जवळपास वर्ष होत आलेल पायाच्या दुखापतीमुळे कुठे ट्रेकला जाता येत नव्हते, पण आज १९ ऑक्टोबर २०१४ रोजी ट्रेकचा योग आला होता. पायाची टेस्ट करायची होती म्हणुन छोटाच किल्ला निवडला होता. सासवडच्या जवळ असलेला मल्हारगड. हा किल्ला पुण्यापासून ४० - ५० किमी लांब आहे.
रविवार असल्याने बरेच लोकं होते. सुबोध दादाने सगळ ठरवलं. सकाळी ६ वाजता निघायचं ठरलं. या वेळेस वैभव दादा पण ठाण्याहून आला होता. मग काय मी, वैभव दादा, अक्षय दादा, अमोल दादा, राहुल, प्रशांत, प्रणव, सुबोध दादा, ऋग्वेद, सौरभ आणि रोहन. एवढी टाळकी एकत्र खूप दिवसांनी आली असतील. मग काय माझी कार आणि तीन बाईक घेऊन निघायचं ठरलं. आज मुख्य दिवस होता कारण आज निवडणुका होत्या.
मल्हारगडालाच सोनोरीचा किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला सासवड आणि पुण्याच्या मध्ये असलेल्या दिवे घाटावर लक्ष ठेवायला बांधला गेला होता. या किल्ल्याचे बांधकाम १७६३ ते १७६५ च्या दरम्यान झाले असावे. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे आणि कृष्णराव पानसे यांनी या किल्ल्याची बांधणी केली. या गडाच्या पायथ्याचे गाव सोनोरी असुन हा गड गावाच्या उत्तरेकडील डोंगरावर बांधला आहे. हा किल्ला मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात शेवटचा किल्ला असल्याने याला वेगळाच मान आहे.
म्हणूनच या किल्ल्याला तरुण किल्ला (young फोर्ट) असेही म्हणतात. किल्ला बांधत असताना एके ठिकाणी कुऱ्हाडीचा घाव घातल्यावर रक्त वाहू लागले. भीमराव पानसेंनी मल्हार देवाला साकडे घातले आणि येथे मंदिर बांधण्याचा संकल्प केला. म्हणून या किल्ल्याला मल्हारगड नाव दिल्याची आख्यायिका आहे. इंग्रजांच्या विरुद्ध बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या गडाचा आश्रय घेतला होता.
मल्हारगड तब्बल ११०० मीटर उंचीचा आहे. सोनोरी गावातुन या किल्ल्यावर तब्बल अर्ध्या तासात वर पोहोचता येते. महादरवाज्याची पडझड झाली आहे. आम्ही गडाच्या मागील बाजुस असलेल्या दरवाज्याने वर चढत गेलो. येथुन अर्धा तास लागतो. आपण गडाच्या दरवाज्यात पोहोचताच लक्षात येते की गडाचा आकार त्रिकोणी आहे. गडावर पाण्याचे मोठे टाके आहे. या टाक्यात उतरायला पायऱ्या देखील आहेत. येथे थोडेफार फोटो काढून आम्ह पुढे निघालो. पुढे गडावर दोन विहिरी आहेत पण दोन्ही विहिरीत पाणी उपलब्ध नाही. तटबंदीचे अवशेष बघण्यासारखे आहेत. अजूनही ते सुस्थितीत आहेत.
इंग्रंजी केलेल्या हल्ल्यात गडाच्या पुढील बाजूस असलेल्या बांधकामाची पडझड झाली आहे. पुढे गेल्यावर दोन मंदिरे आहेत. एक महादेवाचे आणि दुसरे मल्हारदेवाचे. या मंदिरांची शिखरे आपले लक्ष वेधुन घेतात. महादेवाच्या मंदिरासमोर असलेला नंदी अतिशय सुरेख आहे. या मंदिराच्या आजू बाजुस खंडोबाच्या तसेच अनेक मुर्त्या आहेत. किल्ल्याचा सर्वात प्रेक्षणीय भाग म्हणजे गडाचा बालेकिल्ला. या भागात पाऊस कमी असला तरी येथील हवा खुप थंड आहे.
आता आम्ही गडाच्या पूर्व दिशेस असलेल्या दरवाजाच्या बाजूस निघालो. या दरवाज्याचे बांधकाम अजुनही उत्तम टिकुन आहे. येथील बुरुज आणि तटबंदी अजूनही सुस्थितीत आहेत. हा किल्ला बघायला साधारण १ तास लागतो. हा किल्ला अतिशय छोटा जरी असला तरी अवश्य बघावा.
हे सगळ बघत असताना आनंददायी वार्ता कानावर आली. निवडणुकीचे निकाल लागले. मग काय जयघोष सुरु झाला. खणखणीत आवाजात घोषणा दिली गेली. आह! त्या घोषणेचा आवाज आजही कानात घुमत आहे. आता सगळा किल्ला फिरून झाला होता. आम्ही परतेच्या वाटेस निघालो. १५ - २० मिनिटात खाली पोहोचून आम्ही आमच्या ट्रेकची सांगता केली.
- साकेत घाणेकर
संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)







