कोकणदिवा आणि घोळ



रणरणत्या उन्हाळ्यानंतर शरीराला थंडाव्याची गरज होती. पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आणि बरेच दिवस ट्रेकला पण सुट्टी होती. २ जुलै २०१७, रविवार सुट्टीचा दिवस आणि त्यात पावसाळा असल्याने शहरापासुन लांब, नेहमीच्या किल्ल्यांपासुन दूर जायचं होत. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी "कोकणदिवा" किल्ला पाहुयात असे ठरले. मंगळवार पासुन ठरवायला सुरुवात झाली, पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पुण्यातच एवढा पाऊस तर तिकडे काय परिस्थिती असेल असा विचार सगळ्यांच्या मनात येऊ लागला. मंगळवार गेला, बुधवार गेला, गुरुवार गेला पण पाऊस कमी होत नव्हता. पण एकदा ठरवल कोकणदिवा कायचा कि त्यात माघार नाही. शुक्रवार पासून पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झाला होता. आता तर नक्की झालं, गाडी सांगितली आणि दोनाचे तीन झाले तीनचे पाच झाले असं करत आम्ही ८ जण तयार झालो.


घोळ गावं पुण्यापासुन साधारण १०० किमी लांब आहे. कोकणदिव्याला पोहोचायला २ वाटा आहेत. एक वाट गरजाईवाडी मधुन आहे आणि दुसरी वाट सांदोशी मधुन आहे. सांदोशी गावामधुन कावळ्या घाटमार्गे किल्ल्यावर पोहोचायला साधारण ३ तास लागतात तर गरजाईवाडी मधुन किल्ल्यावर पोहोचायला २ तास लागतात. गरजाईवाडी मध्ये पोहोचण्यासाठी प्रथम गाडीमार्गाने घोळ या गावी यावे लागते आणि येथुन अर्ध्या तासाची पायपीट करत गरजाईवाडी मध्ये पोहचता येते. रायगडाच्या आजुबाजूस असलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे कोकणदिवा. कोकणदिवा हा मुळतः रायगड किल्यावर तसेच कावळ्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता. कावळ्या घाट हा प्राचीन काळी व्यवहारासाठी, व्यापारासाठी, दळणवळणसाठी वापरात होता. आजही इथून लोक महाडपर्येंत पायपीट करत व्यवहार करतात, त्यांच्या गरज भागवण्यासाठी त्यांना महाड पर्येंत या घाटाचा वापर करावा लागतो. दोन्ही गावातून येणाऱ्या वाट मळलेल्या आहेत. घोळ गावापार्येंत येण्यासाठी माझ्या माहितीनुसार बस उपलब्ध नाहीत. पानशेत पर्येंत बसने येऊन ट्रॅक्सने घोळ गावापार्येंत यावे लागते.


कोकणदिवा वरून रायगड सुंदर दर्शन होतं तसेच डाव्या हाताला लिंगाणा, तोरणा आणि रायलिंग पठार दिसते. उजव्या हाताला कुर्डुगडाच्या बाजुस असलेली डोंगररांग दिसते. कुर्डूगड बसका असल्याने तो दिसत नाही. गडावर जाताना असलेल्या एका पठारावर दगडात कोरलेले एक सुंदर मंदिर आहे. गडाच्या शेवटच्या टप्यात कातळात कोरलेली गुहा आहे जिथे ८-१० लोक मुक्काम करू शकतात (पावसाळ्यात मुक्काम शक्य नाही, गुहेत पाणी शिरते). गुहेच्याच बाजूस ४ पाण्याच्या टाक्या आहेत. टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे पण टाक्यांपर्येंत पोहोचायला योग्य वाट नाही, काळजीपूर्वक जावे लागते. गडाचा माथा गुहेपासुन ५ मिनिटाच्या अंतरावर आहे, येथे एक छोटा रॉक पॅच आहे. पावसाळ्यात चढताना काळजीपूर्वक जावे लागते. गडाचा माथा छोटा आहे. माथ्यावर एक भगवा आहे, भगव्याच्या पुढे एक छोटी माची आहे. येथून सह्याद्रीचे कातळकडे न्याहाळता येतात. सर्व बाजुला बेलाग कातळकडे अगदी भिंतीसारखे उभे बघुन मन मंत्रमुग्ध होते. एखादा चुकूनही येथुन निसटला तर मृत्यू शिवाय शिक्षा नाही. राजांनी या किल्ल्याची निवड का केली असेल ते येथे येऊन समजते. कोकणदिव्यावर विजय मिळवणे अगदीच अशक्य असणार.






