डोंगरीदेव....... एक आदिवासी (कोकणी) सण/सोहळा

नुकतेच आम्ही नाशिकमध्ये सातमाळ रांगेतले किल्ले बघायला गेलो होतो (२२ डिसेंबर २०१५). तेंव्हा दरेगावात (अहिवंतगडाच्या पायथ्याचे गाव) आम्हाला वेगळेच चित्र दिसले. सर्व गाव दिव्यांच्या प्रकाशाने सजलेले होते. मध्ये मैदानात देवाला सजवलेलं होत. आपल्याकडे होळी असते त्याप्रमाणे मांडणी केली होती. सगळीकडे झिरमिळ्या, पताके आणि दिव्यांनी सजवत केलेली. प्रथमक्षणी बघता मी आणि हर्शल आश्चर्यचकित झालो. गावात काशिनाथ गायकवाड यांच्याकडे आम्ही उतरलो. इथे दुसरा प्रकार आमच्या लक्षात आला प्रत्येक घरासमोर पेटारे ठेवले होते आणि ते blanket ने झाकलेले होते. त्यावर फुलांची माळ होती, पुजा केलेली होती जशी दसऱ्याला आपण सरस्वतीची पुजा करतो अगदी तशीच. त्या पेटारयांमध्ये काय असेल अशी ओढ आम्हाला लागली होती. तर त्या पेटारयांमध्ये देवासाठी प्रसाद होता. हा सगळा प्रकार बघुन आम्ही न राहवुन काकांना विचारलं हा सगळा काय प्रकार आहे. तेंव्हा काका म्हणाले बर झाल तुम्ही आलात. डोंगरीदेवाच्या सोहळ्यात तुमचे स्वागत आहे. तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुम्हाला डोंगरीदेव नक्की पावणार. तेंव्हा आमच्या लक्षात आलं ह्या सर्व सोहळ्याला डोंगरीदेव असे म्हणतात. आम्ही खुपच भाग्यवान आहोत. एका दुर्गप्रेमिला अश्या सोहळ्यात पाहुणा म्हणुन सहभागी होता येण किती भाग्याची गोष्ट आहे.
पण अजुनही मनात शंका होतीच डोंगरीदेव म्हणजे नक्की काय. आम्ही पुढे काकांना विचारलं. काकांनी सांगायला सुरुवात केली. तर डोंगरीदेव म्हणजे या सर्व प्रदेशातील आदिवासी लोकांचा एक कार्यक्रम/उत्सव/सोहळा/सण. हा कार्यक्रम काही गावात दर वर्षी असतो, तर काही गावात तीन वर्षांनी असतो. गावातील लोकं मिळुन जसे नवस बोलतील त्याप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो. नावावरूनच लक्षात येतं डोंगरीदेव म्हणजे डोंगरातील देव किंवा डोंगर हाच देव. हा सोहळा दर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या अलीकडे ८ दिवस असतो. प्रत्येक गावातील एका डोंगरात हा देव वसलेला. प्रत्येक दिवशी या डोंगरीदेवाची कडक पुजा करायची म्हणजेच डोंगराची पूजा करायची. आठही दिवस पायात जोड घालायचे नाही. ८ दिवस कडक शिस्तीचा उपवास. दिवसभरात काहीही न खाता फक्त रात्री जेवण करायचे, जेवणात फक्त वरई, बाजरीची भाकरी आणि उडीदाच्या डाळीचे तिखट मिठाचे वरण, जेवणात तेलाचा वापर अजिबात करायचा नाही. देवाची पुजा झाली, नाचगाण्याचा कार्यक्रम झाला की मगच जेवण मिळणार. नेहमीप्रमाणे रात्रभर हा कार्यक्रम चालणार. आठही दिवस पुरुष मंडळीनी बाहेर देवापाशी झोपायचे आणि स्त्रियांनी घरात झोपायचे कितीही कडाक्याची थंडी असली तरी (यावेळी तापमान ३ अंश होते, विचारही करू शकत नाही आपण). आठव्या दिवशी गावातील सगळ्या मंडळीनी डोंगरात देवापाशी जायचे पुजा करायची आणि त्या दिवशी रात्री बोकडाचा बळी देवाला चढवुन त्या प्रसादाची रात्री जेवणात वाटप..... हा सोहळा आम्हाला खुप लाभला, निरनिराळे अनुभव आले आणि डोंगरदेव पुर्ण यात्रेभर सतत आमच्या पाठीशी उभा राहिला.
महाराष्ट्रातील एक मोठी आदिवासी जमात म्हणजे कोकणा किंवा कोकणी. 'कोकणा-कोकणी' ही संद्न्या व्यवहारात आपण इतक्या सहजपणे वापरतो, की कोकणी माणूस म्हणजे कोकणात वास्तव्य असलेला गृहस्थ, असा सर्वसाधारण समज असतो, आणि ते बरोबरही आहे. परंतु या नावानेच एखादी आदिवासी जमात असेल यावर फारसा कोणाचा विश्वास बसत नाही. महाराष्ट्रात या जमातीचे वास्तव्य नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आहे, तर गुजरातेत डांग, नवसारी, धरमपूर, सुरत या जिल्ह्यांमधून आहे. या जमातीची काही अंशी 'कोकणा- कोकणी आदिवासी इतिहास आणि जीवन' या पुस्तकात ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.



- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)