहिती गोळा करणे सुरु झाले कारण नाशिकचे किल्ले कितीही परिचित असले तरीही रस्ताभूल करतातच. गुगल बाबाच्या साहाय्याने रस्त्याची मांडणी केली, प्रत्येक गडाच्या पायथ्याचे गाव शोधले. सर्वात लांबचा किल्ला पहिले करायचा हा आमचा प्रत्येक ट्रेकचा नियम. बरोबर न्यावे लागणारे ४ दिवसांचे शिधा साहित्य, स्टोव्ह-रॉकेल, झोपायची सोय, टॉर्च वगैरे सर्व साहित्य गोळा केले अँड सर्व तयारी झाली. २२ डिसेंबरची संध्याकाळ उजाडली, बाईकवर एका बाजुला तंबू सुतळीने बांधला. दोघांच्या पाठीवर मोठी बॅग आणि छातीवर एक छोटी बॅग, डोक्यावर हेल्मेट अशी कसरत करत हर्षलच्या घरापासून बरोब्बर ६ वाजता आम्ही निघालो. एवढ्या मोठ्या बॅग कशासाठी? अहो ४ दिवसांचा संसार सोबत घेऊन चाललो होतो. शनिवारवाडा पार करून पुढे जाताच थंडी अंगात शिरली आणि आमच्या लक्षात आले इथेच हि परिस्थिती तर पुढे आपले काय होणार आहे. मोठे धाडस करून आम्ही निघालो होतो सातमाळ वारीवर तेही बाईकवर.


मजल-दरमजल करत आम्ही पुणे सोडले, नाशिक फाटा सोडला सगळं ट्रॅफिक पार करत पुढे जात होतो आणि बरोब्बर ८ वाजता मंचरला पोहोचलो. येव्हाना थंडी पार अंगात शिरलेली, थंडीने कडकडुन भुक लागलेली. मंचर मधेच आम्ही छोटाश्या हॉटेल मध्ये उच्च दर्जाचे chinese food खाल्ले आणि पुढच्या सफरला सुरुवात केली. नारायणगाव, आळेफाटा, बोटा, नगर बायपास पालथं घालत १०.३० वाजता संगमनेर बायपास फाट्याला पोहोचलो. येथे जरावेळ अराम करून आम्ही सिन्नरच्या दिशेने निघालो. सिन्नर मध्ये जेवण केले आणि १ वाजता नाशिक मध्ये पोहोचलो. कडाक्याच्या थंडीमुळे आमच्या वेळेपेक्षा १ तास उशीर झाला होता. पुढे आम्ही वाणी मार्गे निघालो. वणी, घागबारी, हिरडीपाडा पार करत आम्ही पहाटे २ वाजता बोरगाव मध्ये पोहोचलो. दळवट लिंक रोडमार्गे हातगडवाडी मध्ये पहाटे २.३० वाजता पोहोचते झालो. येथे गावालगत एक गणेशाचे सुंदर मंदिर आहे, या मंदिरात आम्ही आमचा तंबू ठोकला आणि झोपी गेलो.





हातगड



हातगडवाडी हे हातगडाच्या पायथ्याचे गाव आहे, हातगडावर जायला गाडीमार्ग आहे. घाट संपताच पुढे पायऱ्या चालु होतात. पहाटेच्या वेळी, ६ वाजता सुर्यकिरण तंबूच्या खिडकीतून आत शिरू लागले आणि आमची झोप उघडली. आम्ही पटापट सर्व सामान आवरून गावातील एका घरात सगळे सामान ठेवले. छोटीशी एक पिट्टु/बॅग सोबत घेतली आणि गाडीमार्गे पायऱ्यांपर्येंत पोहोचलो. येथे उजव्या हाताला कातळात कोरलेले एक टाके आहे. या गडाला एकात एक असे ४ दरवाजे आहेत. पन्नास एक पायऱ्या चढुन गेल्यावर आपण गडाच्या पहिल्या दरवाज्यातून आत शिरतो. येथे दरवाज्याच्या सुरुवातीलाच खांबावर सिंह कोरला आहे. या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहे. हे बघुन आम्ही पुढे निघालो आणि गडाच्या दुसऱ्या दरवाज्यात प्रवेश केला. हा दरवाजा पुर्णपणे कातळात कोरलेला आहे. आत प्रवेश केल्यावर उजव्या हाताला एक गुहा आहे, या गुहेत पाण्याची २-३ टाकी आहेत. थोडं पुढे गेल्यावर डाव्या हाताला हनुमानाची मुर्ती कोरली आहे. हे बघुन आम्ही पुढच्या दरवाज्यापाशी निघालो, या दरवाज्याला ग्रीलचे दार बसवले आहे. हा दरवाजा पार करून पुढे गेल्यावर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो.