२ जुलै २०१७, दिवस उजाडला. सकाळी ६ वाजता निघायचे नक्की झाल. वेळेला सगळे पक्के होते, अनुभव असल्याने वेळेचं महत्व सगळ्यांनाच माहिती होते. गाडी चक्क ५.३० वाजताच येऊन थांबली होती. ५.४५ ला मी, विवेक, संजू दादा, स्वप्नील आणि समिर कोथरूड वरून निघालो. जाताना वाटेत वडगाव पुलाजवळ yms, अमोल आणि निखिलला सोबत घेतले आणि खडकवासलामार्गे पुढे निघालो. सकाळी ६.१५ वाजता सुद्धा हौशी पुणेकर खडकवासला पाशी गाड्या पळवत, कणीस खात, कट्ट्यावर बसलेले दिसले. आम्ही पुढे पानशेत मार्गे निघालो. सकाळी ५ ला उठल्याने पोटात कावळे ओरडायला लागले होते. वाटेत डोणजे गेलं, खानापूर गेलं पण कुठेही नाश्त्याची हॉटेल नव्हती, सगळी बंद होती. शेवटी पानशेत मध्ये एक हॉटेल नशिबाने उघड होत, त्याकडेही नाश्ता तयार नव्हता. त्याने अर्ध्या तासात नाश्ता बनवून दिला. आम्ही मिसळ आणि पोह्यांवर ताव मारला आणि पुढे निघालो. आता सकाळचे ७.४५ वाजले होते, आम्ही घोळ गावी जायला निघालो. वाटेत पाऊस चालू होता. मधेच एखादी जोरदार सर यायची आणि मग सगळं शांत. पानशेत-घोळ मार्गे जाताना पानशेत पासुन ४-५ किमी पुढे आल्यावर एका वळणावर समोरच्या गाडीने प्रेस केलं आणि घोळ झाला.



आमची गाडी रस्त्यावरून थोडं खाली उतरली आणि चिखलात फसली. गावकऱ्यांकडून कळलं, काही दिवसांपूर्वी येथे BSNL ची केबल टाकण्यासाठी ४ फूट खड्डा संपूर्ण रस्ताभर खणला होता आणि तो फक्त मातीने बुजवला होता. झालं आमचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले, गाडी ढकलणे, जॅक लावून एका बाजुने गाडी उचलणे, गाडी खाली दगड लावून गाडी उचलणे. पण सगळे प्रयत्न फसत चालले होते. ९.१५ वाजले, आमचा सव्वा तास वाया गेला होता, हत्ती गेले आणि शेपूट राहिले होते अजुन फक्त २० किमी जायचे होते पण गाडी ओढून काढण्या शिवाय पर्याय नव्हता. आम्ही २ किमी चालत जाऊन गावात मदत मागितली, एक ट्रॅक्स वाला तयार झाला, त्याला घेऊन सोबत आलो. गाडीवर  माऊलीचे नावरूप लिहिले होते, त्याच्या भरवशावर सगळं होत. गाडीला ६ पदरी रस्सी बांधली आणि गाडी एका झटक्यात वर खेचून काढली. देव पावला, आम्ही त्याचे आभार मानले आणि सगळ्यांचे चेहरे परत एकदा खुलले. आता आम्ही कोकणदिव्याला जाऊ शकणार होतो. नव्या जोशात आमची ट्रेकसफर सुरु झाली. १०.४५ ला आम्ही घोळ गावाला पोहोचलो. एका मुलाने विचारले "कुठे चाललात", आम्ही म्हणालो "कोकणदिवा". त्याचे हावभाव बघण्यासारखे होते, आश्चर्याने त्याने विचारले "आत्ता? लय चिखल असल".







घोळ गावामध्ये आम्ही गाडी लावली आणि गरजाईवाडीच्या दिशेने कूच केली. गरजाईवाडीत उजव्या बाजुने एक रस्ता खाली उतरतो त्या रस्त्याने खाली उतरावे, या वाटेवरून जाताना सभोवतालचा निसर्ग, जंगल, निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज असं सगळं एकंदरीत चित्र बघुन मन मोहुन जात होते. नजरेस दिसणारे दृश्य बघुन लहानपणी चित्रकलेत निसर्गाची चित्र काढायचो त्याची आठवण यायची. कोसळणारे धबधबे, पाण्याचे ओढे, घनदाट जंगल. ह्या वाटेने डोंगर उतरल्यावर मध्ये एक ओढा लागतो, पावसाळ्यात या ओढ्याला खूप पाणी असल्यामुळे ओढा ओलांडण्यासाठी यावर एक पूल बांधण्यात आला आहे. हा पूल दोन मोठे लोखंडी बार आणि लाकडी बांबू व त्यावर काट्याकुट्या टाकून बनवण्यात आला आहे. नैसर्गिकरित्या बनवलेला हा झुलता पूल आहे. ह्या पुलावरून आम्ही ओढा ओलांडला आणि पलीकडे असलेला डोंगर चढू लागलो. तेवढ्यात लांबवर कडकडून आवाज झाला आणि मेघराज पुन्हा एकदा बरसू लागले. जंगलात सर्वत्र शांतता पसरली होती, फक्त पावसाचा आवाज होता, मधेच एखादा पक्षी ओरडायचा. आम्ही मान खाली घालून डोंगर चढत होतो, डोंगरावरून वाहून येणारे पाणी पायाखालून वाहत चालले होते. थोड्याच वेळात आम्ही गारजाईवाडीच्या रस्त्याला येऊन भिडलो. या वाटेवर उजच्या बाजूस धबधबे दिसत होते, आता पर्येंत पाऊस थांबलेला आणि लगेच आम्ही या आठवणी कॅमेराबंद करू लागलो. १० मिनिटे चालून गेल्यावर लांबवर गरजाईवाडीचे सुंदर दर्शन झाले. अगदी डोंगराच्या कुशीत वसलेले हे गाव. आता पावसाने पुन्हा एकदपण जोरदार हजेरी लावली, जोरदार वारे सुटले पुढच्या १५ मिनिटात आम्ही गरजाईवाडी मध्ये दाखल झालो.



आता पर्येंत दुपारचे १२ वाजले होते. आमच्या सुधारित planning पेक्षा आम्ही अर्धा तास लवकर पोहोचलो होतो. गरजाईवाडी  मधुन कोकणदिव्याचे दर्शन होत नाही. एका डोंगराला वळसा घालुन गेल्यावर त्यामागे कोकणदिवा दिसतो. पाऊस चालूच होता, गावात भातलावणी चालू होती. लांबवर भाताची शेती दिसत होती. या शेतांच्या बाजूने चालत गेल्यावर एक वाट थोडी वरच्या बाजुस जाते या वाटेने आम्ही निघालो. हा छोटा डोंगर चढल्यावर पुढे वाट खालच्या बाजुस उतरते, हि संपुर्ण वाट जंगलातून आहे. नीट लक्ष दिले असता काळ्या रंगाने दगडांवरती बाणाने मार्किंग केलं आहे. या वाटेवर डाव्या बाजुस दगडात कोरलेले मंदिर आहे. येथे पोहोचल्यावर आम्ही थोडे पाणी पिऊन घेतले. पावसाळ्यात तशी पाण्याची गरज भासत नाही पण नंतर dehydration होते त्यामुळे वेळोवेळो तहान लागली नसली तरीही पाणी पित रहावे. आतापर्येंत पाऊस थांबला होता आणि आमचे छायाचित्रीकरण पुन्हा सुरु झाले. कोकणदिवा धुक्यात होता, गडाचा फक्त माथा दृष्टीस पडत होता. येथून एक वाट कावळ्या घाटमार्गे सांदोशी गावी जाते तर वर जाणारी वाट गडावर घेऊन जाते.









१२.३० वाजले होते आणि आम्ही गडाच्या शेवटच्या टप्प्यात पाशी असलेल्या पठारावर पोहोचलो. सर्वत्र धुके पसरले होते आणि त्या एका मिनिटासाठी झटक्यात धुक्याचे अंथरून बाजूला झाले आणि सह्याद्रीचे रौद्र कातळकडे सर्वत्र दिसू लागले. मधेच रविराजाने दर्शन दिले आणि आसमानातुन  कवडसे पडू लागले. निसर्गाच्या रूपामध्ये मी हरवून गेलो होतो आणि  असं वाटलं हा क्षण इथेच थांबावा, तासंतास निसर्गाचे फिरते चक्र बघत रहावे पण भान हरपुन चालणार नव्हते. माणसाची हाव कधी संपत नाही :)  ते दृश्य, तो क्षण, त्याची किमया आम्ही कॅमेराबंद करायचा प्रयत्न केला. गडाचा शेवटच्या टप्प्यातील चढण छातीवर आहे. येथून गडावर पोहोचायला अर्धा तास लागतो. दोन्ही बाजुस कारवी असुन संपूर्ण वाटेवर लाल माती आहे. पाऊस होऊन गेल्यामुळे माती बसली होती आणि चढाई सोप्पी वाटत होती. निसर्गाची कृपा सगळी!!! या वाटेने जाताना मनात एकच विचार येत होता "सिमेंटचे जंगल माणसाने कितीही मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला असला तरीही, निसर्गाच्या अद्भुत सौंदर्येपुढे ते फिकेच". साधारण एक वाजता आम्ही गडावर असलेल्या गुहेपाशी पोहोचलो. येथे गुहेच्या बाजुलाच पाण्याच्या ४ टाक्या आहेत. त्यातील एका टाकीपाशी जायला जेमतेम वाट आहे. गुहेमध्ये आम्ही थोडा वेळ आराम केला आणि शेवटच्या ५ मिनिटाच्या चढाईच्या दिशेने वाटचाल केली. शेवटचा टप्पा थोडा अवघड असल्याने जरा जपुन चढावा लागतो, १५-२० फुटाचे रोप सोबत घेतलेले उत्तम. पावसाळ्यात हा टप्पा निसरडा झालेला असतो, खूप पाऊस असल्यानं आणि फार अनुभव नसल्यास चढण्याचा प्रयत्न करू नये. नशिबाने आम्ही चढायला सुरुवात केली तेंव्हा पाऊस नव्हता. पुढच्या ५ मिनिटात आम्ही गडाचा माथा गाठला.