हा किल्ला व्यवस्थितरित्या जोपासला आहे. गडावरून सर्पगंगा नदीचे उत्तम दर्शन होत होते. गडावर भरपूर अवशेष आजही बघायला शिल्लक आहेत. गडाच्या शेवटच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो, सुर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरली होती. समोरच सापुतारा (गुजराथचे थंड हवेचे ठिकाण) धुक्यामध्ये दडून बसलेले होते. माथ्यावर प्रवेश करताच एक वाट डाव्या हाताला घेऊन जाते. येथे अप्रतिम तटबंदी आणि एक पीर आहे. हे बघुन आम्ही परत मागे फिरलो आणि उजव्या हाताच्या वाटेने सरळ निघालो. येथे बाजुलाच एक पाण्याचे टाके आहे आणि पडका बुरुज आहे. हा बुरुज पाहता रतनगडावरील बुरुजाची आठवण होते. थोडासा पुढे गेल्यावर एक मोठे पाण्याचे टाके आहे, यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाकायच्या थोडं पुढे गेल्यावर एक बुजलेला दरवाजा दिसतो., तटबंदी वरून वाकुन बघितले असता हा कदाचित चोर दरवाजा असावा असा अंदाज दर्शवता येतो. येथून वाट वरच्या बाजुस जाते, येथे एक इमारत आहे आणि बाजूलाच एक पाण्याचे तलाव आहे. इमारतीचे अवशेष अजूनही शाबुत आहेत, इमारत म्हणजे बहुधा गोडाऊनच असावं. या इमारतीपासुन थोडं वरच्या बाजुस गेल्यावर एक ध्वजस्तंभ आहे. येथून गडाचा पूर्ण पसारा दिसतो. पडक्या बुरुजाच्या बाजूस अजून एक इमारत आहे. हि मारत बघितली की आपली गडफेरी पूर्ण होते. आम्हाला गडफेरी पूर्ण करण्यास १.३० तास लागला. आत्तापार्येंत ८.३० वाजले होते. आम्ही पटापट गड उतरायला लागलो आणि गाडीवरून गावात पोहोचलो. श्रीपाद गवंडे काकांकडे आम्ही आमचा ठेवलेला संसार घेतला आणि पुढे निघालो.






अचला


आत्तापर्यंत ९.३० झाले होते. आमचे पुढचे लक्ष्य होते अचला किल्ला. दगड पिंपरी हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. आम्ही दळवट लिंक रोड मार्गे बोरगावला आलो, कडकडून भुक लागल्याने यथे वाटेतच एका हॉटेल मध्ये मिसळपावावरती ताव मारला, मस्त गरमागरम चहा प्यायलो आणि पुढे दगड पिंपरी गावाच्या दिशेने निघालो. हातगाडवाडी ते दगड पिंपरी हे अंतर साधारण २४ किमी आहे. साधारण १०.३० वाजता आम्ही दगड पिंपरी गावात पोहोचलो. येथे गावातच ५-६ वीरगळी आपल्या नजरेस पडतात. हे पाहून आम्ही पुढे निघालो, या गावाच्या थोडं पुढे शेतातून चालत गेल्यावर द्राक्षांच्या बाग लागतात. या बागांमधुनच वाट पुढे जाते. अचलाची एक सोंड थेट खालपर्येंत उतरलेली आहे, या सोंडेवरून सरळ चढाई चालु करायची. द्राक्षांच्या बागेतुन एक पत्र्याची शेड आपल्या नजरेस पडते, या शेड च्या दिशेने वाटचाल करायची. ही शेड म्हणजेच एक छोटेसे मंदिर आहे, गावातल्या लोकांना विचारता त्यांनी सांगितले त्याला सतीचे मंदिर म्हणतात. संपुर्ण वाटेत कुठेही सावली किंवा झाडही नाहीये. इथे पोहोचल्यावर आपण गडाचा पहिला टप्पा पार करतो. येथुन थोडंस पुढे गेल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या टप्प्यात येतो. येथे एक हनुमंताचे सुंदर छोटंस मंदिर केले आहे. या मंदिराला शेड नाही. हनुमंताची मुर्ती शेंदुराने फासली आहे. या मंदिराच्या जवळ एक छोटे झाड होते, हा सावली असलेला शेवटचा टप्पा. आत्तापार्येंत १२ वाजले होते. अजुन बरेच जायचे होते, डोळ्यांना दिसणारी सरळ चढाई नकोशी वाटत होती. रविराज डोक्यावर थैमान घालायला लागले होते. सकाळी असणारी कडाक्याची थंडी आणि आता रणरणते ऊन पण तरीही उन्हाचा चटका लागत नव्ह्ता. जरावेळ विश्रांती घेतली, थोडे आणि प्यायलो आणि पुढे कूच केली.





गडाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्यावर आपण गडाच्या कातळाच्या खालील बाजूस पोहोचतो. येथे कातळात कोरलेल्या पायऱ्या चालु होतात. येथुन थोडं वरती पायऱ्या सोडून गेल्यावर एक मोठी गुहा आहे. हे पाहुन आम्ही खाली आलो आणि पायऱ्यांच्या मार्गे पुढे निघालो. डाव्या बाजूस बुजलेले एक पाण्याचे टाके आहे, ते बघुन आम्ही १० मिनिटात गड माथ्यावर प्रवेश केला. साधारण १२.३० वाजले होते. येथुन मागे नजर टाकल्यास अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप ही डोंगररांग दिसते. थोडं पुढे गेल्यावर पाण्याची दोन वाळलेली टाके आहेत. या टाक्यांच्या बाजुलाच कपडे टाकलेले दिसतात. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यावर या ठिकाणी येऊन स्नान करतात. त्यावेळी ते गावातून घालून आलेले कपडे या ठिकाणी सोडून, नवीन कपडे घालुन जातात." आम्ही येथून थोडे पुढे गेलो, थोडासा खाली उतरून गेले की ५, २ आणि १ अशी पाण्याची टाकी आहेत. येथेही असेच कपडे फेकलेले आपल्याला दिसतात. या टाक्यात गावातील लोक स्नान करत असल्याने यातील पाणी पिण्यालायक नाही. थोडासा वळसा मारून पुढे आल्यावर इमारतींच्या ज्योती आपणास दिसतात. आता पर्येंत १ वाजला होता, एका झाडाखाली बसुन आम्ही सोबत आणलेले खजुर, पराठे वगैरे खाल्ले आणि परतीच्या वाटेल लागलो. परत येताना द्राक्षांच्या बागांमध्ये द्राक्षांचा आस्वाद घेतला. साधारण ३ वाजता आम्ही दगड पिंपरी गावात परतलो. हा संपुर्ण किल्लाभर रवी डांबळे आणि सुनील भुसार आमच्या सोबत होते. त्यांनी आम्हाला थंडगार लिंबुपाणी पाजले आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला.





सप्तशृंगी

आता आजच्या दिवसातला आमचा तिसरा टप्पा बाकी होता. दुपारचे ३.३० झाले होते, वणीची देवी  "सप्तशृंगी" च्या दिशेने निघालो. कोल्हेर, अहिवंतवाडी, दरेगाव, नांदुरी पेठे घालत आम्ही वाणीच्या मार्गे लागलो. दगड पिंपरी ते वाणी हे साधारण २४ किमीचे अंतर आहे. ४.३० वाजता आम्ही वाणीच्या मंदिरापाशी पोहोचलो. येथे येताना एक सुंदर घाट लागतो, रास्ता एकदम हायवे सारखा चकाचक आणि मोठा. घाट चढुन वरती आल्यावर एक मोठे पठार लागते. येथून समोरच मार्कंड्या, रवळ्या आणि जवळ्याचे उत्तम दर्शन होते. आम्ही आलो तेंव्हा मंदिराचे काम चालू होते. भले मोठे रेलट्रॅक उभे करून सामानाची वाहतुक सुरु होती. आम्ही पायथ्यापासुनच देवीचे दर्शन घेतले आणि परत निघालो.






आत्तापार्येंत ६ वाजले होते, आम्ही दरेगावात पोहोचलो. इथे आम्हाला वेगळाच नजारा दिसला. आत्तापार्येंत ६ वाजले होते, आम्ही दरेगावात पोहोचलो. इथे आम्हाला वेगळाच नजारा दिसला. कुठलातरी सण सोहळा होता, उत्सुकता वाढलेली आणि गावातील लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं ह्याला डोंगरीदेव किंवा डोंगरसण म्हणतात. मोठ्या जल्लोषात तयारी चालु होती. डोंगरीदेव सणाबद्दल खालील ब्लॉगवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.






बाहेर येव्हाना ३-४ अंश थंडी होती. आम्हाला थंडीचे कुडकुडत बघुन काशिनाथ गायकवाड यांनी आम्हाला त्यांच्या घरात रहायला जागा दिली. डोंगरीदेवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आम्ही आनंदी होतो कारण या सणाचे आम्ही साक्षीदार होतो. काशिनाथ गायकवाडांनी आम्हाला ब्लॅंकेट आणून दिले, घरी पांघरुणात आम्ही अगदी मस्तपैकी झोपी गेलो…




- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)