दुपारची वेळ होती, १.३० वाजला होता. भगवा वाऱ्याच्या तालावर फडकत होता. रायगड, लिंगाणा आणि आसपासच्या सह्यकड्यांनी धुक्याचे अंथरून ओढुन घेतले होते आणि परत एकदा एका क्षणासाठी सर्व धुके बाजूला झाले, रायगडाने धुसर दर्शन दिले. या वेळेस आम्ही हा क्षण कॅमेराबंद नाही करू शकलो, तेवढा वेळही नव्हता. तो क्षण आम्ही फक्त नजरेत, मनात साठवून घेतला. मागील बाजुस असलेल्या उंचच्या उंच सह्यकड्यांवरून धबधबे कोसळत होते. एका धबधब्याकडे इशारा करून yms ने डोक्यात पिल्लू सोडले :)  गडाच्या माथ्यावरून सरळ खाली बघितल्यावर थक्क व्हायला होत होते. येथुन कोणाचा पाय घसरला तर वाचणे असंभव, बघताक्षणी डोळे फिरतात, सरळसोट उंचच्या उंच कातळकडे. सगळा नजारा, सर्व दृश्य, एक आठवण सोबत घेऊन आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली. परत गुहेत येऊन पेटपुजा केली आणि २.३० वाजता आम्ही गडाच्या पायथ्यापाशी असलेल्या पठारावर पोहोचलो. पुन्हा एकदा मेघराज बरसु लागले आणि सगळ्यांना चिंब ओले केले. आमच्या हातात बराच वेळ शिल्लक होता, आमची चाल मंदावली. वाटेत जंगलात दिसणारी फुल, झाडे, mushroom सगळं निरखत आम्ही जाऊ लागलो. ३.३० वाजता गरजाईवाडी मध्ये पोहोचते झालो. आता पाऊस पण थांबला होता. आम्ही पुन्हा एकदा परिसर कॅमेराबंद करू लागलो. प्रत्येक पाऊलागणिक निसर्गाचे वेगळे रूप पाहायला मिळत होते. शेवटच्या टप्प्यात अगदी १० मिनिटे वेडावाकडा पाऊस आला, जोरदार वारा सुटला. आम्ही मान खाली घालून एका जागी उभे होतो, हळुहळु पुढे जायचा प्रयत्न करत होतो. आज निर्सगाने त्याचे हे भयाण रूप पण आम्हाला दाखवले. घोळ गावी पोहोचता पोहोचता पावसाने पुन्हा एकदा आम्हाला पुर्णपणे भिजवले. आल्यामार्गाने परत जात ४.३० वाजता घोळ गावी परतलो.







घोळ गावाची दिनचर्या सुरळीत चालु होती, आम्ही शांतपणे आमच्याजवळ असलेले कपडे बदलले आणि संध्याकाळी ५ वाजता परतीचा प्रवास सुरु केला. आता परत पुण्यात जायचं या विचारांनीच नकोस होत होतं. पानशेत जवळ पोहोचल्यावर ज्या ठिकाणी आमची गाडी फसली होती त्याला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो :P  आता पोटात कावळे ओरडू लागले होते, पानशेत जवळच एका हॉटेल मध्ये जेवणावर ताव मारला. अस्सल गावरान जेवण!!! ( पानशेतच्या अलीकडे एक दोन ठिकाणी जेवणाचे भाव विचारले असता लक्षात आलं कि जसजसे पुण्याजवळ जाऊ तसतसे जेवणाचे भाव वाढत जातात :P ). जेवण आटपुन आम्ही खडकवासला मार्गे परत पुण्याकडे निघालो. नकोस वाटणार घाणेरडं ट्रॅफिक हळुहळु पार करत रात्री ९.३० वाजता पोहोचते झालो. बिछान्यावर पाठ टेकवली आणि पुण्यापासून सुरु केलेल्या प्रवासाचे प्रत्येक क्षण डोळ्यासमोरुन जात होते. प्रत्येक क्षण आठवत कधी झोप लागली याचा पत्ताही लागला नाही.





- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)